भारत स्वतंत्र झाल्यानंतर, नौदलाने भरसमुद्रात शत्रूच्या मोठ्या आरमाराशी लढलेली ही पहिली लढाई, पहिली कुस्ती. ती भारतीय नौसैनिकांनी चितपट मारली.
डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा आपल्याकडे ‘नौदल सप्ताह’ म्हणून साजरा जातो. आधुनिक काळात, भारतीय नौदलाने ४ डिसेंबर, १९७१ या दिवशी भीमपराक्रम गाजविला. मुंबई आणि कराची यांच्या दरम्यान अरबी समुद्रात झालेल्या ‘ऑपरेशन ट्रायडंट’ नामक नाविक युद्धात भारताने पाकिस्तानची चार लढाऊ जहाजं बुडवली, त्यात ‘पीएनएस खैबर’ ही विनाशिकाही होती. कोणत्याही प्रगत देशासाठीही, एकाच लढाईत एकदम चार लढाऊ जहाजं गमाविणं, त्यातलं एक तर विनाशिका असणं, हे धक्कादायक असतं. भारतीय नौदलाने ते घडवून पाकिस्तानला तर हादरवून सोडलंच; पण पाकचे कैवारी असलेल्या अमेरिका आणि ब्रिटनलाही एक धक्का दिला. भारतीय नौदल हे आता पश्चिम देश समजत होते, त्याप्रमाणे, ‘अंग्रेज तो चले गये, पर औलाद छोड गये,’ अशा स्वरूपाचं राहिलेलं नसून, त्याच्या धमन्यांमध्ये आता छत्रपती शिवराय, सरखेल कान्होजी आंग्रे आणि सरखेल आनंदराव धुळप यांचा पराक्रम सळसळू लागला आहे. याचा प्रत्यय भारताच्या शत्रूंना तर आलाच; पण स्वत: भारतीयांनाही आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, नौदलाने भरसमुद्रात शत्रूच्या मोठ्या आरमाराशी लढलेली ही पहिली लढाई, पहिली कुस्ती. ती भारतीय नौसैनिकांनी चितपट मारली. ४ डिसेंबर, १९७१ या दिवसाचं हे महत्त्व आहे. इंग्रजी राज्यात सुरुवातीला २१ ऑक्टोबर हा ‘नौदल दिन’ म्हणून साजरा होत असे. कारण, २१ ऑक्टोबर, १८०५ या दिवशी प्रख्यात इंग्रजी नाविक सेनापती अॅडमिरल होरेशियो नेल्सन याच्या नेतृत्वाखाली इंग्रजी आरमाराने ट्रॅफल्गार इथल्या लढाईत फे्रंच आरमाराचा साफ पराभव केला होता.
इंग्रज साहेब पक्का धूर्त कोल्हा. आधुनिक आरमारी विद्या भारतीयांपासून त्याने कटाक्षाने दूर ठेवली. अगदी नाइलाज म्हणून अल्प प्रमाणात त्याने भारतीय लोकांना नौसेनेत घेतलं. पण, ते खलाशी म्हणून, अधिकारी म्हणून नव्हे. पण, पहिल्या महायुद्धानंतर हळूहळू ‘रॉयल इंडियन नेव्ही’मध्ये भारतीयांची संख्या वाढू लागली. १९४७ साली इंग्रज साहेबाला भारत सोडून जावंच लागलं. १९५० साली भारत प्रजासत्ताक होऊन, ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची ‘इंडियन नेव्ही’ झाली. पण, आमचा नौसेनाप्रमुख इंग्रजच. शेवटी १९५८ साली पहिला भारतीय अधिकारी नौसेनाप्रमुख बनला. त्याचं नाव अॅडमिरल रामदास कटारी. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे, ऑक्टोबर १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. पण, हे युद्ध मुख्यतः काश्मीरच्या भूमीवरच लढलं गेलं. त्यात नौसेनेच्या सहभागाचा प्रश्न आलाच नाही. नंतर डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय भूदलाने गोवा पोर्तुगीज अमलाखालून मुक्त करण्यासाठी गोव्यावर स्वारी केली. पोर्तुगाल ही एकेकाळची नाविक महासत्ता होती. आतासुद्धा पोर्तुगीज ‘अल्फान्सो डी अल्बुकर्क’ नावाच्या ‘स्लूप’ जातीच्या युद्धनौकेच्या भरवशावर गोव्याचा बचाव करण्याची स्वप्नं पाहत होते. पण, आता हे सोळावं शतक नव्हतं. भारतीय नौदलाच्या ‘बियास’ आणि ‘बेटवा’ या दोन ‘फ्रिगेट’ जातीच्या युद्धनौकांनी ‘अल्फान्सो डी अल्बुकर्क’ला पिटून काढलं. रणांगणातून पळ काढणारं ते लढाऊ जहाज बांबोळीच्या किनाऱ्याजवळ वाळूत घुसलं आणि १८० अंशांच्या कोनात कलंडून आकाशाकडे पाहत राहिलं. चीत झालेल्या पहिलवानाने अस्मान बघत पडावं तसं. स्वतंत्र भारतीय नौदलाने पाहिलेली ही पहिली ‘अॅक्शन.’ मात्र, ती खूपच छोटी होती.
मग ऑक्टोबर १९६२ मध्ये चीनने भारतावर आकस्मिक आक्रमण केलं, हे युद्ध हिमालयात लढलं गेलं, त्यामुळे तेव्हाही नौदलयुद्धाचा प्रसंग उद्भवला नाही. नंतर सप्टेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. ७ आणि ८ सप्टेंबर, १९६५ ला काही भुरटी पाकिस्तानी जहाजं भारतीय तीर्थक्षेत्र द्वारकेवर बॉम्बफेक करून पळून गेली. यावेळी भारताचे नौसेनाप्रमुख होते अॅडमिरल भास्करराव सोमण. मूळचा बेळगावचा मराठी सेनानी. आता पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाऊन धडक मारायला अॅडमिरल सोमण आणि त्यांचे नाविक जवान नुसते फुरफुरत होते. पण, पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या युद्धात प्रत्याक्रमण फक्त भूदल आणि वायुदलच करेल; नौदलाने पश्चिम नि पूर्व समुद्रीय प्रदेशात कडक बंदोबस्ताने राहून संरक्षण फक्त करावं, आक्रमण करू नये. नौसैनिकांचा नाइलाज झाला. आणखी सहा वर्षे उलटली. १९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात भयंकर यादवी सुरू झाली. भारताला यात पडावं लागणार हे तर नक्कीच होतं, फक्त केव्हा, एवढाच प्रश्न होता. भूदल, नौदल आणि वायुदल तिघांचीही जोरदार तयारी होती. वायुदल प्रमुख प्रतापचंद्र लाल, नौदलप्रमुख अॅडमिरल सरदारीलाल नंदा हे वाट पाहत होते सरसेनापती आणि भूदलप्रमुख जनरल सॅम माणेकशा यांच्या इशाऱ्याची. आभाळ शिगोशीग भरून आलं होतं.
३ डिसेंबर, १९७१ या दिवशी पाकिस्तानी वायुदलाने काश्मीर आणि पंजाबमधील ११ भारतीय ठाण्यांवर एकाच वेळी बॉम्बफेक केली आणि तिन्ही भारतीय सैनिकी दलं पाकिस्तानवर तुटून पडली. भारतीय नौसैनिकांचं हे पहिलं मोठं युद्ध होतं. एकाच वेळी, पश्चिमेकडे कोचीन ते कारवार ते मुंबई ते कराची, असा पूर्ण अरबी समुद्र आपल्या हातात ठेवायचा होता, तर पूर्र्वेला विशाखापट्टण ते चित्तगाँग ते कॉक्स बझार हा समुद्री परिसर, तसंच गरज पडल्यास पूर्व पाकिस्तानच्या गंगा, मेघना आदी नद्यांच्या मुखांमधूनही आत घुसायचं होतं. शिवशिवणाऱ्या मनगटांचे बहादूर भारतीय जवान ‘अॅक्शन’साठी आसुसले होते. आणि ती ‘अॅक्शन’, तो थरार त्यांना लगेचच ४ डिसेंबरला मनमुराद अनुभवायला मिळाला. कराची बंदरावर हल्ला चढवायला निघालेल्या सहा जहाजांच्या भारतीय पथकाची गाठ चार जहाजांच्या पाकिस्तानी पथकाशी कराची बंदराच्या दक्षिणेला समुद्रात सुमारे १७ नॉटिकल मैलांवर (भूमीवर सुमारे ३१ कि.मी.) पडली. मध्यरात्रीच्या अंधारात म्हणजे, रात्री साडे दहाच्या सुमारास जबरदस्त घनचक्कर झाली आणि.... आणि भारतीय नौदलाने चारही पाकिस्तानी जहाजं साफ बुडविली. भारतीय नौदलाने या युद्धात प्रथमच सोव्हिएत रशियन बनावटीच्या ‘स्टाईक्स’ या प्रक्षेपणास्त्राचा उपयोग केला. अरबी सुमद्र परिसरात करण्यात आलेला ‘सरफेस टू सरफेस मिसाईल’चा हा पहिला प्रयोग.
कराची बंदराची पहिली संरक्षक फळी अशा प्रकारे साफ कापून काढल्यावर ‘आयएनएस नि:पात’, ‘निर्धात’, ‘वीर’, ‘किलतान’, ‘कटचाल’ आणि ‘पोषक’ या सहा भारतीय युद्धनौकांनी ठरल्याप्रमाणे कराची बंदरावर हल्ला चढविला. तेवढ्यात आणखी काही जहाजं आडवी आली. रात्रीचे ११ वाजले होते, पुन्हा ‘स्टाईक्स’ प्रक्षेपणास्त्रांना बत्ती दिली गेली. परिणामी, ‘मुहाफि ज’ ही विनाशिका आणि ‘व्हीनस चॅलेंजर’ हे दारूगोळा पुरवठा जहाज समुद्रतळाशी गेले, तर ‘शाहजहाँ’ ही विनाशिका जबर जायबंदी झाली. आडवे आलेल्यांना अशा रीतीने आडवे पाडल्यावर ‘आयएनएस निःपात’ने कराची बंदरातल्या केमारी इथल्या पेट्रोल टाक्यांच्या दिशेने पुन्हा दोन ‘स्टाईक्स’ प्रक्षेपणास्त्रं सोडली. त्यातल्या एकाचा नेम चुकला, तर दुसऱ्याने मात्र अचूक लक्ष्यवेध केला. प्रचंड स्फोट झाला. एक प्रचंड थरारनाट्य अनुभवून, नव्हे घडवून, सहाही भारतीय नौका सुखरूपपणे भारतीय सागरी सीमेकडे पसार झाल्या.
अरबी समुद्रात हे घडत असताना इकडे पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात याहीपेक्षा विस्मयकारक नाट्य घडत होतं. भारतीय विमानवाहू नौका ‘आयएनएस विक्रांत’ ही पूर्व पाकिस्तानची सागरी कोंडी करण्यासाठी बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आली होती. ती विशाखापट्टण बंदरातून बाहेर पडून चित्तगाँगकडे जात असताना वाटेतच तिला गाठून बुडवायची, अशी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना पाकिस्तानी नौदलप्रमुख अॅडमिरल मुझफ्फर हसन यांनी आखली. पाकिस्तानी पाणबुडी ‘पीएनएस गाझी’ हिला ‘विक्रांत’च्या मागावर सोडण्यात आलं. भारतीय नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल नीलकंठ कृष्णन् यांनी ‘आयएनएस राजपूत’ या विनाशिकेचे कॅप्टन इंदरसिंग यांना संदेश पाठविला. ‘गाझी’ चेन्नई ते विशाखापट्टणच्या दरम्यान कुठेतरी आहे. कॅप्टन इदरसिंग ‘राजपूत’ला घेऊन विशाखापट्टण बंदरातून बाहेर पडले. दि. ३ डिसेंबर, १९७१ वेळ रात्री ११.४० बंदरातून खुल्या समुद्रात पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली. ४ डिसेंबर तारीख लागली आणि टेहेळ्याने इशारा दिला की, जहाजाच्या वाटेत काहीतरी अडथळा दिसतोय. कॅप्टनने दिशा बदलत पूर्ण वेगाने जहाज पुढे काढलं आणि त्या अडथळ्याच्या दिशेने दोन डेप्थ चार्जेस सोडले.
प्रचंड स्फोट झाले. ते वाजवीपेक्षा इतके मोठे होते की, ‘राजपूत’ जहाजही गदागदा हादरलं. इतकंच नव्हे, तर विशाखापट्टण बंदरपट्टीही हादरली. अकल्पितपणे ‘राजपूत’च्या त्या तोफगोळ्यांनी ‘पीएनएस गाझी’च उडविली होती. ८२ नौसैनिक, ११ अधिकारी, असे एकूण ९३ लोक आणि ‘एम-के १४’ हे अत्याधुनिक ‘टॉरपेडो’ यांनी सुसज्ज अशी खतरनाक ‘गाझी’ पाणबुडी बंगालच्या उपसागराच्या तळाशी छिन्नभिन्न होऊन पडली. पूर्वेकडच्या पाकिस्तानी आरमाराचा दमच खलास झाला. ‘विक्रांत’ला असणारा धोका संपला. भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानची व्यवस्थित सागरीकोंडी करून पाकिस्तानी सैन्याला समुद्रमार्गे मिळू शकणारी रसद तोडली.
भारतीय नौदलाच्या या भव्य यशाला किंचित गालबोट लागलं ते ‘आयएनएस कुकरी’च्या जाण्याने. दि. ८ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर पश्चिमेकडे दीव जवळच्या समुद्रात ‘कुकरी’ ही फ्रिगेट जातीची भारतीय युद्धनौका ‘हँगोर’ या पाकिस्तानी पाणबुडीने बुडविली. १७६ सैनिक आणि १८ अधिकारी यांच्यासह कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचेही बलिदान झाले. त्याकरिता कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांना मरणोत्तर ‘महावीर चक्र’ देण्यात आलं. १९७१च्या पराक्रमगाथेचं पन्नासावं वर्ष आता सुरू झालं आहे.