जीवन ‘भार’ नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020   
Total Views |

 indutai eknath wagh _1&n
 
रेल्वेच्या भुसावळ विभागातील पहिल्या महिला हमाल इंदुताई एकनाथ वाघ. त्यांच्या आयुष्याची कहाणी कथन करणारा हा लेख...
 
 
मानवी जीवन व्यतीत करत असताना बरेचदा अनंत अडचणी, संकटे आणि अवहेलना व्यक्तीला सोसाव्या लागतात. जीवन म्हणजे जन्म ते मृत्यू या काळातील संघर्ष, अशा पद्धतीने आपण जीवनाकडे पाहत असतो. हे तत्त्व अनेक जण जाणत असतानाही, जीवन हे भार वाटल्याने काही जण हे मृत्यूला जवळ करतात. त्यात काही सुशिक्षित, प्रगल्भ नागरिकही असतात. अशा वेळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करणार्‍या रेल्वेच्या भुसावळ विभागातील पहिल्या महिला हमाल इंदुताई एकनाथ वाघ या नक्कीच उत्तम उदाहरण ठरणार्‍या आहेत.
 
 
इंदुताई वाघ या केवळ सातवी उत्तीर्ण. आईवडील आणि सात बहिणी, असा त्यांचा परिवार. त्यातच इंदुताई यांचा एकनाथ वाघ यांच्यासमवेत विवाह झाला. इंदुताई गर्भवती असतानाच त्यांच्या पतीचे २००० साली निधन झाले. मूल जन्माला येण्यापूर्वीच पितृछायेला पारखे झाले. नियतीचा हा घाला मोठ्या धीराने इंदुताई यांनी पचविला आणि धीरोदात्तपणे जीवन संघर्ष सुरू केला. कुटुंबाची गरज म्हणून त्यांनी घरकाम करण्यास प्राधान्य दिले. त्यांचे वडील हे या काळात नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकावर हमाली करत होते, त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा सुरू होता.
 
 
दरम्यानच्या काळात इंदुताई व त्यांचे वडील यांनी इंदुताई यांच्या सर्व बहिणींचे विवाह यथायोग्य पार पाडले. काळ जसा पुढे सरकत गेला, तसा मुलगादेखील मोठा होत गेला आणि वडील वयोमानापरत्वे थकत गेले. मुलाचे शिक्षण आणि कुटुंबाचा चरितार्थ चालविणे आवश्यक होतेच. त्यासाठी आर्थिक आवक ही आवश्यक होती. तेव्हा इंदुताई यांच्यासमोर काही पर्याय उभे ठाकले. त्यांनी निष्ठेने वडिलांचा हमाली कार्याचा वसा पुढे नेण्याचे ठरविले. लाल डगला परिधान करून ‘बिल्ला नंबर ७’ अभिमानाने लावत इंदुताई नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर प्रवाशांचा आणि आपल्या जीवनाचा भार हलके करण्याचे काम करू लागल्या.
 
दि. १० सप्टेंबर, २०२० हा त्यांच्या या कार्याचा पहिला दिवस. या पहिल्या दिवशी काम कसे असणार, आपणास हे काम करणे शक्य होईल काय, प्रवासी व इतर हमाल बांधव यांची प्रतिक्रिया काय असेल आदी प्रश्न इंदुताई यांच्या मनात घोळत होतेच. मात्र, आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, याचा विश्वास त्यांच्या मनात होता. त्यामुळे त्या आत्मविश्वासाने फलाटावर उभ्या राहिल्या. आजवर केवळ पुरुषांचे क्षेत्र अशी ओळख असलेले भारवाहकाचे कार्य एक महिलादेखील करू शकते, हे इंदुताई यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ५५ ते ५६ किलो वजन असलेल्या इंदुताई २५ ते ३० किलोचा भार सहज उचलताना नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दिसून येतात.
 
 
हमाल बांधवांची संघटना असून, त्यांचे सहकार्य हे इंदुताई यांना कायम प्राप्त होत आहे. तसेच, रात्र व दिवसपाळीत हमाल बांधव काम करत असतात. त्याच नियमाने इंदुताई दोन्ही पाळ्यांत काम करतात. दिवसपाळी असल्यास सकाळी ६ ते संध्याकाळी ६ व रात्रपाळी असल्यास संध्याकाळी ६.३० ते सकाळी ६.३० या काळात त्यांचे अविरत कार्य सुरू आहे. महिला आहे म्हणून रात्रपाळीत काम नको, अशी कोणतीही भावना त्यांच्या मनात आली नाही. जो नियम पुरुष हमाल बांधवांना आहे, तोच नियम त्या निष्ठेने पाळताना दिसतात. स्त्री म्हणून कोणत्याही विशेष वागणुकीची अभिलाषा त्यांच्या मनी नाही.
 
 
दिवसाकाठी प्राप्त होणारे २०० ते ४०० रुपये हेच या कुटुंबाच्या चरितार्थाचे साधन आहे. भारवाहकाचे काम हे मेहनतीचे आहे. तसेच, भारवाहक हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांना रेल्वेने कायमस्वरूपी आपल्या सेवेत घ्यावे, अशी मागणी त्या या निमित्ताने करत आहेत. ज्या महिला या सधन नाहीत, ज्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत, अशा महिलांनी आपले जीवन कुंठत व्यतीत करण्यापेक्षा आपला मार्ग निवडावा. हमाली क्षेत्र हे जरी मेहनतीचे असले, तरी स्वाभिमान जागृत ठेवणारे आहे. त्यामुळे ज्यांना योग्य वाटत असेल, अशा महिलांनी या क्षेत्रात आल्यास नक्कीच या क्षेत्राची दखल समाजाला घ्यावी लागेल, असा विश्वास इंदुताई व्यक्त करतात.
 
आपल्या जीवनातील आदर्श कोण, असे इंदुताई यांना विचारले असता, “जगात काम करणारी, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारी प्रत्येक महिला ही आपली आदर्श आहे,” असे त्या आवर्जून नमूद करतात. स्त्री ही कुटुंबाला आणि मानवी जीवनाला पूर्णत्व प्रदान करत असते. आपले जीवनमान व्यतीत करताना स्त्री अनेक भार उचलत असते व इतरांचा भार हलका करण्याचा प्रयत्न करत असते. इंदुताई वाघ नेमके हेच करत आहेत. जन्मापासून संघर्ष करणार्‍या इंदुताई यांना अकाली वैधव्य आले. त्यातूनही त्या सावरल्या. शिक्षण कमी असल्याने जीवनानुभव हेच त्यांचे खरे शिक्षण आहे. मात्र, यातून प्राप्त झालेले ज्ञान त्यांनी सकारात्मक दृष्टीने अर्जित केले आहे व जीवन हे ‘भार’ नसल्याचे कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!
@@AUTHORINFO_V1@@