अर्णब गोस्वामींचा जामीन फेटाळला : आणखी चार दिवस कोठडीतच

    09-Nov-2020
Total Views |
Arnab Goswami_1 &nbs





मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले अर्णब गोस्वामी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अर्णब गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोझ शेख यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, अपेक्षेप्रमाणे अर्णव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आरोपी पूर्वीपासूनच न्यायालयीन कोठडीत असल्याने या प्रकरणात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. आरोपींनी नियमाप्रमाणे अलिबाग सत्र न्यायालयात जाऊन अर्ज करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.



अलिबाग सत्र न्यायालयात जाण्यास सांगितल्यानंतर अर्णब यांनी तसा रितसर अर्ज केला आहे. पुढील चार दिवसांत सत्र न्यायालयाला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी द्यावी लागणार आहे. मात्र, तोवर अर्णब यांचा मुक्काम कोठडीतच राहणार आहे. दिवाळीपूर्वी जामीन मिळावा यासाठी अर्णब यांचा प्रयत्न राहणार आहे. अर्णबच्या वकीलांनी संपूर्ण अटक बेकायदेशीर आहे, अशी बाजू मांडण्यात आली आहे. अर्णब यांचे वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद करताना आरोपीची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने अटक गरजेची नसल्याचे म्हणण्यात आले. एका पत्रकारावर, अशाप्रकारे कारवाई होणे यावरही त्यांनी भाष्य केले होते.


तीनही आरोपी आता अलिबाग सत्र न्यायालयात जाणार आहेत. त्यामुळे नियमानुसार तिथे या प्रकरणाची सुनावणी होईल. तिथे जामीन अर्ज स्वीकारण्यात आला तर अर्णब यांना दिलासा मिळू शकतो. मात्र, निर्णय अर्णब यांच्याविरोधात गेला तर ते उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. अर्णब यांनी न्यायालयात आपल्याला मारहाण झाल्याचे म्हटले आहे.