कोकणातील लांज्यात खवले मांजराच्या १० किलो खवल्यांची तस्करी

    07-Nov-2020
Total Views | 236

pangolin_1  H x


पोलीसांकडून स्थानिकाला अटक 
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - लांज्यातील सातवलीमधून खवले मांजराच्या १० किलो खवल्यांची तस्करी समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी गुन्हे शाखेने स्थानिक आरोपीला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या खवल्यांच्या तस्करीसाठी किमान १० खवले मांजर मारल्याची शक्यता आहे. 
 
 
 
 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या प्रथम श्रेणीत खवले मांजराला संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण त्याला मिळाले आहे. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणे आणि त्याची वा त्याच्या अवयवांची तस्करी करण्यास कायदेशीर बंधने आहेत. तसे करणे कायदेशीर गुन्हा आहे. या प्राण्याला वन्यजीव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागांसह कोकणातूनही या प्राण्याची छुप्या पद्धतीने तस्करी सुरु असल्याची प्रकरणे अधूनमधून उघड होत असतात. असेच एक प्रकरण शुक्रवारी रत्नागिरीमधील लांजा तालुक्यातील सातवली गावातून उघडकीस आले. 
 
 
सातवली गावातील जितेंद्र चव्हाण हा स्थानिक रुण फाट्याजवळ खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी येणार माहिती रत्नागिरी गुन्हे शाखेला मिळाली होती. रत्नागिरीहून खरेदीसाठी येणाऱ्या काही इसमांना तो रुण फाट्याजवळ भेटणार होता. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात सापळा लावला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी, खवले विकत घेणारे इसम याठिकाणी आले नाहीत. अशा परिस्थितीत चव्हाण त्याठिकाणाहून निघून जाईल आणि सापळा फसेल म्हणून पोलीसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळील पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये पोलीसांना १० किलो ७०० ग्रॅम खवले आढळून आले. या खरेदी विक्रीच्या व्यवहारात चव्हाण हा मध्यस्ती असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती लांजा पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. चव्हाण हा मध्यस्ती असल्याने खवले विकत घेणाऱ्या आणि खवले मांजरांची शिकार करणाऱ्या लोकांचा शोध सुरू असल्याची त्या अधिकाऱ्याने सांगितले. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121