नवी दिल्ली : आयपीएलच्या तेराव्या हंगामामध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला. यानंतर आता पुन्हा एकदा त्याच्या कर्णधार पदावरून आरसीबीवर टीका होत आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने 'आरसीबीने आता कोहलीच्या पलीकडे जाऊन कर्णधारपदाचा विचार करावा' असा सल्ला दिला आहे.
"आठ वर्ष स्पर्धेमध्ये एकही चषक नाही, आठ वर्ष हा खूप मोठा काळ झाला. मला एक कर्णधार सांगा, किंवा एखाद्या खेळाडूचे नाव सांगा, ज्याला आठ वर्ष मिळाली, पण विजेतेपद न मिळूनही त्याला कायम ठेवण्यात आले. कर्णधाराने जबाबदारी घ्यायला हवी. आर. अश्विनसारख्या खेळाडूला किंग्स इलेवन पंजाबने फक्त २ वर्षात पदावरून काढले. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मोजमापाची वेगवेगळी परिमाणं नसावीत." असे मत गंभीरने व्यक्त केले आहे.