‘पिट बुल’च्या बळींची संख्या आपल्याला आपल्या देशातल्या विविध घटनांच्या संदर्भात अगदीच किरकोळ वाटेल, पण लक्षात घ्या की हा सैतानी कुत्रा पाळण्याची अमेरिकेत ‘फॅशन’ आली आहे.
इंग्रजी साहित्यामध्ये ‘सायन्स फिक्शन’ हा प्रकार फार लोकप्रिय आहे. त्याला लघुरूपात ‘एससीआय-एफआय’ म्हणजेच ‘स्की-फी’ असंही म्हणतात. मराठीत याला ‘विज्ञान कथा’ म्हणतात. इंग्रजीत विज्ञान कथांचा प्रचंड खनिजाच आहे. पण, मराठीतही चांगल्या दर्जेदार विज्ञान कथा लिहिल्या जात असतात. विज्ञानातले प्रत्यक्ष शोध आणि कल्पना यांचं उत्कृष्ट मिश्रण असणार्या या कथा वाचकांना वर्तमान आणि भविष्याच्या एका वेगळ्या अनोख्या दालनात घेऊन जातात. या कथांमध्ये बरेचदा असं कथासूत्र येतं की, एखादा संशोधक योगायोगाने असा काहीतरी शोध लावतो की, ज्यामुळे संपूर्ण जगावर नव्हे, संपूर्ण मानव जातीवरच काहीतरी भीषण संकट ओढवणार, संपूर्ण मानव जातीचंच अस्तित्व धोक्यात येणार, असा संभव दिसू लागतो. पण, मग कुणीतरी जाणते, शहाणे लोक पुढे येतात नि जगाला सर्वनाशापासून वाचवतात इत्यादी. गंमत म्हणजे, आपल्या सर्व पुराणांमध्ये अशा प्रकारच्या विपुल कथा आहेत. श्रीगणेश पुराणातली ही कथा पाहा. गृत्समद हा एक महान गणेशभक्त ऋषी होता. एकदा त्याला शिंक आली. या शिंकेतून एक बालक निर्माण झालं. गृत्समदाने त्याला ‘गणानां त्वां’ या मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्राच्या तपस्येने त्या बालकाने गणपतीला प्रसन्न करून घेऊन, त्याच्यापासून अजिंक्य अशी तीन पुरे म्हणजे तीन विमाने मिळवली. अवकाशात कुठेही भ्रमण करू शकणार्या त्या तीन पुरांच्या साहाय्याने तो बालक सर्वांना अजिंक्य असा त्रिपुरासुर बनला. पुढे भगवान शंकराने गणपतीच्या साहाय्याने एकाच बाणाने ती तिन्ही पुरे जाळून त्यासोबत त्रिपुरासुरालाही जाळून टाकले इत्यादी.
तुम्ही म्हणाल, त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव का करावा, याची ही कथा आम्ही वर्षानुवर्षे ऐकतोय-वाचतोय. ही कसली विज्ञानकथा! म्हणजे बघा, आदसॅक अॅसिमॉव्ह किंवा आर्थर सी-क्लार्क यांनी लिहिली तर ती विज्ञानकथा आणि गणेश पुराणातली कथा म्हटली की, ती मात्र पुराणातली वांगी! कशी आपली विचित्र हिंदू मानसिकता झाली आहे पाहा! गोर्या चामडीवर आमचा पूर्ण विश्वास, पण आमच्याच लेखकांवर मात्र आम्ही प्रतिगामी, परलोकाची चिंता करणारे, म्हणून नाक वाकडं करून टीका करणार. वाचकहो, वरवर पाहता कथा भासणार्या आपल्या पुराण कथांमध्ये सूत्ररुपात फार मोठा इतिहास, फार मोठी वैश्विक सत्ये दडवून ठेवलेली आहेत. या पुराण कथा म्हणजे रुपके आहेत, फॉर्म्युले आहेत, हे आपण कधी समजून घेणार? अंतरिक्षात कुठेही, कधीही भ्रमण करू शकणारी त्रिपुरासुराची तीन पुरे शिवाने एकाच मंत्रमय, विष्णुरूप बाणाने जाळून टाकली. आज आकाशात, कितीही उंचीवर, कशीही उलटसुलट फिरणारी शत्रूची बॉम्बफेकी विमानं पाडण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रं जगातल्या सर्वच देशांकडे आहेत. सामान्य भाषेत त्यांना ‘गायडेड मिसाईल्स’ म्हणतात. गृत्समद ऋषीच्या शिंकेपासून एक बालक, एक वेगळे अस्तित्व, एक वेगळी व्यक्ती निर्माण झाली जी, मोठेपणी एक असुर, राक्षस बनली. म्हणजे नेमकं काय घडलं असेल? गृत्समद हा मंत्रद्रष्टा ऋषी होता. म्हणजेच मंत्रशास्त्र या विषयातला वैज्ञानिक होता. त्याच्या मंत्रशास्त्रीय प्रयोगात काहीतरी गडबड होऊन काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट निर्माण झाली असावी.
सध्या अमेरिकेत निर्माण झालेल्या ‘पिट बुल’ या प्रश्नावरून आपल्याला या प्राचीन पुराणकथेची काहीशी समज येईल. आपल्याकडे गावोगावच्या जगांमध्ये बैलांच्या झुंजी, बैलांच्या वा बैलगाड्यांच्या शर्यती, कोंबड्यांच्या झुंजी, बोकडांच्या झुंजी इत्यादी प्रकार आहेत. कुत्र्यांच्या झुंजी किंवा कुत्र्यांच्या शर्यती हा प्रकार मात्र नाही. घोड्यांच्या शर्यती नि त्यावर चालणारा प्रचंड जुगार, हा प्रकार इंग्रजांनी आपल्याकडे आणला. पण, इंग्लंडमध्ये सर्रास प्रचलित असलेला कुत्र्यांच्या शर्यती आणि झुंजी हा प्रकार आपल्याकडे प्रचलित नाही. गंमत म्हणजे ‘कुत्रेझुंज’ हा शब्द मात्र मराठी भाषेत प्रचलित आहे. मानव जातीचा इतिहास जेव्हापासून ज्ञात आहे, तेव्हापासून कुत्रा हा पूर्णपणे माणसाळलेला प्राणी, माणसाचा इमानी मित्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे, तरीसुद्धा प्राणिशास्त्रज्ञांनी त्याला लांडगा, कोल्हा हा क्रूर आणि लबाड प्राण्यांच्या वर्गात टाकलं आहे. एकवेळ माणसाला त्याचा सख्खा भाऊदेखील दगा देईल, पण कुत्रा कधीच दगा देणार नाही. पाश्चिमात्त्य प्राणिशास्त्राच्या वर्गवारीनुसार कुत्र्यांच्या शेकडो जाती आहेत. ‘हाऊंड’, ‘वुल्फहाऊंड’, ‘ग्रे हाऊंड’, ‘ब्लड हाऊंड’, ‘फॉक्स हाऊंड’, ‘फॉक्स टेरियर’, ‘स्कॉच टेरियर’, ‘मॉस्टिक’, ‘बुलडॉग’, ‘जर्मन बोअर हाऊंड’, ‘ग्रेट डेन’, ‘पग’, ‘पुडल’, ‘सेंट बर्नार्ड’ इत्यादी. या प्रत्येक जातीचं काही ना काही वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार त्या त्या जातीच्या कुत्र्याला विशिष्ट काम दिलं जातं. अगदी आपल्या सामान्य भाषेत बोलायचं तर घराची राखण करणारा कुत्रा वेगळा, शेताची राखण करणारा वेगळा, पोलीस तपासात साहाय्य करणारा वेगळा नि एखाद्या अतिविशाल महिलेचा झिपरा, लडदू कुत्रा वेगळा.
कुत्र्यांच्या शर्यती लागणारे आणि झुंजी लावणारे लोक तर अशा सगळ्या वैशिष्ट्यांचा विचार फारच बारकाईने करतात. त्यातही ते विज्ञानाचा वापर करतात. शर्यतीत पळणारा कुत्रा अत्यंत चपळ, वार्याच्या वेगाने धावणारा हवा. मग असा कुत्रा वजनाने हलका कसा होईल, पळताना त्याच्या शरीराचा वार्याशी संघर्ष कमी झाला, तर त्याचा वेग वाढेल. त्याचे मागचे पाय जास्त लांब झाले आणि खूर दणकट झाले. शेपटीने होडीच्या शिडाप्रमाणे वारा पकडण्याचं काम केलं तर? मग अशा कुत्रांच्या नवनवीन जाती ते लोक जनुकशास्त्राचा-जेनेटिक्सचा आधार घेऊन निर्माण करतात. आठवतंय का? अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘जेनेटिकली मॉनिटर्ड’ भाजीपाला आणि धान्य निर्माण केलं आहे, ज्यातले अन्न घटक-फूड व्हॅल्युज, या मांसाहारी पदार्थांप्रमाणे आहेत. या जी. एम. भाजी आणि जी. एम. धान्यामुळे खुद्द अमेरिकेत आणि युरोपातही प्रचंड वादविवाद अजूनही चालू आहेत. तर कुत्र्यांच्या झुंजी लावणार्या लोकांनीही असेच उद्योग केले. आपल्याकडे ज्या कोंबडे झुंजी किंवा बोकड झुंजी चालतात, त्यात एक कोंबडा किंंवा एक बोकड जिंकतो. हरलेला रिंगणातून पळ काढतो. त्याचा मालक त्याला पुढच्या झुंजीसाठी आणखी तयार करण्याच्या जिद्दीने तिथून निघून जातो. आपण हिंदू लोक ‘जगा आणि जगू द्या’ या संस्कारात वाढलेले असल्यामुळे आपल्याकडे असं सहजपणे घडते.
पश्चिमेत असं घडत नाही, त्यांना शौर्यापेक्षा कौर्य आवडतं. त्यामुळे हरणारा हा ग्लॅडिएटर माणूस असो,कोंबडा असो, नाहीतर कुत्रा असो, जिंकणार्याने हरणार्याला अत्यंत क्रूरपणे ठारच मारलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. रोमच्या त्या प्रख्यात कलोसियममध्ये हजारो प्रेक्षकांसमोर विजेता ग्लॅडिएटर हरलेल्या ग्लॅडिएटरवर हत्यार रोखून प्रेक्षकांना विचारायचा, ‘जीवन की मृत्यू?’ प्रेक्षक ‘थम्स डाऊन’ची म्हणजे उलट्या अंगठ्याची खूण करायचे. विजेत्याचं हत्यार खसकन पराजिताच्या शरीरात घुसायचं. रक्ताची कारंजी नि मरणाचा आकांत उसळायचा. प्रेक्षक मिटक्या मारत तो मृत्यू पाहायचे. पश्चिमेच्या लोकांना हजारो वर्षं हीच सवय आहे. म्हणून मग झुंजणारा कुत्रा हा अधिकाधिक शक्तिमान, चपळ, लढाऊ आणि क्रूर हवा. यासाठी या झुंजी लावणार्या धंदेवाईक लोकांनी ‘जेनेटिक्स’ला वेठीला धरलं. प्रथम त्यांनी ‘इंग्लिश बुल डॉग’ आणि ‘ओल्ड व्हाईट टेरियर’ या जातींचा संकर घडवून ‘बुल टेरियर’ ही नवी जात बनवली. ‘बुल डॉग’ हा फार शक्तिमान असतो आणि ‘व्हाईट टेरियर’ हा फार चपळ असतो. ‘बुल टेरियर’मध्ये हे दोन्ही गुण आले. जुगारी लोकांना फार आनंद झालां. पण गुणांबरोबर दुर्गुणही आले. ‘बुल डॉग’ आणि ‘टेरियर’ हे दोन्ही कुत्रे फार तापट स्वभावाचे असतात. ‘बुल टेरियर’ हा त्यामुळे दुप्पट संतापी बनला. जुगारी लोकांना त्याचाही आनंदच झाला. संतापी लढवय्या हा आणखी क्रूर बनतो. त्यांना तेच हवं होतं.
पण, हे चक्र एवढ्यावर थांबलं नाही. आणखी शक्ती, आणखी चपळाई, आणखी क्रौर्य या हव्यासातून ‘बुल टेरियर’चे ‘जॅक रसेल टेरियर’, ‘लेव्हरीरो’, ‘स्टॅनफर्डशायर टेरियर’ अशा विविध प्रजातींशी संकर घडवण्यात आले. या बेछूट, बेगुनाम संकरांमधून आता एक सैतान निर्माण झालाय, त्याचं नाव आहे- ‘पिट बुल.’ हा ‘पिट बुल’ शरीराने अत्यंत दांडगा असतो. पण, तरीही त्याचा बांधा अटकर नि सुबक दिसतो. तो अत्यंत चपळ आणि शूर असतो. पण, त्याचे दात शार्कसारखेच मोठे नि तीक्ष्ण असतात. त्याचे डोळे म्हणजे तर साक्षात सैतानाचीच नजर असते. तो कमालीचा तापट असतो. कोणत्याही क्षुल्लक कारणाने तो संतापतो आणि समोर दिसेल त्याच्यावर झडप घालून त्याचे अक्षरश: लचके तोडतो. एकट्या अमेरिकेत २००५ ते २०१२ या काळातही ‘पिट बुल’च्या हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांची संख्या १५१ एवढी आहे. लक्षात घ्या, हे लोक ‘पिट बुल’ चावल्यामुळे विषबाधा होऊन, रेबीज होऊन मेलेले नाहीत, तर ‘पिट बुल’ने जागच्या जागी फाडल्यामुळे ठार झालेले आहेत. साधारणपणे, कुत्रा हा कितीही ताकदवान असला आणि कितीही संतापून त्याने माणसावर हल्ला केलेला असला तरी माणसाने एखाद्या काठीने त्याला झोडपायला सुरुवात केली, तर कुत्रा घाबरुन माघार घेतो. पण, ‘पिट बुल’चं तसं होत नाही. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधल्या संजय दत्तप्रमाणे (किंवा आपल्याकडच्या डाव्या विचारवंतांप्रमाणे) त्याच्या मेंदूत ‘केमिकल लोचा’ म्हणजे शास्त्रीय परिभाषेत ‘जेनेटिकल डिसऑर्डर’ निर्माण झालेली आहे. त्यामुळे शरीरावर काठीचे किंवा तत्सम वस्तूचे झालेले आघात त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचायला फार वेळ लागतो. एवढंच नव्हे तर त्याच्या अंगावर गोळी झाडली तरी तो लचके तोडणं थांबवत नाही. कारण, शरीरावर गोळीमुळे झालेली जखम तिची वेदना त्याचे मज्जातंतू त्याच्या मेंदूपर्यंत फारच उशिरा पोहोचवतात. तोपर्यंत त्याच्या चाव्यांनी त्याचा बळी ठार होऊन पडलेला असतो. मग संतापलेल्या ‘पिट बुल’ला शांत करण्याचा एकमेव उपाय काय, तर थेट त्याच्या डोक्यात गोळी घालणं. वर दिलेली ‘पिट बुल’च्या बळींची संख्या आपल्याला आपल्या देशातल्या विविध घटनांच्या संदर्भात अगदीच किरकोळ वाटेल, पण लक्षात घ्या की हा सैतानी कुत्रा पाळण्याची अमेरिकेत ‘फॅशन’ आली आहे. जुगारासाठी मूर्खपणे विज्ञान राबवण्यातून एक नवा राक्षस जन्मलाय!