माझे बालमित्र, वर्गमित्र सूर्यकांत शंकर आडकर यांचे २९ ऑॅक्टोबरला निधन झाले. त्यांचा दीर्घकाळ सहवास मला लाभला, हे मी माझे परमभाग्य समजतो. परमार्थ कसा करावा, याचा त्याच्यासारखा आदर्श मी माझ्या जीवनात अनुभवला नाही.
एक राजा होता. राज्य चालविताना रोज कटकटींशी त्याला सामना करावा लागत असे. राजमुकुटाला आतून काटे असतात, त्याचा अनुभव तो घेत होता. एके दिवशी तो आपल्या प्रधानाला म्हणाला, “किती कटकटी असतात, लोकांचे भांडणाचं विषय काही संपत नाहीत. एक विषय संपला की दुसरा विषय उभा राहतो. काय होणार आहे आपल्या राज्याचे?”
प्रधान म्हणाला, “आपण वेषांतर करून एक फेरफटका मारून येऊया.” दोघेही जण वेषांतर करून एका खेड्यात जातात. एक वृद्ध मोठा खड्डा खणत असतो. राजा त्याला विचारतो, “आजोबा, तुम्ही हा खड्डा कशासाठी खणता?” तो वृद्ध म्हणतो, “मी विहीर खणत आहे. इथे पाण्याचे दुर्भीक्ष आहे. या विहिरीमुळे ते थोडे कमी होईल.” राजा त्याला विचारतो, “आजोबा, तुमचे वय पाहता, ही विहीर कधी होणार आणि त्याला पाणी कधी लागणार आणि ते पाणी तुम्ही कधी पिणार, तोपर्यंत तुमचे जीवन संपेल.” आजोबा म्हणतात, “ही विहीर मी माझ्यासाठी खणत नाही. ही विहीर माझ्या नातवासाठी खणतो आहे.”
नंतर प्रधान राजाला म्हणतो, “महाराज, अशी माणसे समाजात असल्यामुळे कितीही भांडणे झाली तरी समाजाचा गाडा नीटच चालेल. आपल्या असण्या-नसण्याने काही फरक पडत नाही.”
माझे बालमित्र, वर्गमित्र सूर्यकांत शंकर आडकर यांचे २९ ऑॅक्टोबरला निधन झाले. त्यांना आम्ही सर्वजण ‘बंड्या’ म्हणत असू. हे बंड्या आडकर म्हणजे वरच्या कथेतील आजोबा होते. त्यांचा दीर्घकाळ सहवास मला लाभला, हे मी माझे परमभाग्य समजतो. परमार्थ कसा करावा, याचा त्याच्यासारखा आदर्श मी माझ्या जीवनात अनुभवला नाही.
गुंदवली ही छोट्या छोट्या खोल्या असलेल्या चाळींची वस्ती होती. साठच्या दशकात तेथे कसल्याही नागरी सुविधा नव्हत्या. वीज, पाणी, शौचालय कशाचाही मागमूस नव्हता. दहा बाय दहाच्या खोलीत आडकर कुटुंब राहत असे. वडील सोनार होते. सोनार कामाची मजुरी करायचे. सगळ्यांच्या घरात दारिद्य्र पाचवीला पुजलेले असायचे. अंगावरचे कपडे फाटून जात. त्यामुळे बंड्याचे शाळेत येणे बंद होई. त्यानंतर त्याची शाळा सुटली आणि तोही सोनार कामाला लागला.
सोनार काम करता करता त्याचा भाऊ विजय आणि त्याने गुंदवलीतच सोनार कामाचे दुकान टाकले. सोन्याच्या व्यवहारात प्रामाणिकपणा त्याने कधीही सोडला नाही. कारगिराचे लेणे त्याला जन्मजात प्राप्त झाले होते. कैक तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांवर कौशल्याने कलाकुसर करीत असताना त्याची एकाग्रता बघण्यासारखी असे.
बंड्याकडे जबरदस्त कलागुण होते. त्याच्या घरातील गणपतीची आरास अगदी जबरदस्त असे. वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून त्या छोट्या घरात गणपतीची मूर्ती विराजमान होत असे. अन्यत्र ठिकाणी न गायल्या जाणाऱ्या आरत्या त्याच्या गणपतीपूजनात होत असत. नाट्यसंगीताच्या चालीवर रचलेल्या त्या आरत्या होत्या. बंड्याच्या वडिलांना आम्ही ‘दादा’ म्हणत असू. त्यांच्याकडे जवळजवळ १९३५ सालापासूनच्या ग्रामोफोन रेकॉर्डचा संग्रह होता. बंड्यानेच आपल्या कल्पनेने ग्रामोफोनचा उभा बॉक्स तयार केला होता. खाली बसून तबकडी लावण्याची काही गरज नव्हती. त्याच्या कलाकुसर गुणांचा अधिक विकास झाला असता, थोडेसे प्रशिक्षण मिळाले असते तर तो केव्हाच सिनेमाचे प्रचंड सेट उभारणारा तज्ज्ञ झाला असता. एवढे कलाकौशल्य त्याच्याकडे होते.
दोन-चार वर्षांतून असे होई की, जवळचाच एखादा नातेवाईक सोनं घेऊन पसार होई. त्याची भरपाई बंड्या करीत बसे. दोन-चार वर्षांनी तोच माणूस जेव्हा दुकानात दिसे, तेव्हा मी त्याला विचारी,“याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी तू दुकानात का ठेवलास?”
तो सांगे,“याला जर पोलिसात दिला तर तो जीवनातून उठेल. माणूस आहे, तो मोहात पडतो, आपण विसरले पाहिजे.” असे किती जणांचे अपराध त्याने पोटात घातले असतील याची गणती करणे कठीण!
बहीण वासंतीचे लग्न झाले. बहिणीचे पती गिरणीत बदली कामगार म्हणून काम करीत. बदली कामगाराला महिनाभर काम नसते. बहिणीच्या सगळ्या संसाराची जबाबदारी बंड्याने उचलली. तिचे घर, मुलांचे शिक्षण, बंड्या निष्काम कर्मयोगाने करीत राहिला. कसलाही राग नाही, चीड नाही आणि जबाबदारीची ओझेही नाही. आजूबाजूच्या परिसरातील अडीअडचणीत सापडलेले बंड्याकडे येत. गुंदवलीच्या चाळीत एका खोलीत राहून किती जणांना आर्थिक मदत केली असेल याचा हिशोब नाही. व्यवहाराचा विषय नाही. पैसे परत मिळाल्याचा आनंद नाही, नाही मिळाले तर दु:ख नाही.
त्याचे हे अनेक विषय कळल्यानंतर कुठल्या रसायनाने याची जडणघडण झाली, याचे कोडे मला पडे. त्याचे लग्नही लवकर झाले आणि पत्नी म्हणजे एकनाथांच्या पत्नींची दुसरी आवृत्ती अशीच होती. पतीच्या ‘तुकारामी’ कामात ती सहधर्मचारणी होती. आम्ही सर्व एकत्रच वाढलो आणि खेळलो असल्यामुळे तिचा उल्लेख मी एकेरीच करत असे. आनंदी आणि समाधानाचे तेज तिच्या चेहऱ्यावर बघावे. कसली हौस नाही, मोठ्या घरात जाण्याची, फ्लॅटमध्ये जाण्याची महत्त्वाकांक्षा नाही. पतीच्या कामात पूर्ण समर्पण.
वयोमानाप्रमाणे वडील थकले, आजारी पडले, त्यांना अर्धांगवायू झाला. सर्व क्रिया अंथरूणावर कराव्या लागत. असे चार-पाच वर्षे चालले. वडिलांची सेवा कशी करावी आणि अर्धांगवायूने बिछान्यावर पडलेल्या सासऱ्याची काळजी कशी करावी, हे बंड्या आणि त्याच्या पत्नीकडून शिकावे. यानंतर काका आणि काकू वृद्ध झाल्यामुळे बंड्याच्याच घरी आले. घर तेव्हा थोडे मोठे झाले होते म्हणजे दहा चौरस फुटाने वाढले होते. ते निपुत्रिक होते. त्याच आत्मीय भावनेने या दोघांचा सांभाळ बंड्याने केला.
चाळीतील दोन खोल्यांच्या घरात बंड्या, विजय, काका-काकू आणि दोन्ही भावांची तीन-चार मुले असा हा संसार होता. सगळे आनंदी आपापल्या कामात मग्न आल्या गेल्यांचे आस्थेने स्वागत करणारे. बंड्याचं घर म्हणजे परिसरातील आधारवडच होता.
माझी आई १९९७ साली सेंट जॉर्जेस रुग्णालयात वारली. तेव्हा मी गुंदवली सोडून सहारला राहायला आलो होतो. सायंकाळी मी आईचे कलेवर घेऊन आलो. मी येण्यापूर्वीच बंड्या आला होता. सर्व अंत्यविधीची तयारी त्याने करून ठेवली होती. आईच्या गळ्यात घालण्यासाठी चांदीचं डोरलं घेऊन आला होता. मी त्याला विचारले, “हे कशासाठी?” त्यावर तो म्हणाला, “आई सवाष्ण आहे. तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र असणे आवश्यक आहे.” असे किती अंत्यविधी त्याने आत्मीय भावनेने केले असतील, हे नाही सांगता येणार.
जोगेश्वरीत काकांची चाळीत एक खोली होती. येथीलच शाखेचा कार्यवाह अंकुश पवार याच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न आला. बंड्याला म्हटले की, खोली मला दे. ती कशासाठी हवी आहे, ते मी त्याला सांगितले. बंड्याने खोलीची चावी मला दिली. व्यवहाराचा एक शब्दही त्याने काढला नाही. मुंबईत चाळीतील खोलीही अशी कुणी दुसऱ्याला देत नाही. सामान्य लोकांच्या व्यवहाराच्या पलीकडे जाणारा बंड्या एक महात्माच होता. तो आणि मी समवयस्क होतो. चौथीपर्यंत एकाच वर्गात होतो. त्याचे हस्ताक्षरही मोत्याच्या दाणयासारखे होते. चित्रकलेच्या बाबतीत तर विचारायला नको, पुढे आमच्या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. आज मला दरवर्षी मिळणारे मोमेन्टो (स्मृतिचिन्हे), शाली यांचे करायचे काय, असा प्रश्न पडतो. बंड्याला आयुष्यात एखादा मोमेन्टो किंवा एखादी शालही मिळाली नसेल, पण त्याचे कर्तृत्व मला मिळालेले सगळे मोमेन्टो आणि शाली त्याच्यावरून ओवाळून टाकाव्यात इतके मोठे आहे. तसा तो झाकलेले माणिकच राहिला. चिखलात उगविलेल्या कमळाप्रमाणे बघणाऱ्याला आनंद देत आणि सर्वांपासून अलिप्त. स्वत:चा संसार केला, मुलांचे संसार उभे केले, जगरहाटीप्रमाणे जी छोेटीशी मालमत्ता आहे तिच्यावर मूलं हक्क सांगू लागले. पण, बंड्या या सर्वांपासून मानसिकदृष्ट्या अलिप्त राहिला. सगळं काही केलं, पण कशात गुंतवणूक नाही. योगसाधना न करता योगित्व प्राप्त करणारा हा आगळावेगळा माणूस होता.
त्याचे वाचन, चिंतन, मनन फारसे नव्हते. तसेच अध्यात्माची आवड त्याला फारशी होती असे नाही, पण तो अध्यात्म जगत होता. गीतेतील निष्काम कर्मयोग त्याला माहीत नव्हता, पण निष्काम कर्मयोग जगत होता. निंदा, स्तुती, मान-अपमान याच्या पलीकडे जाणारे त्याचे व्यक्तित्व होते. समाजाची धारणा करणारा खऱ्या अर्थाने तो धारक होता. तो आणि मी एकाच वयाचे असल्यामुळे एकमेकांच्या पाया पडण्याचा प्रश्न नव्हता. पण आज मी अत्यंत विनम्र भावनेने, त्याच्या स्मृतिचरणास नमन करीत आहे.