सुरेंद्र थत्ते यांना २८ नोव्हेंबर, २०२० रोजी देवाज्ञा झाली. ही बातमी ऐकल्यानंतर क्षणभर मी सुन्न झालो. गेले अनेक दिवस माझ्या मनात या ना त्या प्रकारे त्यांची आठवण येत होती. त्यांना फोन केला पाहिजे, असेही वाटत होते. पण, गेल्या चार-पाच महिन्यांत सा. ‘विवेक’चे इतके विषय मागे लागले आहेत की, त्या विषयात गुंतल्यानंतर फोन करण्याचे राहून जायचे. त्यांच्याशी मला शेवटचे बोलता आले नाही, याची खंत मला दीर्घकाळ सोबत करीत राहील.
सुरेंद्र थत्ते आणि माझा संबंध १९७२ साली आला. तेव्हा ते मुंबई महानगराचे महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख म्हणून संघाची जबाबदारी पार पाडीत होते. मी, तेव्हा पार्ले नगराचा महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख होतो. सुरेंद्र थत्ते बीई झाले होते. नंतर ते दोन-तीन वर्षे संघाचे पूर्णवेळ काम करू लागले. तेव्हा ते गिरगावात राहत. महानगरभर त्यांचा प्रवास होई. त्यांच्या प्रवासात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बैठका, कार्यक्रम आणि त्यांचा बौद्धिक वर्ग होत असे. बैठक घेण्याची त्यांची स्वतंत्र शैली होती आणि त्यांचा बौद्धिक वर्गदेखील लहान-सहान किश्शांनी भरलेला असे. मिश्किलता हा त्यांच्या व्यक्तित्त्वाचा अविभाज्य गुण होता. बैठकीचे गंभीर वातावरण त्यांच्या हलक्या-फुलक्या विनोदाने खेळीमेळीचे होऊन जात असे. नंतर आणीबाणीचा कालखंड सुरू झाला. आणीबाणीच्या कालखंडात त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी आली आणि काही काळ त्यांचा माझा संबंध स्थगित झाला. आणीबाणी उठल्यानंतर मी गोरेगाव भागाचा कार्यवाह झालो. आणि एक-दोन वर्षांतच सुरेंद्र थत्ते बोरिवली येथे विश्रामयोग येथे राहायला आले. काही वर्षांनंतर मीदेखील बोरिवलीला राहायला गेलो. म्हणजे त्यांच्या घराजवळच माझे घर झाले.
महानगराचे काम माझ्याकडे आल्यानंतर सुरेंद्र थत्ते हेदेखील महानगर कार्यकर्ते म्हणून आमच्या टीममध्ये आले. तेव्हा त्यांच्याकडे बालविभागाची जबाबदारी होती. ही जबाबदारीदेखील त्यांनी त्यांच्या हसतखेळत शैलीत उत्तम प्रकारे पार पाडली. बालांची शिबिरे तेव्हा वेगळी होत. डिसेंबर महिन्यातील शिबिरांची व्यवस्था उभी करणे, शिबिराचे तंबू उभे करणे, अशी सगळी कामे स्वयंसेवकच करीत असत. सुरेंद्र थत्ते या सर्व कामांची देखरेख करीत. बालांचे शिबीर कार्यक्रम आणि संख्येच्या दृष्टीने यशस्वी होत असत. बॉम्बे सेंटरला त्यांचा वर्कशॉप होता. इलेक्ट्रानिक क्षेत्रातील उपकरणांचा व्यवसाय ते करीत असत. त्याचे ज्ञान मला काही नसल्यामुळे त्याविषयी मी काही लिहू शकत नाही. व्यवसाय किती वाढवायचा याची एक मर्यादा त्यांनी आखून घेतली होती. संघकामाला वेळ द्यावा लगतो आणि तो रोज द्यावा लागतो. महिन्यातून एक-दोन दिवस दिले असे चालत नाही. संघकामासाठी प्रवास करावा लागतो. तो बहुतेक स्वखर्चाने करावा लागतो. संघकामाला वेळ भरपूर राहील, एवढीच त्यांनी व्यवसायाची वाढ केली. त्यांची बुद्धिमत्ता आणि क्षमता व्यवसायाची शंभरपट वाढ करण्याची होती. पण, ठरवून त्यांनी ते केले नाही. बाहेरच्या जगतात याला ‘त्याग’ म्हणतात, संघात असली भाषा कुणी करीत नाही. संघकाम राष्ट्रकाम आहे आणि ते करणे म्हणजे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसला आला त्याग!
या दृष्टीने सुरेंद्र थत्ते न बोलताच सर्वांना आदर्श कार्यकर्ते झाले. असा जो कार्यकर्ता असतो, त्याचे बोलणे ऐकणारे कार्यकर्ते फार गंभीरपणे घेत असतात. त्याच्या बोलण्या आणि वागण्यात त्याची न दिसणारी तपस्या उभी असते. त्याचा प्रभाव सहजपणे ऐकणार्याच्या मनावर आणि बुद्धीवर होत असतो. त्यांच्या संपर्कात जे जे आले, ते नंतर फार मोठे कार्यकर्ते झाले आहेत. भाजपचे दिवंगत संघटनमंत्री शरद कुलकर्णी हे त्यांचे जवळचे मित्र झाले. शरद कुलकर्णी आणि सुरेंद्र थत्ते या दोन्ही कार्यकर्त्यांत एक समान गुण होता. तो म्हणजे, विनोद करण्यात आणि विनोदी किस्से सांगण्यात दोघेही वस्तादच होते. असे कार्यकर्ते आपल्या भोवती तरुणांचा गट उभा करतात.
त्यांनी उभ्या केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शरद कुलकर्णी, कनक त्रिवेदी, प्रमोद बापट, नंदा दोखले आणि गिरगावातील अन्य कितीतरी कार्यकर्ते यांची नावे घ्यावे लागतील. संघातील कार्यकर्ता बौद्धिक वर्ग ऐकून उभा राहत नाही. या कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत आणि पारिवारीक संबंध निर्माण करावे लागतात. मी, बोरिवलीला राहत असताना ते माझ्या घरी वारंवार येत. म्हाडातील माझे घर एका खोलीचे होते. पारिवारीक अडीअडचणीची ते दखल घेत आणि अबोलपणे त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत. असे अनेक विषय इतके व्यक्तिगत आहेत की, ते लिहिणेही अवघड आहे. असे जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी त्यांच्या संपर्कात येणार्या असंख्य कार्यकर्त्यांशी निर्माण केले. संघभाव कसा जगायचा असतो, हे त्यांनी जगून दाखविले.
संघकार्यकर्त्यांचा परिवार संघमय होतो, असे सर्वांच्या बाबतीत घडत नाही. काही कार्यकर्त्यांच्या घरात पत्नी, आई, मुले, संघाची होत नाहीत. त्यांचा कार्यकर्त्यांच्या कामाला विरोध सुरू होतो. सुरेंद्र थत्ते यांचे घर याला पूर्णपणे अपवाद होते. त्यांची आई राष्ट्र सेविका समितीचे काम करीत असे. पत्नी सुहासदेखील स्त्रीशक्तीच्या कामात सहभाग देत असत. त्याही इंजिनिअर आहेत आणि सुरेंद्रबरोबर वर्कशॉपमध्ये त्याही काम करीत असत. मुलगी जान्हवी तीन वर्षे समितीची प्रचारिका म्हणून नंदुरबार जिल्ह्यात गेली आणि मुलगा मिलिंद चार वर्षे संघप्रचारक म्हणून काम करीत राहिला. संघ परिवार कसा असतो, याचा चालताबोलता आदर्श म्हणजे सुरेंद्र थत्ते यांचे घर. त्यांच्या घरात पाऊल ठेवल्याबरोबर संघाची स्पंदने किंवा ‘मॅग्नेटिक व्हेव’ पाऊल ठेवणार्याच्या शरीरात संचार करीत. माझा हाच अनुभव आहे. आलेल्या कार्यकर्त्यांची आत्मीय भावनेने चौकशी, त्याचे स्वागत, चहापान, हे सगळे करण्यात कसलीही कृत्रिमता नसे. अशा प्रकारचे पारिवारीक जीवन उभे करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. परिवारातील प्रत्येक घटकाचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते. विचार आवडीनिवडी स्वतंत्र असतात. असा सर्वांच्या मनात संघभाव नित्याचा जागृत ठेवणे हे खरोखरच कठीण काम आहे.
भटके-विमुक्तांचे काम सुरू झाले. यमगरवाडीला प्रकल्प उभा राहिला. प्रारंभीच्या सात-आठ वर्षांत प्रकल्पात मुले वाढू लागली आणि त्यांचे निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, असे सगळे खर्चाचे विषय आ वासून उभे राहत गेले. सा. ‘विवेक’मधून या प्रकल्पाला अर्थसाहाय्य करण्याचे आवाहन येऊ लागले. एकदा सुरेंद्र थत्ते मला म्हणाले, “मला यमगरवाडीला यायचे आहे आणि देणगी द्यायची आहे.” ते यमगरवाडीला आले आणि त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली. व्यवसायातील एका कामामुळे त्यांना मोठे धन प्राप्त झाले, देणगी रूपाने ते त्यांनी प्रकल्पाला देऊन टाकले. त्यावेळेला प्रकल्पाला पैशाची जबरदस्त गरज होती. त्यावेळेस त्यांनी हे धन दिले. त्याचे मोल करता येणार नाही. अशा धनातून चारचाकी गाडी घ्यावी, सुखासीन जीवन जगावे, असा विचार त्यांच्या कधी मनात आला नाही. वयाची साठी झाल्यानंतर 60 हजार रुपयांची देणगी त्यांनी कल्याण आश्रमाला दिली.
नंतर मी, सा.‘विवेक’चे काम बघू लागलो. सा.‘विवेक’ची तेव्हाची आर्थिक स्थिती जेमतेम होती. रोजच्या व्यावहारिक भाषेत सांगायचे, तर सा. ‘विवेक’ तेव्हा गरिबीत होता. संपादकीय काम करीत असताना तत्कालिक घडामोडींविषयी भरपूर वाचन करावे लागते. मला ‘टाईम्स’ साप्ताहिक हवे होते. त्याची वर्गणी कैक हजारात होती. सा. ‘विवेक’ची क्षमता वर्गणी भरण्याची नव्हती. मी, सुरेंद्र थत्ते यांना सांगितले, त्यांनी दोन वर्षांची वर्गणी भरून टाकली आणि दर सप्ताहाला ‘टाईम्स’ माझ्याकडे येऊ लागला. आज सा.‘विवेक’ची अशी स्थिती राहिली नाही. सा.‘विवेक’ला या स्थितीला आणण्यामध्ये ज्या असंख्य संघकार्यकर्त्यांनी धनटॉनिक दिले आहे, त्यात सुरेंद्र थत्ते यांची गणना करावी लागते.
असे काम त्यांनी सा.‘विवेक’च्याच बाबतीत केले असे नाही. जागतिकीकरणाचा विषय सुरू झाल्यानंतर नवीन आर्थिक धोरण सुरू झाले. मुंबईतील अनेक कारखाने बंद झाले. त्यात काम करणारे अनेक संघकार्यकर्ते बेरोजगार झाले. सुरेंद्र थत्ते अशा कार्यकर्त्यांची यादी घेऊन असत आणि त्यांचे पुनर्वसन कसे होईल याची चिंता करीत असत. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी या काळात आर्थिक साहाय्य केले. अशा सर्व विविध गुणांमुळे त्यांची प्रतिमा सर्वांना हवाहवासा वाटणार्या कार्यकर्त्यात झाली. अशी स्वयंसेवकमान्यता मिळविणे हीदेखील साधी गोष्ट नव्हती.
नंतर त्यांच्याकडे प्रातांचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी आली. सर्व महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास सुरू झाला. तो कालखंड संघविचारांची समाजमान्यता वाढीचा कालखंड आहे. संघविचाराची माणसे राजसत्तेत येऊ लागली होती. सत्तेची अनुकूलता कार्याला मिळू लागली होती. नवनवीन प्रश्न उभे राहत गेले. त्या प्रश्नांना भिडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना उभ्या कराव्या लागल्या. पारंपरिक रचनेतून नवीन रचनेत जायचे आहे, याला ‘संधिकाल’ म्हणतात. सुरेंद्र थत्ते यांनी बदलत्या परिस्थितीची आव्हाने समजून घेतली आणि कालानुरूप ज्या जबाबदार्या आल्या, त्याही त्यांनी पार पाडल्या. संघशरणतेला त्यांनी कुठेही बाधा निर्माण होऊ दिली नाही.
सुरेंद्र थत्ते तसे असामान्य गुणांचे कार्यकर्ते होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरसांपासून ते बाल स्वयंसेकापर्यंत ते सहजपणे संवाद करू शकत असत. त्यांची संवादशैली, त्यांचे नर्म विनोद, कार्यकर्त्यांची सलगी देणे, सगळेच काही असामान्य होते. असामान्य असूनही ते कधी अलौकिक झाले नाहीत. सामान्य कार्यकर्त्याला कधी असे वाटले नाही की, सुरेंद्र थत्ते कुणीतरी मोठा माणूस आहे, त्याच्याशी कसे बोलावे, हा संकोच त्यांच्याबाबतीत कधी निर्माण झाला नाही. शेवटी एका वाक्यात सांगायचे तर सुरेंद्र थत्ते, सुरेंद्र थत्ते होते. त्यांच्यासारखे तेच होते.