मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेना आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्यानं जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, असा टोला भाजपाचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, आंदोलन करा, केसेस घ्या. तुमची किंमत नाही की तुम्हाला पक्ष आमदारकी देईल. तसेच एक वेळ अशी येईल की एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी संवाद साधल्याचे वृत्त आहे. मात्र यावर उर्मिला मातोंडकर यांचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. मराठी चेहरा आणि मराठी नाव असल्यानं उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. याशिवाय त्या कला क्षेत्रातून असल्यानं राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य उमेदवार आहेत.
उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणुकही लढवली. मात्र भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काही महिन्यातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही काँग्रेसनं त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. मात्र आपल्याला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचं कळतं. मात्र तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं समजतं.