पकडलेला बिबट्या मादी प्रजातीचा
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पावस ते पूर्णगड दरम्यानच्या पट्यात वाढलेल्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने गुरुवारी बिबट्याला जेरबंद केले. जेरबंद केलेल्या बिबट्या मादी प्रजातीचा असून साधारण सहा वर्षांचा आहे. गेल्या वर्षभरात पावस ते पूर्णगड पट्ट्यात बिबट्याच्या हल्ल्यात २० लोक जखमी झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून पावस ते पूर्णगड दरम्यानच्या पट्यात मानव-बिबट्या संघर्ष वाढला होता. गेल्या महिन्यात येथील जांभूळवाडी आणि मेर्वी-बेहेरे रस्त्यावर तीन व्यक्तींवर बिबट्याचा हल्ला झाला होता. शिवाय वर्षभरात बिबट्याचा आठ हल्ल्यांमध्ये एकूण २० जण जखमी झाले होते. यामध्ये बहुतांश दुचाकीस्वारांचा समावेश होता. वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मुंबईहून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या बिबट्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्यामार्फत या परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र, बिबट्याला पकडता आले नाही.
वन विभागाने पावस ते पूर्णगड दरम्यानच्या पट्यामध्ये खास करुन जांभूळआड, मेर्वी, बेहेरे या गावात पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप लावले होते. यामधील बेहेरे गावात लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी सकाळी बिबट्या अडकल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड यांनी दिली. पशुवैद्यकांच्या तपासणीनंतर सहा वर्षांच्या या मादी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची माहिती वन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.