नवी दिल्ली : भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने मंगळवारी राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भारताचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांशी सखोल चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा सामरिक करार करण्यात आला. जगाला चीनचा असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने आघाडी उघडली असून भारतानेही हालचाली सुरू केल्या आहेत.
"इंडो-अमेरिका बेसिक एक्सचेंज अॅन्ड कॉ-ऑपरेशन एग्रीमेंट" या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार दोन्ही देशात सॅटेलाईट छायाचित्रे, गोपनीय माहिती, जिओ स्पॅटिअल इंटेलिजन्स (पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टी, स्थान, वस्तू यांची गोपनीय माहिती), नकाशे या माहितीचे आदानप्रदान होणार आहे. याचा भारताला मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे . विशेष म्हणजे, भारताची संरक्षण सिद्धता वाढणार आहे. या बैठकीकडे चीन बारीक लक्ष ठेवून होता.
भारत आणि अमेरिकेत परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री स्तरावरील ही तिसरी बैठक होती. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माईक पोम्पेओ आणि मार्क एस्पर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मोदींशी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली.