राष्ट्रवादी पक्ष आज अभंग आहे, उद्या त्याची स्थिती काय असेल? उद्धवसेनेत शिवसैनिक किती राहतील? हे सगळे भवितव्यातील प्रश्न आहेत. खडसे यांच्या निदानाप्रमाणे सर्व काही ठीक चालले तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्याची अवस्था होईल.
भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत सामील होणार आहेत. गेले सहा महिने एकनाथ खडसे भाजप सोडणार आणि राष्ट्रवादीत जाणार, अशा बातम्या उठत होत्या. अनेक वेळा एकनाथ खडसे यांनी या बातम्यांचे खंडनही केले. ‘मी, भाजपत आहे आणि भाजपतच राहणार आहे,’ असे ते म्हणत राहिले. अखेरशेवटी त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. ते भाजपतून राष्ट्रवादीत गेले, तरी एकनाथ खडसे हे आपले आहेत आणि आपलेच राहणार आहेत. सा. ‘विवेक’ आणि एकनाथ खडसे यांचे संबंध जवळजवळ ३० वर्षांपासूनचे आहेत. सा. ‘विवेक’च्या प्रत्येक प्रकल्पात त्यांचा अर्थपूर्ण सहयोग राहिलेला आहे. ‘विवेक’विषयी त्यांना आस्था होती आणि ममत्वदेखील होते. असे ३० वर्षांचे संबंध दोर कापून दिल्यासारखे तोडता येत नाहीत. त्यांच्याविषयी आमच्या मनात सदैव आदराचीच भावना राहील. एका विशिष्ट परिस्थितीत त्यांनी भाजप सोडला आहे. त्याचे चर्वितचर्वण सर्वच माध्यमांतून मोठ्या प्रमाणात चालले आहे, ते सर्व आपण जाणतोच. लोकशाही राज्यपद्धतीत वेगवेगळे पक्ष असतात, पक्षात नेते असतात. त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असते. महत्त्वाकांक्षेशिवाय कुणालाही राजनेता होता येत नाही. राजनेता ही काही साधुगिरी नव्हे. एक छाटी, कमंडलू, पायात खडावा, डोक्याचे मुंडन, या वेषात राजकारणी होता येत नाही. राजकारण म्हणजे राजलक्ष्मी. ही राजलक्ष्मी मिळवायची असते. म्हणून राजनेता सत्ताकांक्षी असावा लागतो; अन्यथा त्याने राजकारण करू नये.
राजकीय पक्ष सत्तेवर जाण्याचे एक साधन असते. पक्षाची विचारसरणी असते. कार्यक्रम असतो. त्या मार्गाने जनआंदोलने करून लोकांचा पाठिंबा मिळवून निवडणुकीच्या माध्यमाने सत्तेवर जाता येते. यासाठी राजकीय पक्षांना सतत जनताभिमुख राहावे लागते. कधी कधी सत्तेची वाट अनेक वर्षे बघत बसावी लागते. एकनाथ खडसे या सर्व प्रक्रियेतून गेले आहेत. भाजपत त्यांनी दीर्घकाळ काम केले. स्वतःचा जनाधार निर्माण केला. आपल्या क्षेत्रात भाजपचे स्थान निर्माण केले. एक राजनेता म्हणून स्वतःची प्रतिमा तयार केली. मंत्री म्हणून अत्यंत कार्यक्षम राहून त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला. नोकरशाहीवर त्यांची पकड विलक्षण होती. असा कष्टाळू, राजकीय गुणवत्तेने फार मोठा असलेला माणूस भाजप सोडून जाताना अनेकांना दुःख होणे, अत्यंत स्वाभाविक आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ते व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे ज्या पक्षात जाणार आहेत, त्याचे नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ आहे आणि ज्या पक्षातून ते जाणार आहेत, त्या पक्षाचा ‘राष्ट्रवाद’ हा कणा आहे. ज्या राष्ट्रवादीत ते जाणार आहेत, तो पगडी-पागोट्यांचे राजकारण करणारा पक्ष आहे. बारामती ते बार्शी हा त्यांचा भूगोल आहे आणि जातीय समीकरणे ही त्यांची राजकीय विचारसरणी आहे. ब्राह्मणद्वेष हा त्यांचा श्वास आहे. हिंदुत्वाची अवहेलना हा त्यांचा स्वभाव आहे. अशा घरात एकनाथ खडसेंना जाऊन राहायचे आहे.
ते ज्या संस्कारात वाढले ते संस्कार हे शिकवितात की, ‘जननी जन्मभूमी स्वर्ग से महान हैं’ राष्ट्र प्रथम नंतर सर्वकाही. जातीचा विचार करायचा नाही. नागरिकांचा विचार करायचा. जातीची समीकरणे मांडायची नाहीत. सर्व जनसुखाय राजकारण करायचे. ब्राह्मणांचा द्वेष करायचा नाही. त्यांना सहभागी करून घ्यायचे. सामाजिक समरसतेला विसरायचे नाही. दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांना न्याय द्यायचा. हे ‘राष्ट्रवादी राजकारण’ आहे. एकनाथ खडसे हे राजकारण राष्ट्रवादीत कसे खेळणार? तेथे ‘राष्ट्रवादी’ नावात आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात द्वेष आणि घृणावादी राजकारण आहे. एकतर एकनाथ खडसेंना ते शिकून घ्यावे लागेल, त्याचा अंगीकार करावा लागेल, तसे वागावे, बोलावे लागेल, म्हणजे उद्धव ठाकरे आज जे करीत आहेत, ते त्यांना करावे लागेल. एकनाथ खडसे असे करू शकतील का? भाजपतील त्यांचे संस्कार हे वरवरच्या कपड्यासारखे नाहीत. आज घातलेले कपडे आपण दुसर्या दिवशी बदलतो. संस्कार आणि विचारधारा अशी बदलता येत नाही. त्यामुळे खडसेंपुढे दुसरा मार्ग आहे तो म्हणजे राष्ट्रवादीला खर्या अर्थाने ‘राष्ट्रवादी’ करण्याचा. पण, जोपर्यंत ‘काका’ राष्ट्रवादीत आहेत, तोपर्यंत ही गोष्ट शक्य नाही. काका अत्यंत धूर्त आहेत. ते इतर पक्षातील अशी माणसे आपल्या पक्षात आणत असतात. लक्ष्मण माने, रामदास आठवले इत्यादींना त्यांनी जवळ आणले. भाजपचे जयसिंग गायकवाड यांनाही जवळ केले आणि खासदार केले. ब्राह्मणविरोधी राजकारणात त्यांचा उपयोग करून घेतला. ज्या दिवशी त्यांचा हा उपयोग संपला, तेव्हा ते नामशेष झाले. जयसिंग गायकवाड या नावाचा कुणी मोठा नेता भाजपत होता, हे आता नव्या पिढीला माहीतही नाही. रामदास आठवले भाजपबरोबर असल्यामुळे त्यांचे नाव अधूनमधून झळकत राहते. काकांना एकनाथ खडसे आपल्या पक्षात हवे आहेत. कारण, ब्राह्मणांविरुद्ध लढण्यासाठी ते एक हत्यार म्हणून त्यांचा उपयोग आहे. ज्या दिवशी हा उपयोग संपेल, त्यादिवशी खडसे कुठे असतील, हे सांगता येत नाही. काकांना आपला उपयोग ब्राह्मणद्वेषासाठी करू द्यायचा की नाही, हे खडसेंनी ठरवायचे आहे. ते जर हत्यार झाले, तर हळूहळू या हत्याराची धार बोथट होत जाईल आणि मग हे हत्यार फेकून द्यावे लागेल.
महाराष्ट्राचा आजवरचा इतिहास असा आहे की, जो काकांबरोबर गेला, त्याचा ‘नारायण’ झाला. ‘काका, काका, मला वाचवा,’ अशी आरोळी ठोकूनही काही उपयोग होत नाही. म्हणून असे नम्रपणे म्हणावेसे वाटते की, पक्ष निवडण्यात एकनाथ खडसे यांनी घाई केली आहे. सगळ्यात उत्तम मार्ग होता तो स्वतःचा पक्ष काढण्याचा, स्वतःची ताकद उभी करण्याचा. काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून ‘बांगला काँग्रेस’ स्थापन केली. नंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना वाटले की, प्रणवदा काँग्रेसमध्येच हवेत. वाटाघाटी झाल्या आणि प्रणवदांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. त्यांना केंद्रीय मंत्रिपदे मिळाली. राष्ट्रपतिपद मिळाले. चाणाक्ष राजकारणी या मार्गाने जातो. व्ही. पी. सिंग यांनी काँग्रेस सोडली आणि ‘जनता दल’ निर्माण केले. ते पुढे देशाचे पंतप्रधान झाले. एकनाथराव खडसे यांना माझ्यापेक्षाही अधिक अशा राजकारणाची माहिती आहे. आज ते राष्ट्रवादीत जातील, त्यांना मंत्रिपदही मिळेल. ते कार्यक्षम असल्यामुळे त्यांचे खाते खूप चांगल्या प्रकारचे काम करील. परंतु, प्रश्न असा आहे की, हे महाआघाडीचे सरकार पाच वर्षे अधिकारावर राहील का? आणि राहिल्यास पाच वर्षांनंतर त्यांची स्थिती काय होईल? राष्ट्रवादी पक्ष आज अभंग आहे, उद्या त्याची स्थिती काय असेल? उद्धवसेनेत शिवसैनिक किती राहतील? हे सगळे भवितव्यातील प्रश्न आहेत. खडसे यांच्या निदानाप्रमाणे सर्व काही ठीक चालले तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर ‘आगीतून फुफाट्यात’ पडल्याची अवस्था होईल.
भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. ही विचारधारा संघाची विचारधारा आहे. संघाच्या विचारधारेत पक्षबदल करणार्यांविषयी स्नेहाची भावना कार्यकर्त्यांच्या मनात राहत नाही. त्यानंतर ‘पुनर्वसन’ हा विषय अवघड होतो. याचाही विचार खडसे यांनी नक्कीच केला असेल. येणारा कालखंड भाजप स्वबळावर उभा राहण्याचा कालखंड आहे आणि तसा निर्धार तळागाळातील कार्यकर्त्यांचा आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेला विश्वासघात सर्वांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांना कुणी क्षमा करणार नाही. प्रारंभी असे म्हटले की, एकनाथ खडसे आपले आहेत आणि आपलेच राहणार आहेत, हेदेखील खरे आहे. राष्ट्रवादाचे संस्कार पुसून टाकणे अशक्य आहे. असे वाटते की, त्यांना पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न अधिक जोरकसपणे व्हायला पाहिजे होता, तो केला नसेल असे म्हणायचे नाही. पण, तो प्रयत्न खडसेंना पक्षात थांबवून ठेवण्यास यशस्वी झाला नाही, हेदेखील खरे. त्याचे संदेश चांगले जात नाहीत. भाजपला पाण्यात पाहणारे त्याचे विवरण जातीच्या आधारे करणार. तशी संधी त्यांना न देण्यात शहाणपण होते. पण, जे झाले ते झाले. जो रागावून दुसर्याच्या गडीत गेला आहे, त्याला परत आपल्या गडीत आणण्याचे प्रयत्न आपण चालू ठेवले पाहिजेत. संभाजी महाराज असेच रागावून मुघलांना जाऊन मिळाले होते. महाराजांच्या दूतांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणले. ‘मोघली पक्ष’ आणि ‘स्वराष्ट्र पक्ष’ यातील हा फरक आहे.