उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर हरदोई जिल्ह्यात संदिला नामक गावात ‘सियाल मॅन्युफॅक्चर्स’ या भारतीय कंपनीच्या सहकार्याने ‘वेब्ली अॅण्ड स्कॉट’ उर्फ ‘डब्ल्यू अॅण्ड एस’ ही प्रसिद्ध कंपनी पॉईंट ३२ बोअरची रिव्हॉल्व्हर्स बनवायला प्रारंभ करणार आहे.
ग्रेट ब्रिटन हा देश इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि अर्धा आयर्लंड या चार देशांचा मिळून झालाय, हे आपल्याला माहीतच आहे. इंग्लंडमध्ये वेस्ट मिडलँड्स नावाचा एक प्रदेश आहे. त्यात बर्मिंघम हे प्रसिद्ध शहर आहे. आपण स्पेलिंगनुसार त्याचा ‘बर्मिंगहॅम’ असा उच्चार करतो, तो अर्थातच चुकीचा आहे. २५-३० वर्षांपूर्वी मुंबईच्या मांटुगा भागात तामिळ भाषक लोक मोठ्या संख्येने राहायचे आणि ते माटुंग्याला ‘माटुंगम्’ म्हणायचे. तसंच हे ‘बर्मिंगम’ किंवा ‘बर्मिंघम.’ बर्मिंघम शहरात एक फार नामांकित विभाग आहे, तिथे पिस्तुलं, बंदुका, रिव्हॉल्व्हर्स बनविण्याचा व्यवसाय गेली ४०० वर्षे सुरू आहे. म्हणून त्याचं नावच मुळी ‘गन क्वार्टर.’ जिथे गोल्डस्मिथ किंवा सोनार राहतात, ती सोनार आळी, जिथे ब्लॅक स्मिथ किंवा लोहार राहतात, ती लोहारआळी. तसे जिथे ‘गन स्मिथ’ किंवा ‘गन मेकर’ राहतात आणि बंदुका बनवतात, तो ‘गन क्वार्टर.’
बर्मिंघमच्या गन क्वार्टरमध्ये कुशल कारागीर उत्तम दर्जाच्या बंदुका बनवत होते आणि तत्कालीन इंग्लंडमध्ये चालू असलेल्या यादवी युद्धातल्या दोन्ही पक्षांना पुरवत होते, असा पहिला उल्लेख आहे सन १६३० सालचा. लक्षात आलं का? त्या साली आपल्याकडे शिवरायांचा जन्म झाला. तर त्या बर्मिंघम गन क्वार्टरमधली, सन १७९० साली स्थापन झालेली ‘वेब्ली अॅण्ड स्कॉट’ ही प्रख्यात बंदुका बनविणारी कंपनी आता भारतात आपली शाखा उघडणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहरापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर हरदोई जिल्ह्यात संदिला नामक गावात ‘सियाल मॅन्युफॅक्चर्स’ या भारतीय कंपनीच्या सहकार्याने ‘वेब्ली अॅण्ड स्कॉट’ उर्फ ‘डब्ल्यू अॅण्ड एस’ ही प्रसिद्ध कंपनी पॉईंट ३२ बोअरची रिव्हॉल्व्हर्स बनवायला प्रारंभ करणार आहे. आपल्याकडे बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, मशीनगन इत्यादी हत्यारांबद्दल लोकांना प्रचंड कुतूहल आहे. पण, तितकंच त्याबद्दल घोर अज्ञानही आहे. वीर सावरकरांनी मोठ्या हिकमतीने लंडनहूून भारतात २० ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली. त्यातल्याच एका पिस्तुलाने १९०९ साली वीर अनंत कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सन याला उडवलं, वगैरे हकिकत आपण डोळे विस्फारून वाचतो. पण, ब्राउनिंग पिस्तूल म्हणजे काय? मुळात पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर यात फरक काय? हे आपलं कुतूहल कधीच शमत नाही. त्याबद्दलची माहिती दिलीच जात नाही.
शिवरायांनी आग्रा भेटीवर निघण्यापूर्वी स्वराज्यात शिल्लक राहिलेल्या बारा किल्ल्यांची कसून मजबूती केली. कुठेही गोड्या आणि उडत्या हत्यारांची अजिबात उणीव राहू दिली नाही, म्हणजे नेमकं काय? गोडी आणि उडती हत्यारं म्हणजे काय? मला राज कपूरच्या १९६० सालच्या ‘जिस देश में गंगा बहती हैं’ या चित्रपटातला प्रसंग आठवतो. डाकूंचा सरदार जखमी होऊन विव्हळत असतो. तो नायक राज कपूरला विचारतो, “तुझ्याकडे एखादं हत्यार आहे का?” मठ्ठ राज कपूरचा चेहरा ‘हत्यार’ हा शब्द ऐकल्यावर आणखीनच ‘बावळट’ होतो. तो आपल्या पोटलीतून एक मोठासा चमचा काढून त्या सरदारासमोर धरतो. आपल्या एकंदर समाजाची स्थिती त्या राज कपूर सारखीच होती. किंबहुना, ती मुद्दाम तशी करण्यात आली होती, असं वाटतं. भारतीय समाजाने म्हणजेच हिंदू समाजाने हत्याराबित्यारांची माहितीसुद्धा करून घेऊ नये. आम्हाला जगाला प्रेम आणि शांती यांचा संदेश द्यायचाय, आम्हाला काय करायचीत हत्यारं? या प्रेमाचा इतका अतिरेक झाला होता की, मला आठवतंय, मी कॉलेजात गेल्यावर मोठ्या उत्साहाने ‘एनसीसी’ म्हणजे ‘नॅशनल कॅडेट कोअर’मध्ये गेलो. कारण, तिथे ‘डमी गन’ घेऊन का होईना परेड करायला मिळायची. सैनिकी जीवनाचा किंचितसा अनुभव मिळायचा. पण, माझ्या बरोबरची पोरं मला नाक मुरडून ‘एनएसएस’ म्हणजे ‘नॅशनल सोशल सर्व्हिस’मध्ये गेली. कशासाठी? समाजाची सेवा करायला नव्हे; तर तिथे पोरी असतात म्हणून! थेट राज कपूर स्टाईल! चित्रपटांनी समाजाला पराक्रमाकडे वळविण्याऐवजी लंपटपणाकडे वळविलं! असो, तर ‘वेब्ली अॅण्ड स्कॉट’च्या निमित्ताने आपण जरा हत्यारांची निदान माहिती तरी घेऊया. गोडी हत्यारं म्हणजे, तलवार, भाला, कट्यार, खंजीर इत्यादी पारंपरिक हत्यारं आणि उडती म्हणजे गन पावडर उर्फ बारूद हिच्या साहाय्याने उडणारी हत्यारं म्हणजेच फायर आर्म्स. ‘तलवारीचं तिखट पाणी शत्रूला पाजणे,’ असा वाक्प्रचार असूनही तिला गोडं हत्यार का म्हटलंय, कोण जाणे! इतकंच नव्हे, तर फटाके वगैरेंसाठी वापरल्या जाणार्या शोभेच्या दारूलासुद्धा ऐतिहासिक कागदपत्रांत ‘गोडी दारू’ म्हटलंय.
आता या गन पावडरचा शोध चीनमध्ये लागल्यामुळे पहिली बंदूक किंवा पिस्तूलही चीनमध्ये निघालं, हे सध्या तरी मान्य करावं लागतं. चीनच्या हेलिआँग-जिआँग प्रांतात एक फुटापेक्षा थोडं लांब आणि साडेतीन किलो वजनाचं एक धातूचं नळकांडं सापडलं आहे. गन पावडरचा हलकासा स्फोट करून त्या धक्क्याने नळकांड्यातून समोरच्या शत्रूवर दगड किंवा तत्सम वस्तूंचा मारा त्यातून केला जात असावा, असं दिसतं. त्याचा काळ ठरवला गेलाय सन १२८८. आधुनिक जगाला, निदान आज तरी हेच पहिलं पिस्तूल म्हणून ज्ञात आहे. या काळात आपल्याकडे देवगिरीचा राजा रामदेवराव यादव राज्य करीत होता. पुढे सन १२९४ मध्ये अल्लउद्दीन खिलजीने त्याचा पराभव केला. कौटिल्य अर्थशास्त्रात ‘उद्धाटिम’ अशा एका शस्त्राचा उल्लेख आहे. पण, त्या वर्णनाचं हत्यार अजून उत्खननात सापडलेलं नाही. चीनमधून ही गन पावडर थेट युरोपमध्ये कशी पोहोचली, हे माहीत नाही. पण, पोहोचली खरी आणि मग बेल्जियम, इटली, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, प्रशिया इत्यादी देशांमधले हुन्नरबाज कारागीर या गन पावडरचा वापर करून विविध प्रकारच्या ‘हॅण्ड गन’ म्हणजे एका हाताने समोरच्यावर प्रहार करता येईल, अशी हत्यारं बनविण्याच्या मागे लागले. झेक, जर्मन, इटालियन, फ्रेंच अशा विविध भाषांमध्ये वेगवेगळा उच्चार होणार्या ‘पिस्ताला’ म्हणजे ‘पोकळ नळी’ या शब्दामधून अखेर ‘पिस्तोल’ किंवा ‘पिस्तूल’ हा शब्द रूढ होत गेला. एका पोकळ नळीतून, गन पावडरच्या धक्क्याने, काहीतरी संहारक वस्तू, बर्यापैकी लांब अंतरावरच्या शत्रूवर फेकता येते, हे एकदा लक्षात आल्यावर पिस्तूल या छोट्या हॅण्ड गनसोबतच मॅचलॉक गन, फ्लिटं गन, मस्केट अशा लांब नळीच्या, लांबपल्ल्यांच्या बंदुकांचाही झपाट्याने शोध लागला. आपण या सर्वांनाच ‘ठासणीच्या किंवा तोड्याच्या बंदुका’ म्हणायला हरकत नाही.
मुळात ‘बंदूक’ हा शब्द अरबी आहे. ‘क्रॉस बो’ नावाचा धनुष्याचा एक विशिष्ट प्रकार आहे. त्यातून जे अणकुचिदार, टोकेरी पदार्थ शत्रूवर नेम धरून मारायचे, त्यांना अरब धनुर्धारी सैनिक म्हणायचे ‘बुंदूक.’ हळूहळू ते त्या धनुष्याला आणि मग त्याची जागा घेतलेल्या ‘गन’लापण ‘बुंदूक’ म्हणू लागले. अरबीतून तुर्की, तुर्कीतून फारसी आणि फारसी ही भारतातल्या सुलतानी राजवटींची भाषा असल्यामुळे हिंदुस्थानी आणि मराठीतही ‘बंदूक’ हा शब्द पूर्णपणे रूढ झाला. बंदुकीपेक्षाही लांबपल्ल्यावर आणि भारी मारा करणारं, उडतं हत्यारही अर्थातच प्रगत होत गेलं. भारतात सन १३६८ या वर्षी महंमदशाह बहमनी या सुलतानाने, अडोणी हे कर्नाटकातलं राज्य जिंकण्यासाठी, तुर्कस्तानातून आणलेल्या या नव्या हत्याराचा सर्वप्रथम वापर केला. त्या हत्याराला तुर्की भाषेत नाव होतं, ‘तोप!’ आणि ती हाताळणारा तो तोपची! ही मूळ तोप आता ‘तोफ’ बनली. महत्त्वाकांक्षी इंग्रजांंनीही पोर्तुगीज, जर्मन, इटालियन यांच्याप्रमाणेेच आपल्या तोफा-बंदुकांमध्ये अधिकाधिक सुधारणा सुरू केल्या. त्यात त्यांना यशही मिळत गेलं. आठवतंय ना? पन्हाळगडच्या वेढ्यासाठी सिद्दी जौहरने राजापूरकर इंग्रजांना तोफा घेऊन मदतीला बोलावलं, पोर्तुगिजांना नव्हे! आणि याच लांबपल्ल्याच्या बंदुका आणि तोफांच्या बळावर इंग्रजांनी अखेर एक दिवस आमचा हा खंडप्राय देश गिळून टाकला. भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध केलेली १८५७ सालची सशस्त्र क्रांती इंग्रजांनी ज्या ‘ली एनफिल्ड’ उर्फ ‘पॉईंट थ्री नॉट थ्री’ या रायफलच्या जोरावर चिरडून टाकली, ती रायफल ‘वेस्टली रिचर्ड्स’ या बर्मिंघमच्या गन क्वार्टरमधल्या प्रसिद्ध कारखान्यात बनत असे. बर्मिंघमध्ये उडत्या हत्यारांचे असे अनेक कारखाने होते, ज्यांनी पुढे पहिल्या आणि दुसर्या महायुद्धातही ब्रिटिश सैन्यासाठी भरपूर शस्त्रास्त्र उत्पादन केलं.
शस्त्रास्त्रांमध्ये सुधारणा करण्यात, पुढच्या काळात, युरोपीय देशांपेक्षा अमेरिका पुढे निघून गेली. एका चेंबरमधून एक गोळी झाडणार्या पिस्तुलाचं, सहा चेंबर्समधून सहा गोळ्या लागोपाठ झाडू शकणार्या रिव्हॉल्व्हरमध्ये रूपांतर केलं, ते सॅम्युअल कोल्ट या अमेरिकन संशोधकाने. तसंच सावरकरांनी जी ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली, त्या ब्राउनिंग कंपनीचा मालक आणि संशोधक उत्पादक जॉन ब्राउनिंग हासुद्धा अमेरिकन होता. होरेस स्मिथ आणि डॅनियल वेसन यांची ‘स्मिथ अॅण्ड वेसन’ ही कंपनीसुद्धा अमेरिकनच. ‘मॉवजर’ या सुप्रसिद्ध कंपनीचा मालक संशोधक पॉल मॉवजर हा मात्र जर्मन होता. लक्षात आलं का? चंद्रशेखर आझाद मॉवजर पिस्तूल वापरत असत. भारतात मात्र असं घडलं की, १८५७च्या क्रांतीने आणि त्यात भारतीय सैनिकांनी ज्या सफाईने इंग्रजी बंदुका आणि तोफा हाताळल्या ते पाहून इंग्रज हादरले. त्यांनी १८७८ साली शस्त्रास्त्रबंदी कायदा केला आणि त्यांची अत्यंत कठोर अंमलबजावणी करून, भारतीयांच्या हातातली गोडी नि उडती, सगळीच हत्यारं काढून घेतली. त्यांना स्वतःला लागणारी हत्यारं बनविण्यासाठी त्यांनी बंगालमध्ये ईशापूर इथे एक रायफल फॅक्टरी उघडली. पुढे त्यांनी एक ‘ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड’ निर्माण करून देशातल्या सर्व उडत्या हत्यारांचं उत्पादन फक्त आपल्याच हातात ठेवलं. इंग्रजी सत्ता जाऊन आता ७५ वर्षं झाली, तरी ही स्थिती अशीच होती. आता मात्र ‘वेब्ली अॅण्ड स्कॉट’ कंपनी पॉईंट ३२ कॅलिबरची पिस्तुलं भारतात निर्माण करणार आहे.