तैवानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनतेने, चीनला आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असे स्पष्टपणे बजावले आहे. चीनच्या विस्तारवादास तोंड देण्याची सर्व ती सिद्धता भारताकडून सुरू आहे. भारतीय जनताही सरकारच्या बाजूने पूर्णपणे उभी आहे.
चीनच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधात भारत ठामपणे उभा राहिल्याने चीनचा जळफळाट होत असल्याचे दिसून येत आहे. भारतासमवेत संघर्ष करण्याची तयारी चीनने चालविली असल्याचे दिसून येत असले तरी भारतानेही चीनला त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणे सुरू ठेवल्याने चीनने भारतासमवेत चर्चा सुरू ठेवली आहे. भारतही चीन विरुद्ध ठामपणे उभा राहिल्यानेच चीनने बोलणी करून उभय देशांमधील सीमावादावर मार्ग काढण्याचे ठरविलेले दिसते.
चीनने भारताच्या सीमेवर ६० हजार सैनिक तैनात ठेवले असल्याची माहिती अमेरिकेने अलीकडेच दिली आहे. पण, चीनच्या कोणत्याही अरेरावीला भारत सरकारच नव्हे, तर भारतीय जनताही भीक घालत नसल्याचे भारतीय जनतेने तैवानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चीनला दाखवून दिले आहे.
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच, १० ऑक्टोबर या दिवशी तैवानचा स्वातंत्र्यदिन होता. त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन राजधानी दिल्लीत तैवानच्या स्वातंत्र्यदिनास शुभेच्छा देणारे फलक विविध ठिकाणी झळकले. एवढेच नव्हे, तर समाज माध्यमावर अनेकांनी तैवानी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीयांनी दिलेल्या शुभेच्छांचे तैवानने स्वागत केले असले तरी या कृतीमुळे चीनचा मात्र राग अनावर झाला. एक चीन धोरणास आव्हान देऊन भारत आगीशी खेळत आहे, अशी टीका चीनच्या शांघायमधील एका भाटाने व्यक्त केली आहे.
तैवानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील चिनी दूतावासासमोर तैवानला शुभेच्छा देणारे फलक झळकले होते. दिल्ली भाजपचे नेते तजिंदरपाल सिंह बग्गा यांच्या नेतृत्वाखाली हे फलक झळकले होते. या फलकांपासून प्रेरणा घेऊन समाज माध्यमावरून असंख्य नेटिझन्सनी तैवानला स्वातंत्र्यदिनानानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तैवानला भारतीय जनतेकडून शुभेच्छा दिल्या जाण्याची कुणकुण लागलेल्या चीनने भारतीय माध्यमांना असे काही न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. तैवान हा वेगळा देश असल्याचे ज्याद्वारे ध्वनित होईल, अशी भाषा न वापरण्याचा सल्लाही चीनकडून भारतीय माध्यमांना देण्यात आला. जगामध्ये केवळ एकच चीन असून, तैवान हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे चीनने लक्षात आणून दिले.
ही वस्तुस्थिती संयुक्त राष्ट्रांनीही ठरावाद्वारे मान्य केली आहे, असेही चीनने म्हटले होते. चिनी दूतावासाने माध्यमांना ज्या सूचना पाठविल्या होत्या, त्यासंदर्भात आपल्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यात उत्तर देऊन हा मुद्दा निकालात काढला. ते म्हणाले की, “भारतात माध्यमांना स्वातंत्र्य असून त्यांना जे योग्य वाटते त्यानुसार ते वृत्त देत असतात.” अनुराग श्रीवास्तव यांनी असे स्पष्ट सांगूनही आपला हेका सोडण्यास चीन तयार नाही.
तैवानबाबत भारत सरकारचे जे धोरण आहे, त्याच्याशी भारतीय माध्यमांनी चिकटून राहावे, अशी आशा चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे. तैवानचा उल्लेख स्वतंत्र देश असा किंवा ‘रिपब्लिक ऑफ चायना’ असा केला जाऊ नये, तसेच तैवानच्या नेत्याचा उल्लेख ‘प्रेसिडेंट’ असा केला जाऊ नये, असे चीनकडून सांगण्यात आले. अशा प्रकारची कृती करून सर्वसामान्य जनतेत चुकीचे संदेश पसरविले जाऊ नयेत, असे चीनने म्हटले होते.
पण, चीनच्या असल्या धमक्यांना न घाबरता भारतीय जनतेने चिनी दूतावासाच्या नाकावर टिच्चून तैवानी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनतेने तैवानी जनतेला दिलेल्या शुभेच्छा लक्षात घेऊन तैवानी परराष्ट्र खात्यानेही या कृतीचे स्वागत केले आहे. भारतीय लोकशाही, प्रभावी माध्यमे आणि स्वातंत्र्यप्रेमी भारतीय जनतेचे कौतुक तैवानने केले आहे. भारतीय उपखंडामध्ये साम्यवादी चीन आपली सेन्सॉरशीप लादण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, चीनला भारतीय जनतेने ‘गेट लॉस्ट’ हे एकच उत्तर द्यायला हवे, असे तैवानी परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
तैवानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय जनतेने, चीनला आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असे स्पष्टपणे बजावले आहे. चीनच्या विस्तारवादास तोंड देण्याची सर्व ती सिद्धता भारताकडून सुरू आहे. भारतीय जनताही सरकारच्या बाजूने पूर्णपणे उभी आहे. जगातील अनेक देशांचा चीनच्या विस्तारवादी धोरणास विरोध आहे. चीनला आपल्या लष्करी सामर्थ्याचा गर्व झाला असला तरी भारत काही पूर्वीचा राहिला नाही, हे चीनच्या एव्हाना चांगलेच लक्षात आले असेल. त्यातूनच एकीकडे सैन्याची जुळवाजुळव करीत असतानाच भारतासमवेत चर्चा करून सीमावादावर तोडगा काढण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतावर लष्करी सामर्थ्याच्या बळावर आपण विजय मिळवू शकू, असल्या स्वप्नरंजनात चीनने रमू नये. अंगावर आल्यास शिंगावर घेऊ शकतो, हे भारतीय जवानांनी गलवान खोर्यामध्ये चिनी लष्कराला दाखवून दिले आहे, हे चीनने विसरता काम नये. तैवानी जनतेला भारतीय जनतेने स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल चीनच्या नाकाला मिरच्या झोंबणे स्वाभाविक असले, तरी साम्यवादी चीनला तशीच भाषा समजते हे लक्षात ठेवून त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे! तैवानच्या स्वातंत्र्यदिनास शुभेच्छा देऊन भारतीय जनतेने चीनच्या अरेरावीस आपण धूप घालत नसल्याचे दाखवून दिले आहे. चीन यावरून योग्य तो बोध घेईल, अशी अपेक्षा करावी काय?
फारुक अब्दुल्ला यांचे डोके ठिकाणावर आहे ना?
‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते फारुक अब्दुल्ला हे अजूनही जम्मू-काश्मीरसंदर्भात केंद्र सरकारने जी कृती केली ती स्वीकारण्यास तयार नाहीत. सध्या ते जी वक्तव्ये करीत सुटले आहेत ते पाहता, त्यांचे डोके ठिकाणावर आहे ना, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तेथे काही प्रश्न असतील तर ते भारताचे अंतर्गत प्रश्न आहेत. त्यामध्ये अन्य कोणी नाक खुपसता कामा नये, हे फारुक अब्दुल्ला यांच्या अजूनही लक्षात येत नाही. अगदी अलीकडे म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी काश्मीर खोर्यामध्ये चीनच्या मदतीने ‘कलम ३७०’ आणि ‘कलम ३५ अ’ ही कलमे पुन्हा अस्तित्वात येतील, असे वक्तव्य केले.
जम्मू-काश्मीरमध्ये काय करायचे, याचा भारतास पूर्ण अधिकार असताना चीनच्या मदतीने तेथे ‘कलम ३७०’ पुन्हा अस्तित्वात येईल, असा विचार या अब्दुल्ला महाशयांच्या डोक्यात येतो तरी कसा? ‘कलम ३७०’ रद्द केल्याचा निर्णय चीनने कधीही स्वीकारलेला नाही, असेही फारुक अब्दुल्ला बरळले आहेत. चीनला विचारतोय कोण? आमच्या देशात केलेली एखादी कृती अन्य देशाला आवडेल किंवा नाही, हे पाहून केलेली नसते.
देशाचे हित लक्षात घेऊन केलेली असते, हे फारुक अब्दुल्ला यांना समजत नाही का? ‘कलम ३७०’ रद्द केल्याने चीन नाराज आहे. चीनच्या मदतीने पुन्हा ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ कलम जम्मू-काश्मीरमध्ये अस्तित्वात येईल, अशी आशा फारुक अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. इतकी वर्षे भारतात राहूनही भारताबद्दल अब्दुल्ला यांना काय वाटते, याची अशा वक्तव्यावरून कल्पना यावी. खरे म्हणजे, असल्या देशद्रोही नेत्यांवर खटले भरून त्यांना कठोरात कठोर शासन करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय ही विषवल्ली नष्ट होणार नाही!
९८६९०२०७३२