संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पाकिस्तानातील नशेबाजांमध्ये ७८ टक्के पुरुष, तर २२ टक्के महिला आहेत. या नशेबाजांची संख्या दरवर्षी ४० हजारांच्या दराने वाढते, ज्यामुळे पाकिस्तान जगातील सर्वाधिक अमली पदार्थ प्रभावित देशांपैकी एक झाला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नुकतीच एका कार्यक्रमात देशातील वाढत्या व्यसनाधीनता व नशाबाजीवर काळजी व्यक्त केली. उल्लेखनीय म्हणजे, याच कार्यक्रमात त्यांनी देशातील नागरिक व विशेषत्वाने युवकांना अमली पदार्थांच्या धोक्याची माहिती व्हावी व त्या जाळ्यातून त्यांची सुटका व्हावी या उद्देशाने मोबाईल अॅपदेखील लाँच केले. ‘जिंदगी’ नावाच्या या अॅपमध्ये अमली पदार्थ, व्यसनाधीनता, नशाबाजी वगैरे सर्वच विषयांवरील प्रश्नांचे एकत्रीकरण केलेले आहे. चालू काळात पाकिस्तानात अमली पदार्थांचे व्यसन हा एक फार मोठा धोका म्हणून पुढे आलेला दिसतो. २०१३ साली संयुक्त राष्ट्रांच्या ‘यूएनडीओसी’ संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात अमली पदार्थांचा वापर करणार्यांची संख्या ८९ लाख इतकी असून त्यासाठी अफूचा वापर सर्वाधिक केला जातो.
अमली पदार्थ आणि गुन्हेगारी यावर संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पाकिस्तानातील एकूण अमली पदार्थांच्या वापरकर्त्यांपैकी ४० लाख लोक गंभीर व्यसनाधीन आहेत. विशेष म्हणजे, नशाबाजांची ही संख्या जगातील अन्य कोणत्याही देशातील लोकांपेक्षा अधिक आहे. अफू आणि हेरॉईनचा दुरुपयोग तर पाकिस्तानात व्यापक प्रमाणावर केला जातो आणि हे दोन्ही अमली पदार्थ अतिशय सुलभ व सोप्या पद्धतीने तिथे उपलब्धही होतात. त्यापैकी बहुतांश अमली पदार्थ जगातील ७५ टक्के हेरॉईनचा पुरवठा करणार्या अफगाणिस्तानातून येतात. ‘यूएनओडीसी’च्या माहितीनुसार १५ ते ६४ वर्षे वयाच्या आठ लाखांहून अधिक पाकिस्तानी लोक नियमितपणे हेरॉईनचा वापर करतात. तसेच एका अंदाजानुसार पाकिस्तानात दरवर्षी ४४ टनापर्यंत हेरॉईनची विक्री होते. शेजारच्या अफगाणिस्तानातून ११० टन हेरॉईन आणि मॉर्फिनची तस्करी पाकिस्तानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारात केली जाते. त्याव्यतिरिक्त पाकिस्तानचा अवैध अमली पदार्थ व्यापार दरवर्षी दोन अब्ज डॉलर्सपर्यंतचा महसूलही देतो.
पाकिस्तानातील अमली पदार्थ वापरकर्त्यांच्या संख्येचे प्रांतवार विश्लेषण केल्यास खैबर पख्तुनख्वा प्रांतात नशेबाजांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसते. शेजारच्या अफगाणिस्तानशी लागून असलेल्या या प्रांतातील ११ टक्के लोक अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत, तर २०१३ साली बलुचिस्तानमधल्या अमली पदार्थ वापरकर्त्यांची संख्या २ लाख, ८० हजार इतकी होती.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार पाकिस्तानातील नशेबाजांमध्ये ७८ टक्के पुरुष, तर २२ टक्के महिला आहेत. या नशेबाजांची संख्या दरवर्षी ४० हजारांच्या दराने वाढते, ज्यामुळे पाकिस्तान जगातील सर्वाधिक अमली पदार्थ प्रभावित देशांपैकी एक झाला आहे. पाकिस्तानात औषधाच्या नावाखाली अफू आणि मॉर्फिनसारख्या अमली पदार्थांचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, पाकिस्तानची जवळपास १.५ टक्के लोकसंख्या अथवा १६ लाख लोक या अमली पदार्थांचा बिगर वैद्यकीय वापर करत असल्याचे समजते. ज्यात सर्वाधिक वापर वेदनाशामक म्हणून केला जातो.
अमली पदार्थांच्या वापरात सर्वाधिक संख्या पुरुषांची आहे, तर महिला प्रामुख्याने ‘ट्रॅन्क्विलायझर’ घेतात. पुरुषांमध्ये वेदनाशामकासह अॅम्फॅटेमिनचा दुरुपयोग आढळला आहे. पाकिस्तानातील जवळपास ४२ लाख अमली पदार्थ वापरकर्ते नशेची तल्लफ भागवण्यासाठी निरनिराळ्या अमली पदार्थांवर अवलंबून असल्याचे आढळते. प्रांतानुसार कोणता अमली पदार्थ सर्वाधिक वापरला जातो, असे वर्गीकरण केल्यास बलुचिस्तानमध्ये अफू वापरणार्यांची सर्वाधिक संख्या आहे. इथली १.६ टक्के लोकसंख्या हेरॉईन आणि अफू अशा दोन्ही अमली पदार्थांचा वापर करते.
कोणत्याही प्रकारच्या नशेच्या औषधांच्या वापराचे प्रचलन खैबर पख्तुनख्वामध्ये अधिक आहे. तिथली १०.९ टक्के लोकसंख्या अमली पदार्थांचे सेवन करते. देशातील बहुतांश भागामध्ये कोकेनचा वापर नगण्य आहे, तर पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावलेल्या काश्मीरमध्ये गेल्यावर्षी २ हजार, ३०० लोकांनी कोकेनचा वापर केल्याचे आढळले होते. दरम्यान, पाकिस्तानात वापरल्या जाणार्या अमली पदार्थांच्या गटांत नव्याने प्रचलित होणारा गट ‘मेथमफॅटामाइन’ हा आहे व त्याचा सर्वाधिक वापर बलुचिस्तानात केला जातो, तर खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये अॅम्फॅटेमिनचे सेवन सर्वाधिक आढळते.
जगातील अमली पदार्थांची वाहतूक-तस्करी जिथून होते, अशा मार्गावर पाकिस्तान वसलेला आहे. कारण, त्याच्या शेजारीच मोठ्या प्रमाणावर अफूची शेती केला जाणारा अफगाणिस्तान आहे. ‘यूएनओडीसी’च्या अंदाजानुसार अफगाणिस्तानमध्ये उत्पादित अमली पदार्थांपैकी (हेरॉईन आणि चरस) ४० टक्के पाकिस्तानात पाठवले जातात. परिणामी, इथून पाठवली जाणारी अफू आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीसाठी जशी वापरली जाते, तशीच त्यातून पाकिस्तानची घरगुती अफूची गरजही भागवली जाते. कॅनबिस आणि अफूव्यतिरिक्त अॅम्फॅटेमिनसारखे उत्तेजक (एटीएस) आणि कोकेनचा सातत्यपूर्ण पुरवठाही इथे होतो. गेल्या काही वर्षांमध्ये एफेड्रिनसारख्या रसायनांच्या आयातीशी निगडित गतिविधींची ओळख करणेही शक्य झालेले नाही. याव्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये औषधी उद्योग आणि फार्मसी तसेच मेडिकल स्टोअर्सचेदेखील एक मोठे जाळे पसरलेले आहे. उल्लेखनीय म्हणजे, हे जाळे यम-नियमांपासून मुक्त आहे. परिणामी, औषधे आणि मेडिकल स्टोअर्समधून मान्यताप्राप्त औषधांसहित अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळेदेखील मोठ्या प्रमाणावर तयार केलेले आहे. देशातील जवळपास सर्वच भागांत कोणत्याही वैद्यकाच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय या औषधांचा पुरवठा करणे हा, या अमली पदार्थ जाळ्याचा सर्वात यशस्वी मार्ग आहे.
असे म्हटले जाते की, पाकिस्तानातील अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार दोन अब्ज डॉलर्स/दरवर्षी इतक्या किमतीचा आहे. तसेच पाकिस्तान जगातील सर्वाधिक हेरॉईनच्या आहारी गेलेला देश आहे. पेशावर हे शहर या अवैध व्यापाराच्या केंद्रस्थानी आहे. उल्लेखनीय म्हणजे, पेशावर हे ठिकाण अफगाणिस्तानमधील बदख्शां, कुनार आणि नंगरहार या प्रांतांतील अफू उत्पादन क्षेत्रांच्या जवळ आहे. याबरोबरच जवळच्याच खैबर जनजातीय एजन्सीमध्ये लॅण्डी कोटालच्या आसपास अल्पविकसित हेरॉईन-प्रक्रिया प्रयोगशाळादेखील मोठ्या प्रमाणावर आहेत.
पाकिस्तानातील वाढत्या अमली पदार्थ व्यापाराला स्थानिक इस्लामी गटांचेही संपूर्ण सहकार्य आहे. वाढत्या अमली पदार्थ व्यापाराने पाकिस्तानच्या अफगाणिस्तानशी लागून असलेल्या भागाला वा तशा बाजारांना हिंसाचारग्रस्त बंजर भूमीत परिवर्तित केले आहे. दरम्यान, पाकिस्तानची वर्तमान स्थिती अशी आहे की, तो देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एका अयशस्वी राष्ट्राच्या रूपात समोर आला आहे. पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा कट्टरपंथी इस्लामिक समूहांमुळे गंभीर संकटग्रस्त झाली आहे. हे इस्लामी गट आपल्या कमाईसाठी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची वाहतूक आणि व्यापारावर अवलंबून आहेत. परंतु, हे असे घातक समीकरण आहे की, ज्यात दोन्ही पक्षांकडून पाकिस्तानला हानी व नुकसानाशिवाय अन्य काहीही प्राप्त होण्याची शक्यता नाही. म्हणूनच सध्या इमरान खान यांनी अॅपच्या माध्यमातून जनजागृती करण्याऐवजी आपल्या देशातील दहशतीच्या कारखान्यांवर लगाम कसला तर तो त्या देशाच्या शांती व सुरक्षेसाठी सर्वाधिक उपयुक्त तोडगा सिद्ध होईल.
(अनुवाद : महेश पुराणिक)