ध्वज बदलला, जनमताचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2020   
Total Views |
raj_1  H x W: 0




जो राजकारण धगधगीत ठेवतो, वेगवेगळ्या कारणांमुळे जो सतत जनतेपुढे राहतो, त्याच्या यशाला कुणी रोखू शकत नाही. हिंदुत्वाची घोषणा झाली, ध्वज बदलला, आता जनमत बनविण्याच्या मागे राज ठाकरेंना लागायचे आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणाला धक्का देणारी म्हणा किंवा राजकारण ढवळून काढणारी एक घटना २३ जानेवारी रोजी मुंबईत घडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला ध्वज बदलला. छत्रपतींची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा घेतला. त्याचप्रमाणे केवळ ‘मराठी बाणा’ हा विषय न सोडता त्याला ‘हिंदुत्वा’ची जोड दिली. एखादा राजकीय पक्ष जेव्हा आपल्या विचारात काही बदल करतो, ध्वजात बदल करतो, तेव्हा त्याबद्दल उलटसुलट चर्चा स्वाभाविकपणे होत राहते.


राज ठाकरे यांचा मनसेत हा बदल करण्याचा निर्णय क्रांतिकारक नसला तरी, धाडसी नक्कीच आहे. कालानुरूप राजकीय पक्षाला आपल्या ध्येयधोरणात बदल करावे लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लेबर पार्टी’, ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, ‘रिपबल्किन पार्टी’ अशा प्रकारे राजकीय पक्ष निर्माण केले आहेत. १९७७ साली ‘जनसंघा’चे ‘जनता पार्टी’त विलीनीकरण झाले. ८० साली पूर्वीच्या जनसंघाच्या मंडळींनी ‘भारतीय जनता पार्टी’ निर्माण केली. जनसंघाचा ध्वज बदलला आणि विचारसरणीतही थोडा बदल झाला. जसा काळ बदलतो, तसा पक्षात बदल करावा लागतो. सर्वच लोकशाही देशात या प्रक्रिया चालतात, त्यामुळे राज ठाकरे यांनी अनाकलनीय गोष्ट केली, असे मानण्याचे कारण नाही. त्यांची कृती अत्यंत स्वाभाविक समजली पाहिजे.


गेली जवळजवळ १५ वर्षे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला, तेव्हा त्यांचाच पक्ष खरी शिवसेना होणार का, असा भास निर्माण झाला. खूप आशा त्यांनी निर्माण केल्या. जनतेने त्यांना त्यांच्या उमदेवारांना निवडूनही दिले. नाशिक महानगरपालिकेत त्यांना बहुमतही मिळाले. राज ठाकरे यांचा झंझावात महाराष्ट्र व्यापणार, असे वातावरण बनू लागले. पूर येतो आणि नंतर तो हळूहळू ओसरत जातो. उन्हाळा आला की नदीचे पात्र कोरडे ठणठणीत होते, तसे मनसेचे झाले. पहिला उत्साह हळूहळू मावळत गेला. २०१९च्या निवडणुकीत मनसेचे पात्र कोरडे झाले. ‘राजकीय अस्तित्त्वा’चा प्रश्न निर्माण झाला.


राज ठाकरे यांनी पराभव स्वीकारला, पण हार मान्य केली नाही. नव्या दमाने उभे राहण्याचा त्यांनी निर्णय केला. परिस्थितीचे आकलन केले. आपण कुठे कमी पडत आहोत, याचा शोध घेतला. त्यांना असे वाटले की, सर्व देशभर आता हिंदू समाजात राजकीय जागृती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्याची प्रादेशिकता आहे. बंगाली, बिहारी, राजस्थानी, गुजराती, कानडी, इत्यादी प्रदेशातील लोकांच्या मनात प्रादेशिक भावना बळकट असतात. त्यात काही गैर नाही. परंतु, मी जरी कुठल्याही प्रदेशाचा का असेना, कुठल्याही भाषेचा का असेना, ‘मी हिंदूदेखील आहे,’ ही भावना दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ‘नागरिकत्व कायदा’ जे मुसलमान विरोध करतात, त्यांच्या विरोधामुळे ही भावना आणखी वाढत जाणार आहे.


लोकमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, हे ज्या राजकीय नेत्याला समजते, तो राजकारणात टिकून राहतो. भाजपने गांधीवाद, समाजवाद स्वीकारला होता. तेव्हा हिंदू समाजाने भाजपकडे पाठ केली. त्यावेळी भाजप रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात उतरला, तेव्हा हिंदू जनतेने भाजपला खांद्यावर घेतले. दोन खासदारांचे १८०हून अधिक खासदार निवडून दिले. याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील हिंदुत्वाची भूमिका घेतली. जनतेची तीच अपेक्षा होती. हिंदू समाजातील ही राजकीय जागृती, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तिला रोखण्याचे सामर्थ्य आता कोणात नाही.


हिंदू समाजातील या राजकीय जागृतीचे सर्व श्रेय संघाच्या अगणित कार्यकर्त्यांना जाते. ज्यावेळी ‘हिंदू’ शब्द उच्चारणे राजकीय क्षेत्रात ‘पाप’ होते, तेव्हा संघस्वयंसेवक गीत गात, ‘हिंदू आम्ही भीती कुणाची, जगती आम्हाला!’ ‘जो हिंदू तो निंदू’ ही देशातील काँग्रेससहित सर्व राजकीय पक्षांची नीती होती. महाराष्ट्रातील समाजवादी तर पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हिंदुत्वावाद्यांच्या अंगावर येत असत. त्याची संघाने कधी पर्वा केली नाही, ना त्यांना काही किंमत दिली. आपल्या कर्माने ही माणसे मरणार आहेत, त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही, आपण आपले काम करीत राहावे. शांतपणे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून, निंदा-स्तुतीची पर्वा न करता तीन पिढ्या संघ काम करीत खपल्या. भगवा ध्वज, संघाने प्रतिष्ठीत केला. शिवाजी महाराजांचे नाव घेण्यात भल्या भल्या काँग्रेसी नेत्यांची जीभ कचरत असे, तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत,’ हे संघाने स्वयंसेवकांच्या मनावर कोरले. महाराजांचा राज्याभिषेक दिवस संघाचा एक उत्सव झाला. शांतपणे केलेल्या आणि सत्यावर आधारित असलेल्या कार्याचे परिणाम समाजावर होत जातात, तसे ते होत गेले.


आज हिंदुत्वाचे राजकारण अपरिहार्य झालेले आहे. राज ठाकरेंनी या मार्गाने जायचे ठरविले आहे. त्यांचे मनापासून स्वागत करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत की, ‘राजकारणाचे हिंदुत्वीकरण झाले पाहिजे.’ त्यांच्या म्हणण्याला मुस्लीम तुष्टीकरणवादाचा संदर्भ होता. आज हा संदर्भ पूर्णपणे संपला असे नाही. तुष्टीकरणवादाचे भूत उकरून काढण्याचा प्रयत्न आजही चालूच आहे. अशा वातावरणात राज ठाकरे यांनी हिंदुहिताच्या राजकारणाचा मार्ग धरला, ही चांगली गोष्ट झाली.


राज ठाकरे यांच्या कृतीला काळाचा संदर्भदेखील आहे. शिवसेना तशी हिंदुत्ववादी! परंतु, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात मुख्यमंत्री बनण्याची हवा शिरली. त्यासाठी वाटेल ती किंमत द्यायची, असे त्यांनी ठरविले. जे पक्ष हिंदुत्वाचे कट्टरविरोधी आहेत, त्या पक्षांशी घरोबा केला. आमदारांची बेरीज जुळवली. जनतेचा विश्वासघात केला. मुख्यमंत्रिपदाचा मुकुट डोक्यावर चढविला. हिंदुत्वाची वस्त्रे गेली, विवस्त्र होण्याची स्थिती झाली. त्याचे त्यांना काही वाटले नाही. सामान्य शिवसैनिक मात्र मनातून हादरलेला आहे. तो शिवसेनेचा वसा सोडणार नाही. बाळासाहेबांचा वारसा तो नाकारणार नाही. हिंदुत्व तो सोडू शकत नाही. ही जी राजकीय पोकळी आहे, ही राज ठाकरे यांना भरून काढायची आहे.


राज ठाकरे ही राजकीय पोकळी भरून काढतील का? त्यांचा राजकीय इतिहास धरसोडीचा आहे. मनसेला अपयश येण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यात कोणत्याही एका भूमिकेवर राज ठाकरे स्थिर राहिलेले नाहीत. एकेकाळी भाजपची स्तुती केली आणि २०१९च्या निवडणुकीत सगळा पक्ष भाड्याने शरद पवारांना दिला. ‘पवारांची संगत म्हणजे जिलेबीची पंगत’ नव्हे. पवारांसारखा राजकारणी अतिशय धूर्तपणे खेळी खेळून आपल्या विरोधकांना हसत हसत संपवित जातो. आपण कधी संपलो हे संपणार्या ला समजतच नाही. जेव्हा समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे समजूया की, राज ठाकरे वेळीच सावध झाले आहेत.


त्यांनी उद्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी स्वत:ला पणाला लावले, कशाचीही पर्वा केली नाही, केवळ हिंदूंच्या दीर्घकालीन हितासाठीच सतत संघर्ष केला तर हिंदू समाज त्यांना जवळ करील. धरसोड वृत्ती ठेवली तर काही खरे नाही. आताचा कालखंड, त्यांच्या दृष्टीने परीक्षेचा कालखंड आहे. जनता त्यांची परीक्षा घेणार. कारण, जनता आता शहाणी झालेली आहे. राज ठाकरे जे बोलतात त्यावर ते ठाम राहणार आहेत का की उद्या पुन्हा कृती बदलून शरद पवारांचे बोट धरतील? राज ठाकरे यांना जनतेच्या मनात आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करावी लागेल. राजकीय रंग असलेले हिंदुत्वाचे विषय शोधावे लागतील. त्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल. राजकारणात जो संथ गतीने जातो किंवा अर्धवट झोपेत असतो किंवा स्वत: निर्माण केलेल्या मनोराज्यात मग्न असतो, त्याच्या नशिबी सणकून आपटी याशिवाय दुसरे काही येत नाही. परंतु, जो राजकारण धगधगीत ठेवतो, वेगवेगळ्या कारणांमुळे जो सतत जनतेपुढे राहतो, त्याच्या यशाला कुणी रोखू शकत नाही. हिंदुत्वाची घोषणा झाली, ध्वज बदलला, आता जनमत बनविण्याच्या मागे राज ठाकरेंना लागायचे आहे. यशासाठी त्यांना शुभेच्छा!
@@AUTHORINFO_V1@@