मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे विणले जात असतानाच रस्ते, उड्डाणपुलांच्या कामांनीही तितकीच गती घेतली आहे. तेव्हा, मुंबईला वाहतूककोंडीतून मुक्त करु शकणाऱ्या काही सुपरफास्ट प्रकल्पांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
मुंबईत वाहनांची संख्या वाढल्याने व पुरेसे वाहनतळ उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच वाहने सर्रास पार्क केलेली अजूनही दिसून येतात. त्यातच मुंबई महापालिकेकडून कित्येक वर्षे फेरीवाला धोरण अंतिम स्वरूपात कार्यवाहीत न आणल्याने फेरीवाले रस्त्यात वा पदपथावरच दुकान थाटून रस्तावाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत. मुंबई महापालिका पुरेसे वाहनतळ बांधत आहे व फेरीवाला धोरणसुद्धा अंतिम स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे. अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाईची सुरुवात झाली असली तरी या सगळ्याची गती कमी असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झालेला दिसतो. 'एमएमआरडीए' नवीन रस्ते, उड्डाणपूल वा उन्नत मार्गाचे प्रस्ताव आणून मुंबईची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी 'एमएमआरडीए'ने काही नवीन मार्गांचे वाहतुकीचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. मुंबईत उत्तर-दक्षिण रस्ता प्रकल्प हे तुलनात्मकरित्या अधिक लांबीचे असल्याने ते सार्वजनिक वाहतुकीकरिता बेस्ट बस वा मेट्रो रेल्वेगाड्यांवर अवलंबून आहेत. पश्चिम-पूर्व प्रदेशांच्या जोडणीकरिता तयार केलेले रस्ते हे जरी लांबीने छोटे असले तरी ते वाटेत रेल्वे, वसाहतीच्या इमारती वा झोपडपट्ट्या अशा अनेक अडथळ्यांमुळे उन्नत रस्ते वा उड्डाणपूल स्वरूपात बांधण्याशिवाय पर्याय नाही.
अ) उत्तर-दक्षिण रस्ता प्रकल्प
पूर्व मुक्त मार्ग विस्तार
पूर्व मुक्त मार्गावरून पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंतचा प्रवास आता आणखी जलद होण्याचे नियोजन आहे. चेंबूरहून या मार्गाला घाटकोपरपर्यंत जोडणी दिली जाणार आहे. चेंबूर ते सीएसएमटी पी. डिमेलो रस्त्याचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार करता येते. परंतु, या दोन्ही टोकांवर होणारी वाहतूककोंडीची समस्या कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याअंतर्गत पूर्व मुक्त मार्गाचे आयुर्मान वाढावे म्हणून संपूर्ण पुलाला 'एपोक्सी पेंटिंग' करण्यात येणार आहे.
तुर्भे-खारघर पर्यायी रस्ता
मुंबई-पनवेल रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहा पदरी उन्नत व भुयारी पर्यायी रस्ता दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दोन्ही टोकाला दोन किमी उन्नत व मध्ये दोन किमी भुयारी रस्त्याचा प्रस्ताव आहे.
विरार-अलिबाग मार्ग
महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या बहुउद्देशीय प्रकल्पाचे पहिल्या पर्वाचे अंशत: २३ किमी लांब व नवघर ते अंजूर मार्गाचे काम लवकरच (२०२० च्या मध्यात) हाती घेतले जाणार आहे. या मार्गासाठी १०४ गावांपैकी ५५ गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात येणार आहे. एकूण १२६ किमी लांब व ८ मार्गिका असलेले रु. १२,९७५ कोटी किमतीच्या कामापैकी पहिल्या टप्प्याचे विरार ते भालिवली ७९ किमीचे रु. ९३२६ कोटींचे काम १०४ गावांतून जाते व १००० हेक्टरपेक्षा जास्त जमीन ताब्यात घ्यावी लागते. या प्रकल्पात २० उड्डाणपूल, १५ ठिकाणी जोडलेले रस्ते आणि ४५ ठिकाणी जाण्याचे भुयारी मार्ग राहणार आहेत.
ब) पश्चिम-पूर्व रस्ता जोडणी प्रकल्प
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता
हा (GMLR) रस्ता पश्चिम महामार्गावरील गोरेगाव (पूर्व) पासून सुरू होईल व फिल्म सिटीमधून १.६ किमी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून (SGNP) दुहेरी तीन तीन मार्गिकांच्या ४.७ किमी लांब असलेल्या बोगद्यातून मार्ग काढत उर्वरित मार्ग पूर्व मार्गावरील मुलुंड (प.) पर्यंत जाईल. एकंदर १२.२ किमी लांब असा हा मार्ग पुढील वर्षी पुरा होईल. राष्ट्रीय उद्यानाजवळ ध्वनिप्रदूषण होता कामा नये, अशा अटी आहेत. बीएनएचएसकडून या भागातील जैवविविधता बाधित होणार नसल्याची मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल.
मुंबई-बदलापूर रस्ता प्रकल्प
ऐरोली ते कल्याण कटाईपर्यंत उन्नत मार्ग प्रस्तावामुळे मुंबई-बदलापूर अंतर दोन तासांऐवजी दीड तासांत कापता येईल. तसेच ऐरोली ते कल्याण अंतर फक्त ४५ मिनिटांत पूर्ण करता येईल. या प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्याचे लक्ष्य २०२१ पर्यंत ठेवण्यात आले आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग-४ ला जोडण्याकरिता मुंब्रा बायपास येथे १.७ किमीचा पारसिकच्या डोंगरामधून बोगदा तयार केला जात आहे. सध्या १०० मी. बोगदा तयार झाला असून २०२०च्या अखेरीस बोगद्याचे काम पुरे होईल, असा अंदाज आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील लोकसंख्या २०३१ पर्यंत ३४ टक्क्यांनी वाढणार, असा अंदाज आहे. १९९६ पासून ते २००५ पर्यंत या क्षेत्रातील लोकसंख्या १४ लाखांनी वाढली आहे. तेव्हा, त्या अनुषंगाने रस्ते विकासाच्या प्रकल्पांची गती वाढवणेही क्रमप्राप्त आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्ग
पूर्व-पश्चिम वाहतूककोंडी कमी करणारा प्रस्तावित उन्नत मार्ग (४.५१ किमी लांब. वरळीच्या बाजूस १८३ मी. व शिवडीच्या बाजूस २५५ मी.) पर्यावरणाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची किंमत रु. १२७८ कोटी होती. या मार्गास २०१८ मध्ये मंजुरी मिळूनही पर्यावरणाच्या मुद्द्यावरून प्रशासनास नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. शिवाय आरेच्या मेट्रो कारशेडचे मुद्दाही ताजा आहे. उन्नत मार्गाचा वरळी येथील भाग सागरी हद्द नियंत्रण कायद्याअंतर्गत (CRZ - 2) येतो. मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तीतून हा मार्ग जात असल्याने याचे काम किचकट आहे. अनेक संस्थांकडून (मुंबई पोर्ट ट्रस्ट, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि मुंबई महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण) मंजुरी मिळणे आवश्यक आहे. विविध सूचनांमध्ये शिवडी-वरळी मार्ग प्रस्तावित किनारी मार्गाला जोडावा, अशी मागणी जनसुनावणीत आली होती.
सांताक्रुझ-चेंबूर रस्ता विस्तार
कुर्ला, मुंबई विद्यापीठ, पश्चिम व पूर्व परिसरातील दळणवळण वेगाने व्हावे, या उद्देशाने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम ५० टक्क्यांहून जास्त पूर्ण झाले आहे. पुलासाठी रु. ४८१ कोटी खर्च होणार असून पुलाचे काम पूर्ण झाल्यास कालिना ते वाकोल्यापर्यंत विना वाहतूक कोंडी जाता येईल.
वांद्रे-कुर्ला संकुल ते चुनाभट्टी
उन्नत मार्गाने जोडणी रस्ता
हा १.६ किमी लांबीचा चार पदरी जोडणी उन्नत मार्ग पूर्व महामार्ग ते वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत जाण्यासाठी अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लोकांकरिता खुला झाला आहे. या जोडणीवरून प्रवासाची ३० मिनिटे वाचतात व ३ किमी अंतर कमी होते. दुचाकी, रिक्षांना या पूलावर बंदी असल्याने सर्वसामान्यांत त्याबाबत नाराजी आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर काही कारणाने नवीन वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावरून 'बेस्ट'ची बस मार्गिका सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रा-कुर्ला संकुल
कुर्ला रेल्वे स्थानकाहून वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत जाण्यासाठी एक तासांहून जास्त वेळ लागायचा. आता नवीन मार्गामुळे हा प्रवास केवळ १५ मिनिटांवर आला आहे. सीताराम भारू मार्गावरील १०० वर्षांची जुनी डेव्हिड चाळ पाडावी लागेल म्हणून सरकारकडून १९ वर्षे प्रयत्न सुरू होते. त्यातील ३७ कुटुंबे व १७ व्यापारी आस्थापनांचे पुनर्वसन जवळच्या एसआरए इमारतीमध्ये करावयाचे आहे. चाळ पाडल्यावर ९ मी. रुंद एलबीएस मार्ग १५ मी. होईल व वाहनांचा वळसा वाचेल. हा प्रकल्प फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिरलेपर्यंतच्या एमटीएचएल सागरपुलाच्या पहिल्या गर्डरचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दि. १५ जानेवारीला पार पडले. संपूर्ण पुलाचे काम सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरे होण्याचा संकल्प असला, तरी हे काम त्या आधी होईल, असे एमएमआरडीएचे मुख्य आयुक्त आर. ए. राजीव यांचे म्हणणे आहे. हा पूल २२ किमी लांब असून हा देशातील सर्वात लांब असा सागरी पूल ठरणार आहे. परंतु, या कामामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांना अडचण न येता, ते परत त्यांच्या शिवडीच्या जुन्या जागी नक्की परततील, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. हा प्रकल्प १९८० पासून नियोजनात असला तरी २०१८ मध्ये त्याच्या कामास सुरुवात झाली. प्रकल्पाची किंमत रु. १७८४३ कोटी आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे काम २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंडारे म्हणतात की, "हा पुलाचा पहिला गर्डर मशीनच्या स्वयंचलित कृतीतून उभारला गेला व असे हे काम देशात प्रथमच होत आहे." ६० मी. लांब गर्डरचे वजन १००० टन असून ते उचलण्याची यांत्रिक क्षमता १४०० टन होती. या पुलावर ३+३ मार्गिका राहणार असून या कामाकरिता ३ लाख मे. टन पोलाद व १० लाख घन मी. काँक्रीट लागेल. एमएमआरडीए तात्पुरता ५.६ किमी पूल पाण्यात शिरण्याकरिता बांधणार आहे. पुलाच्या सागरी मार्ग असलेल्या ६ किमी भागाकरिता देखावे व ध्वनी प्रतिबंध-नियोजन केले जाईल. या प्रतिबंधामुळे बीएआरसीची अण्वस्त्रविषयक कामे झाकली जातील आणि शिवडीच्या खाडीवर दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांना संरक्षण मिळेल. तेव्हा, वरीलपैकी प्रस्तावित आणि कार्यान्वित वाहतूक प्रकल्पांमुळे मुंबईच्या विकासाच्या दिशा नक्कीच उजळतील, यात शंका नाही.