बदलत्या भारताचे रूप म्हणजे नरेंद्र मोदी असे सामान्य लोकांना वाटते. परिवारवाद, जातवाद, धर्मवाद यापेक्षा देश मोठा, ही भावना आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'रिप वॅन विंकल' झालेले डावे यांना हे काही समजत नाही. 'रिप वॅन'प्रमाणे ते भूतकाळात जगत आहेत आणि देशात उच्छाद मांडीत आहेत.
वॉशिंग्टन आर्विन यांची 'रिप वॅन विंकल' ही लघुकथा आहे. कथानायकाचे नाव आहे 'रिप वॅन विंकल.' तो डच अमेरिकन आहे. न्यूयॉर्क जवळील हडसन नदीच्या डोंगरदर्यांमध्ये तो जातो. त्याच्या खांद्यावर त्याची बंदूक आणि सोबत त्याचा आवडता कुत्रा असतो. घर-संसार चालविण्याच्या दृष्टीने तो निरुपयोगी असतो. बायकोची बोलणी त्याला रोज खावी लागतात. एके दिवशी वैतागून तो जंगलात जातो. मोकळ्या जागेत फार मोठा गलका चालू आहे, हे त्याच्या लक्षात येते. एक माणूस दारुचे पिंप घेऊन चालला होता. तो 'रिप वॅन'ला त्याच्या नावाने हाक मारतो आणि मदतीला बोलावतो. 'रिप वॅन' त्याच्या बरोबर जातो. त्यांच्या खाण्यापिण्याच्या मेजवानीत भाग घेतो. हडसन नदीत काही वर्षांपूर्वी एक जहाज बुडाले. बुडालेले खलाशी भूते बनून येतात. तेव्हा विजांचा गडगडाट खूप होतो. असा गडगडाट तेव्हा झाला होता. 'रिप वॅन'ला त्याची काही कल्पना नव्हती. हे लोक कोण, कुठून आले, का आले, वगैरे काही विचारीत नाही, भरपूर दारू पितो आणि झोपतो.
२० वर्षांनंतर त्याला जाग येते. त्याची दाढी गुडघ्यापर्यंत वाढलेली असते. बंदूक गंजून गेलेली असते आणि कुत्रा गायब झालेला असतो. डच खलाशीदेखील गायब झालेले असतात. वाढलेले केस, नखे आणि गंजलेली बंदूक घेऊन तो गावात येतो. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध झालेले असते. अमेरिका स्वतंत्र झालेली असते. 'रिप वॅन' जेव्हा जंगलात जातो तेव्हा तिसर्या जॉर्जचे राज्य होते. आता लोकराज्य आले होते. गावात त्याला ओळखीचा कुणी भेटत नाही. त्याचे सोबती स्वातंत्र्ययुद्धात कामाला आलेले असतात. त्याचा विचित्र पोशाख बघून मुले त्याच्या मागे धावत असतात. रस्त्यावरील लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहतात. तो स्वतःची ओळख करुन देतो. 'मी रिप वॅन विंकल आहे' असे सांगतो. एकजण त्याला विचारतो की, तू कुणाला मतदान केले? मतदान हा शब्द त्याने जन्मात ऐकलेला नसतो. तो म्हणतो, “मी तिसर्या जॉर्जचा एकनिष्ठ सेवक आहे.” त्याला बिचार्याला माहीत नसते की, तिसर्या जॉर्जविरुद्धच लोकांनी बंड केलेले असते.
गावातील काही वृद्ध त्याला ओळखतात. त्याच्या पत्नीचे निधन झालेले असते. त्याची मुलगी गावातच राहत असते. ती येते आणि त्याला घेऊन जाते. 'रिप वॅन विंकल'ला २० वर्षांमध्ये काय बदल झाले, हे समजतच नाही. तो किंग जॉर्जच्या काळातच जगत राहतो. मुलांना 'मी जंगलात कसा गेलो, मला कोण भेटले, आणि मी झोपलो कसा, ही कथा सांगत राहतो.' वॉशिंग्टन आर्विनची कथा मला देशात आज डावी मंडळी जो धुमाकूळ घालीत आहेत, त्याची आठवण करुन देते. देश बदलत चालला आहे. भारत जागा झाला आहे. तो आपली अस्मिता शोधतो आहे. त्याच्या खाणाखुणा पावालोपावली दिसू लागल्या आहेत. २० वर्षांपूर्वी विवाह समारंभ असेल तर नवरदेव सूट आणि बुटात असे आणि वधू शालूत असे. आता नवरदेव आपल्या पारंपरिक पोशाखात असतो आणि वधूचाही पोशाख तसाच असतो. आपल्या पारंपरिक कला, गाणी, नृत्य, यावर आधारित नाट्य आता थिएटरमध्ये लोक पैसा खर्च करुन बघायला जातात. मोदक, पुरणपोळी, झुणका-भाकर, चटणी-भाकर, मालवणी आहार, आग्री आहार इत्यादींच्या आता जत्रा भरतात.
सिद्धिविनायक देवस्थानापुढे ३० वर्षांपूर्वी अजिबात रांग नसे. आता दर्शन घेण्यासाठी दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागते. दर पौर्णिमेला पूर्व द्रुतगती मार्ग शिर्डीला जाणार्या साई यात्रेकरूंनी भरलेला असतो. प्रत्येक देवस्थानाची हीच अवस्था असते. कोकणातील भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी लाखो यात्रेकरू जातात. त्यांची संख्या वाढतच चालली आहे. महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चौपाटीवर जनसागर लोटलेला असतो. देशभक्तीपर चित्रपटांचा सध्या पूरच आलेला आहे. 'उरी', 'बेबी', 'केसरी', 'ताश्कंद फाईल', 'तानाजी' इत्यादी चित्रपट २० वर्षांपूर्वी करण्याचे कुणी धाडस करीत नसे. हे सर्व चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतात. मराठी मालिका पाहिल्या तर कौटुंबिक मूल्ये, आपली भाषा, संस्कृती यावर मोठ्या प्रमाणात भर देणार्या असतात. (कथा भंपक असल्या तरी) याचा अर्थ भारत आपल्या मुळाकडे वेगाने चाललेला आहे.
यामुळे नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात २०१४ला आले आणि पुन्हा २०१९ला आले. बदलत्या भारताचे रूप म्हणजे नरेंद्र मोदी असे सामान्य लोकांना वाटते. परिवारवाद, जातवाद, धर्मवाद यापेक्षा देश मोठा, ही भावना आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'रिप वॅन विंकल' झालेले डावे यांना हे काही समजत नाही. 'रिप वॅन'प्रमाणे ते भूतकाळात जगत आहेत आणि देशात उच्छाद मांडीत आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांतील देशाचे चित्र बघितले तर कुणाला असे वाटेल की, आपला देश अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. विचारस्वातंत्र्य संपलेले आहे. कुणालाही पकडून तुरुंगात टाकण्यात येते. जीवन आणि मालमत्तेची शाश्वती राहिलेली नाही. अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आलेले आहे. रोजची वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल याच बातम्या सतत दाखवत राहतात. कधी वाद गाईवरून होतो, तर कधी शिवाजी महाराजांवरून होतो, कधी नागरिकत्व विधेयकावरून होतो, मधूनच डाव्यांना काश्मीरमधील मुसलमानांचा पुळका येतो.
दिल्लीतील जवाहरलाल विद्यापीठ या-ना-त्या कारणाने गाजत राहते. विद्यापीठ विद्येच्या भरारीमुळे गाजले पाहिजे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ 'भारत तेरे टुकडे होंगे हजार' या वाक्यामुळे गाजते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपले सर्व लक्ष्य अभ्यासावर केंद्रित केले पाहिजे, ज्ञानसाधना केली पाहिजे, ज्ञानात नवीन भर घालायला पाहिजे. हे विद्यार्थी तोडफोड, मारामारी, डोकेफोडी या विषयात भर घालीत आहेत. मीडियाला याच बातम्या हव्या असतात. ज्यांना अन्य काही उद्योग नाहीत, ते दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सहभागी होतात आणि 'रिप वॅन विंकल'चे दर्शन घडवितात. पण जेव्हा आपण रस्त्यावर येतो. भाजी खरेदी करण्यासाठी भाजी मार्केटमध्ये जातो. अन्य काही वस्तू घेण्यासाठी मॉलमध्ये जातो. रेल्वेच्या गर्दीतून प्रवास करतो. तेव्हा सगळा देश किती शांत आहे, याची अनुभूती घेत असतो. वर्तमानपत्रातील नकारात्मक बातम्या, अफलातून अग्रलेख, आणि तेवढेच अफलातून संपादकीय पानावरील लेख, याचे सामान्य माणसावरील परिणाम शून्य असतात. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्या आणि चर्चा याविषयी जर कुणाला विचारले तर तो एरंडेल प्यायल्यासारख्या चेहर्याने सांगतो, 'सब बकवास हैं।' भाडोत्री माणसे गोळा करून आणि ज्यांची प्रवृत्ती तोडफोड करण्याचीच आहे, अशांना हाताशी धरून इकडे तिकडे काही गोंधळ करता येतो. जेथे गोंधळ तेथे बातमी आणि जेथे बातमी तेथे नकारात्मक पत्रकारिता करणारे पत्रकार आणि टीव्ही चॅनेलवाले हे समीकरण झाले आहे.
एका बाजूला धर्मभारत जागा होत आहे आणि दुसर्या बाजूला अधर्मी अस्वस्थ होत चाललेले आहेत. धर्म-अधर्माचा हा संघर्ष भारताला नवीन नाही. सनातन भारतात अनादी काळापासून तो चालू आहे. या अधर्मी लोकांची एकच विषयसूची आहे, ती म्हणजे केंद्र सरकारविरुद्ध जनतेच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण करायची. हे सरकार जनताविरोधी आहे. हे सरकार राहिले तर तुमचे जीवन धोक्यात येईल, तुमचे नागरिकत्व धोक्यात येईल, याचा प्रचार करीत राहायचे. अस्वस्थता निर्माण करण्यासाठी रोज नवीन नवीन वाद उकरून काढायचा. विद्यार्थ्यांना हाताशी धरायचे. त्यांना हाणामारी करण्यास प्रोत्साहन द्यायचे. हजार विद्यार्थ्यांमध्ये ९५० विद्यार्थी शिक्षणात रस घेणारे असतात, ५० जणांना गडबडगोंधळ करायचा असतो. त्याच्या बातम्या तयार करायच्या आणि त्या सोशल मीडियावरून व्हायरल करायच्या, हा धंदा सध्या चालू आहे. खोट्यानाट्या बातम्या पसरवायच्या, हे आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असा डंका पिटायचा.
या मंडळींना धर्मभारत नको आहे. 'रिप वॅन विंकल' याला वॉशिंग्टनची अमेरिका जशी समजली नाही. तो जॉर्ज तिसर्याच्या राजवटीतच जगत राहिला, तशी यांची अवस्था आहे. आपल्या भारताचा एक सनातन नियम असा आहे की, अधर्माचा बोलबाला खूप होतो. त्याचे प्रस्थही वाढल्यासारखे वाटते. आता काय होणार, अशी धर्म मार्गावर चालणार्या लोकांना धाकधूक वाटू लागते. पण भारत अधर्मासाठी जन्मलेला नाही. जेथे धर्म तेथे विजय, हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. धर्म म्हणजे न्याय, नीती, सत्य, सर्वांचे कल्याण. या मार्गाने भारताला जायचे आहे. भारत नेहमीच सामान्य माणसांचाच बनलेला आहे. धर्मप्रवण सामान्य माणसे हीच त्याची शक्ती आहे. त्यांच्यावर या विपरीत राजनीतीचा दीर्घकाळ अनिष्ट परिणाम होणे शक्य नाही.
अशा वेळी आपल्या अस्मितेकडे जाणार्या सर्वसामान्य माणसाशी नित्य संवाद साधला पाहिजे. सत्य काय आहे, असत्य काय आहे, धर्म कोणता आणि अधर्म कोणता, हे त्याला सांगत राहिले पाहिजे. सत्तेचे राजकारण जीवनाचे सर्वस्व नाही. जीवनाचे सर्वस्व आपल्या मूल्यांवर जगण्यात आहे आणि त्या मार्गानेच आपल्याला गेले पाहिजे. 'रिप वॅन विंकल'प्रमाणे २० वर्षे झोपून, गुडघाभर दाढी वाढवून, फूटभर नखे वाढवून, ज्यांना जगायचे आहे, त्यांना तसे जगू द्यावे. ते आपल्या कर्मानेच नष्ट होतील. आपल्याला मात्र आपल्या कर्माने स्वतःचे जीवन समृद्ध करायचेच आहे, तसेच देशालादेखील मोठे करायचे आहे.