देशाचा इतिहास व ‘हिंदू संस्कृती’ यांचा वारसा कथन करणारी ऐतिहासिक साधने म्हणजे ग्रंथ,पुराणे व पोथ्या. हा समृद्ध वारसा जतन करणार्या सोलापूरच्या किरण जोशी यांच्याविषयी...
उत्तर सोलापुरात ६०० ते ७०० वर्षांपूर्वीचे जुने विठ्ठल मंदिर आहे. त्या मंदिराच्या पूजेचे पिढीजात अधिपत्य पुजारी किरण जोशी यांच्याकडे आहे. ख्यातनाम लोकशाहीर राम जोशी हे किरण यांचे पूर्वज. ६०० वर्षांपूर्वीपासून सोलापुरात वास्तव्यास असणार्या या जोशी घराण्याला मोठा इतिहास आहे. माधवराव पेशवे यांनी किरण जोशी यांच्या पूर्वजांना ज्योतिषशास्त्रातील अभ्यास पाहून जमिनी इनाम दिल्या होत्या. हाच पिढीजात वारसा पुढे चालवत, तेच पौरोहित्य जपत एक अनोखा छंद किरण जोशी यांनी जोपासला आहे. त्यांच्या घराण्यात ज्योतिषाचार्याचा वारसा असल्याने काही ठराविक संस्कृत ग्रंथ होते. यातील काही ग्रंथ किरण जोशी यांच्या हाती लागले. त्यात त्यांच्या घराण्यात परंपरेने आलेली यजुर्वेदाची पोथी आली, ती पोथी पाहताच त्यांच्या मनात आले की, यासारख्या अनेक दुर्मीळ पोथ्यांचा संग्रह आपल्याकडे असावा. त्यांच्या मनातील तो विचार त्यांनी त्यांच्या गुरूंजवळ व्यक्त केली. गुरुजींनी आशीर्वाद दिला. म्हणाले, “हे मोठेच पुण्यकर्म आहे!” याच प्रेरणेतून आज किरण जोशी यांच्याकडे जवळपास एक हजारांहून अधिक दुर्मीळ हस्तलिखितांचा, ग्रंथांचा तसेच पोथ्यांचा संग्रह आहे.
बालपणापासून वेदांकडे ओढा असलेल्या किरण यांना वेदमूर्ती देवीदास सांगवीकर यांनी पौरोहित्यासाठी लागणार्या विधींचे पाठ दिले. पुढे त्यांनी वेदमूर्ती नारायण शास्त्री वांगीकर यांच्याकडूनही वेदविद्येचे पाठ घेतले. याच दरम्यान अनेक ग्रंथ व पोथ्यांची माहिती त्यांना होत गेली. याच दरम्यान अनेक दुर्मीळ पोथ्या त्यांनी संग्रही केल्या. किरण यांचे पणजोबा ‘एचएमव्ही’ कंपनीचे चार जिल्ह्यांचे डिलर म्हणून काम करत होते. त्यांनी फिरतीच्या काळात अनेक वस्तू संग्रहीत केल्या होत्या. पणजोबांच्या संग्रहगुणाने व परंपरेने आपल्याकडे आलेल्या इतरही अनेक गोष्टी किरण यांनी जपल्या आहेत.
काही निवडक ग्रंथांची यादी :
किरण जोशी यांच्याकडे धार्मिक संहिता, पौराणिक ग्रंथ यांबरोबरच ज्योतिष व आयुर्वेदासंबंधीच्या पोथ्याही आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी हा सर्व संग्रह एका व्यक्तीस देण्याचेही ठरवले. परंतु, आपण जपलेला हा वारसा चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये याचीच फक्त त्यांना चिंता वाटते. हा वारसा योग्य व्यक्तीच्या हाती गेला तर सोने, नाहीतर माती अशी त्यांची स्थिती असते. देशातील विविध भागातील अभ्यासक जोशी यांच्या ग्रंथदालनाला भेट देत असतात. इतिहास अभ्यासक माया पाटील, नभा काकडे यांनी या ग्रंथदालनाला भेट दिली आहे. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांसारख्या राजकीय व्यक्तीमत्वांनीही भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर भेटीत किरण जोशी यांनी नरेंद्र मोदी यांना ३००वर्ष जुनी ‘गीता’ भेट दिली. ही गीता त्यांना गुजरात म्हणजे सुदामानगरीतून मिळाली होती. पंतप्रधानांनी ही किरण जोशी यांच्या ऐतिहासिक वारशाचे व त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. हिंदू संस्कृती व साहित्याचे जतन करत भारताचा हा इतिहास जगासमोर अभ्यासासाठी खुले करणारे किरण जोशी हेच खरे ‘हिंदू संस्कृती रक्षक’ आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही !