नुकताच ‘तान्हाजी : दि अनसंग वॉरिअर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये ‘चुलत्या’चीभूमिका करणार्या कैलाश वाघमारेबद्दल आजच्या ‘माणसं’ या सदरातून जाणून घेऊया...
नुकताच ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित ’तान्हाजी : दि अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड दाखवणार्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वत्र पसरली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक इतिहास रचत गेला. अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर, अजिंक्य देव आणि काजोल अशी भली मोठी ‘स्टारकास्ट’ या चित्रपटाला लाभली होती. तरीही, या सगळ्यांमध्ये एक पात्र भाव खाऊन जाते ते म्हणजे, ’चुलत्या’ हे नकारात्मक पात्र. हे पात्र विनोदी असले तरी नकारात्मक होते. विशेष म्हणजे चित्रपटाच्या शेवटी जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हाही हे पात्र आपल्या लक्षात राहते. आज आपण जाणून घेऊया, हे पात्र साकारणार्या कैलाश वाघमारेविषयी.
जालना जिल्ह्यातील ’चांदई’ या छोट्याशा खेड्यातून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी आहे. कैलाशचा जन्म हा जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यातील ’चांदई’ या छोट्या गावात झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. खडतर परिस्थितीतही शिक्षण घेत असताना त्याने स्वतःच्या अंगी असलेले गुण जोपासले. त्यानंतर त्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. यादरम्यान त्याचा ओढा हा अभिनय क्षेत्राकडे वाढला. कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक जिज्ञासा म्हणून तो अभिनयाकडे वळला. त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये तसेच काही छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये अभिनयाची ओढ जपली.
जालन्यामधून शिक्षण घेतल्यानंतर मुंबईचा रस्ता पकडला. कैलाशने पुढे नाट्यक्षेत्रामध्येच काम करण्याचे ठरवले होते. अभिनयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, तो समजून घेण्यासाठी त्याने नाट्यशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. एम. ए.मराठीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्याने मुंबई विद्यापीठातून नाट्यशास्त्रामध्ये पदवी घेतली. मराठीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्याने अनेक पुस्तकांचे वाचन केले. यामुळे त्याच्या भाषेमध्ये चांगला फरक पडला, तसेच त्याची भाषेवरील पकडही मजबूत होण्यास मदत मिळाली. दोन वर्षांमध्ये नाट्यशास्त्राचे शिक्षण घेत असताना वामन केंद्रे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन त्याला लाभले होते. छोट्या नाटकांमधून कधी मध्यवर्ती, तर कधी छोट्या भूमिका केल्या. तसेच, त्याने पडद्यामागेही अनेक भूमिका निभावल्या. याचा फायदा त्याला भविष्यात झाला. ‘अहमदनगर करंडक’, ‘पुरूषोत्तम एकांकिका स्पर्धा’ यांसारख्या एकांकिका स्पर्धांमध्ये स्वतःच्या अभिनयाने रसिकांवरच नव्हे, तर परीक्षकांवरदेखील छाप पाडली. यादरम्यान, त्याला अनेक बक्षिसे मिळाली. यामुळे त्याचा नाटकाकडे कल वाढू लागला.
एकांकिका आणि नाटकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका करत असताना त्याच्याकडे ’शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला’ हे नाटक आले. नाटकामध्ये एका कट्टर मावळ्याची भूमिका साकारायला मिळाली. या नाटकासाठी त्याने दोन वर्षे मेहनत केली. हे नाटक त्याच्या आयुष्यात कलाटणी देणारे ठरले. २०१० ते २०१२ मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी हे नाटक केले. सुरुवातीला लेखक संभाजी दांगडे यांच्यासोबत त्याने काहीकाळ या नाटकाचे दिग्दर्शनही केले. त्यानंतर मराठीतील प्रसिद्ध अभिनेते नंदू माधव यांनी हे नाटक दिग्दर्शनास घेतले. कैलाश वाघमारेने यात नंदू माधव यांना सहाकार्यदेखील केले व यावेळी त्याच्यातील दिग्दर्शकाची चुणूकदेखील पाहायला मिळाली.
या नाटकाचे ६००प्रयोग झाले आणि सातासमुद्रापार या नाटकाची कीर्ती पोहोचली. कैलाशने साकारलेल्या त्या पात्राचे विशेष कौतुक करण्यात आले. या नाटकाने अनेक पारितोषिकेही जिंकली. या दौर्यांदरम्यान त्याचा संबंध चित्रपट क्षेत्राशी आला. त्याने ’मनातल्या उन्हात’ या चित्रपटातून मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. यामध्ये त्याने मुख्य भूमिका निभावली होती. त्याच्या या अभिनयाचे हिंदीसहित मराठी कलाकारांनीदेखील कौतुक केले होते. त्याने अनेक लघुपटांमध्ये काम केले, तसेच विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. त्यानंतर त्याने मराठीमध्ये ’हाफ तिकीट’, ’ड्राय डे’, ’भिकारी’ अशा चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली. सध्या ’तान्हाजी’ चित्रपटामध्ये साकारलेल्या ’चुलत्या’ या पात्राचे विशेष कौतुक होत आहे. स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर त्याला बॉलिवूडमधला हा प्रसिद्ध, नामांकित चित्रपट मिळला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!