छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर म्हणाले असते की, "३५० वर्षांपूर्वी माझ्या शक्ती, बुद्धी, युक्तीने मला जे काही करता आले, ते करण्याचा मी प्रयत्न केला, त्याचे स्मरण करा. तो वारसा पुढे नेण्याची हिम्मत असेल, बाहूंत बळ असेल, तर तो वारसा स्वीकारा. पण, त्या वारशाची वाट लावू नका. इतिहास जसा मला विसरत नाही तसा इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही."
शिवाजी महाराजांवरून काही ना काही वादंग करत राहणे, हा महाराष्ट्राचा जणूकाही स्वभाव झालेला आहे. एक काळ असा होता की, शिवाजी महाराजांविषयीचे वाद इतिहासकारांत चालायचे. शिवाजी महाराजांना लिहिता येत नव्हते, असे काही इतिहासकारांनी म्हटले. त्यावर महाराष्ट्रात प्रचंड वाद झाला. या वादाची खिल्ली उडविणारी सुंदर कथा द. मा. मिरासदार यांनी लिहिली, कथेचे शीर्षक 'शिवाजीचे हस्ताक्षर'.वादाचे कारण काय तर शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील एकही पत्र तोपर्यंत सापडले नव्हते. राजा स्वहस्ते पत्र लिहितो, हा एक विनोद झाला.
शिवाजी महाराज हिंदुत्ववादी नव्हते, ते सर्वधर्म समभावी होते, हा आणखी एक नवीन वादाचा विषय झाला होता. महाराजांच्या काळात 'हिंदुत्व' हा शब्द नव्हता आणि 'सर्वधर्मसमभाव' ही भानगड नव्हती. महाराज हिंदू होते, त्यामुळे सर्व उपासना पंथांचा आदर करणे, हे त्यांच्या रक्तबीजातच होते. औरंगजेब आणि शिवाजी यांच्यातील हा फरक आहे. एवढे सरळ सोपे लोकांना सांगितले तर त्यात वाद होत नाहीत. वाद केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही आणि पोटही भरत नाही. म्हणून प्रसिद्धीसाठी आणि पोट भरण्यासाठी महाराजांच्या नावाचा उपयोग ज्याला जसा हवा, तसा तो करीत असतो.
शिवाजी महाराजांनी अफजलखानाला भेटीला बोलावून त्याचा कोथळा बाहेर काढला. ही ठरवून केलेली हत्या आहे, असा काहीजणांनी शोध लावला. झाले! वादाला नवीन विषय मिळाला. अफजलखान शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठीच आला होता. महाराजांना ते माहीत होते. अफजलखान आपल्या कर्माने मेला. म्हणून अफजलखानाचा वध झाला, असे आपण म्हणतो. वध दुष्टांचा होतो. त्याबद्दल कुणाला काही वाटत नाही. पण, महाराष्ट्रात अतिपुरोगामी खूप जण आहेत. ते 'इंडियन पीनल कोड' लावून शिवाजी महाराजांच्या कृतीचा न्यायनिवाडा करू पाहतात. या महामूर्खांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही.
आता वाद सुरू झाला आहे तो, 'आज के शिवाजी नरेन्द्र मोदी' (लेखक : जयभगवान गोयल) यांच्या पुस्तकावरून. संजय राऊत म्हणतात, "राज्यात या पुस्तकाचे वितरण करू दिले जाणार नाही." (अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा जयजयकार असो) "मोदींचे पुस्तक महाराष्ट्रात येऊ देणार नाही." - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष, एकनाथ गायकवाड (विचार स्वातंत्र्याचा जयजयकार असो) "छत्रपती शिवाजी महाराज, हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. छत्रपतींच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपने शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू केला आहे. म्हणून महाराष्ट्रभर आंदोलन केले जाणार आहे." - बाळासाहेब थोरात (वेगळे मत मांडण्याच्या स्वातंत्र्याचा जयजयकार असो)
यात आणखी नावांची भर घालता येईल, पण सध्या एवढी पुरे. राऊत, गायकवाड, थोरात, यांना फक्त राजकारण करायचे आहे. या राजकारणाचे एक समान सूत्र आहे, 'नरेंद्र मोदी आणि भाजपचा तीव्र विरोध'. पुस्तक हे एक निमित्त झाले. नरेंद्र मोदी काही म्हणत नाही की, 'मी प्रतिशिवाजी आहे.' ते संघस्वयंसेवक आहेत. संघ स्वयंसेवक शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतो. संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांनी कोणाही व्यक्तीला संघाचे गुरू केले नाही. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण आदर्श राहू शकत नाही, असे ते म्हणत. तरीही व्यक्ती म्हणून जर कुणाला आदर्श मानायचा असेल तर आपला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असे ते सांगत. हा संस्कार सर्व स्वयंसेवकांच्या मनावर खोलवर बिंबलेला आहे.
नरेंद्र मोदी एवढेच म्हणतील की, "मी महाराजांचा मर्द मावळा आहे. ते माझे आदर्श आहेत." स्वयंसेवकाच्या मनात याशिवाय कोणताही विचार येऊ शकत नाही. ज्यांनी 'आज के शिवाजी नरेन्द्र मोदी', या शीर्षकाचे पुस्तक लिहिले, त्यांचा पुस्तक लिहिण्याचा हेतू कोणता असेल? सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीची अफाट स्तुती करणे, हा काही राजकारणी लोकांचा व्यवसाय असतो. हेमकांत बरुआ काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते इंदिरा गांधींविषयी म्हणाले, "इंदिरा इज इंडिया" इंदिरा गांधी कधी म्हणाल्या नाहीत की, 'मी म्हणजेच भारत.' फ्रान्सचा चौदावा लुई म्हणत असे, "आयएम दी स्टेट"( मी म्हणजेच राज्य, म्हणजे फ्रान्स).
शरद पवार यांच्या भक्तांनी शरद पवार यांना 'जाणता राजा' अशी पदवी दिली. शरद पवार कधी स्वतःला 'मी जाणता राजा' असे म्हणत नाहीत. संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'प्रतिशिवाजी' ठरवून टाकले होते. तसे त्यांचे लेख सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे चुकूनही कधी म्हणाले नाहीत की, "आजच्या काळातील मी शिवाजी आहे." शिवाजी महाराजांविषयीचा ज्वलंत अभिमान त्यांनी जागवला. महाराजांची राजनीती त्यांना जशी जमेल, तशी त्यांनी अमलात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु भक्तगण अनेकवेळा राजापेक्षाही राजनिष्ठ बनण्याचा प्रयत्न करतात. राऊत काय किंवा गोयल काय, एकाच माळेतील हे दोन मणी आहेत.
शरद पवारांनी आणखी एका नवीन वादाला तोंड फोडले. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. रामदास स्वामी कधी म्हणाले नाहीत की, 'मी शिवाजींचा गुरू आहे' आणि शिवाजी महाराज म्हणाले नाहीत की, 'रामदास स्वामी माझे राजकीय गुरू आहेत.' एक म्हणत नाही की, मी गुरू आहे आणि दुसरा म्हणत नाही की, मी शिष्य आहे. पण या इतिहासाशी राजकारण्यांना काही घेणेदेणे नाही. त्यांचे घेणेदेणे वादाशी असते.
अशा भक्तांना आवरले पाहिजे. अनेकवेळा असे अतिरेकी भक्त स्वामीवरच संकट आणतात. भाजप मुख्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे काही कारण नव्हते. वादंग करण्यासाठी मीडियातील लोक टपून बसलेले आहेत. त्यांना कोणतेही कारण पुरते. ही वादंगी गँग अतिशय संघटित आहे. त्यांचे नेटवर्क फार जबरदस्त आहे. देशाच्या एका कोपर्यात कोठेतरी एखादा शब्द सापडला, तरी त्यांच्या नेटवर्कवरून तो व्हायरल होतो आणि मग गोंधळ सुरू होतो. त्याचा अनुभव आपण नित्य घेत असतो. 'आज के शिवाजी....', हे पुस्तक सध्याचे उदाहरण आहे. यासाठी नित्य सावधानता बाळगणे, अत्यंत गरजेचे झाले आहे.
'हिंदी विवेक' तर्फे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ७ जानेवारी रोजी 'कर्मयोद्धा नरेंद्र मोदी' या ३०० पृष्ठांच्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. अमित शाह मुख्य अतिथी होते. या पुस्तकाच्या बातम्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रात येऊन गेल्या. या पुस्तकावर कोणतीही चर्चा कुणी केली नाही. का? त्याचे कारण असे की, वादंग निर्माण करण्यासाठी कोणताही मालमसाला या ग्रंथात नाही. नरेंद्र मोदी यांचा कर्मयोग कसा आहे, त्यांची अर्थनीती कोणती आहे, परराष्ट्रनीती कोणती आहेे, देशाच्या विविध समस्यांवर त्यांचे चिंतन कोणते आहे, उपाययोजना कोणत्या आहेत, याबद्दलचे लेख ग्रंथात आहेत. ते सर्व भावात्मक आहेत. त्यातून वादंग निर्माण करण्यासाठी काही सापडले नसावे. जे आपली शक्ती, वेळ, पैसा, केवळ याच कामासाठी वापरतात, त्यांची या ग्रंथाने निराशा केली असेल. अशा मंडळींना दिल्लीत प्रकाशित झालेल्या 'आज के शिवाजी नरेन्द्र मोदी' या पुस्तकाने खाद्य दिले, त्यामुळे त्यांना थोडे हायसे वाटले असेल.
कधी कधी मनात विषय येतो की, स्वर्गस्थ शिवाजी महाराजांना आपल्या नावावरून वाद चालू आहेत, यावरून काय वाटत असेल? दुःख होत असेल, हसू येत असेल, कीव येत असेल, काही सांगता येत नाही. पण त्यांना एक गोष्ट नक्की वाटत असेल की, ज्या स्वराज्यासाठी मी सर्वस्वाचे हवन केले, जातीपाती, पंथभेद विसरून सुराज्याच्या कामाला सर्व लोकांना लावले, ब्राह्मण म्हणून ब्राह्मणांना वगळले नाही आणि आगरी, कोळी, भंडारी यांना राजकारणातील काय कळते, असे म्हणून त्यांना दूर ठेवले नाही. खांद्यावर घोंगडी पांघरून गावोगाव फिरणार्या धनगरांना दूर लोटले नाही. महार-मांगाना कधी अस्पृश्य म्हटले नाही. ही सर्व आपली माणसे आहेत, मराठी मातीची माणसे आहेत, सर्व मराठा आहेत आणि सर्वांना स्वराज्यासाठी आणि सुराज्यासाठी मर्दुमकी करायला लावली.
महाराज म्हणत असतील, ''माझा हा वारसा पुढे नेण्याऐवजी, माझ्या नावाचा वापर करून महाराष्ट्राला जातवादाचा डबका करून टाकलेला आहे." दुसर्याचे चांगले पाहण्याऐवजी नसलेले दोष त्याला चिकटविण्याचे गलिच्छ राजकारण चालले आहे. महाराज नक्कीच म्हणतील की, "महाराष्ट्र सडवायचा असेल तर तुम्ही आपल्या कर्तृत्वाने सडवा, तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावी लागतील आणि महाराष्ट्र घडवायचा असेल, तर ३५० वर्षांपूर्वी माझ्या शक्ती, बुद्धी, युक्तीने मला जे काही करता आले, ते करण्याचा मी प्रयत्न केला, त्याचे स्मरण करा. तो वारसा पुढे नेण्याची हिम्मत असेल, बाहूंत बळ असेल, तर तो वारसा स्वीकारा. पण त्या वारशाची वाट लावू नका. इतिहास जसा मला विसरत नाही तसा इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही."