मुंबई : शासकीय परिपत्रकात खाडाखोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी मुंबई विद्यापीठात उघडकीस आला आहे. शासकीय परिपत्रकातील ही खाडाखोड राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप होत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
मुंबई विद्यापीठात ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’ या विभागात शिकणार्या काही विद्यार्थ्यांनी संचालक योगेश सोमण यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत नुकतेच आंदोलन केले. या आंदोलनात काही डाव्या विचारधारेच्या विद्यार्थी संघटनांनीही आपला सहभाग नोंदवला. परंतु आपला राजकीय हेतू साध्य करण्याच्या हेतूनेच डाव्या संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याचे काही इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सोमण यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या निषेधाची एक चित्रफीत सोमण यांनी प्रसिद्ध केली होती. या चित्रफीतीचा मुद्दा यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान उपस्थित करत त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली.
त्यानंतर या सर्व मागण्यांनुसार १३ जानेवारीच्या रात्री १२ वाजता या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुद्देनिशी शहनिशा करण्यासाठी तात्काळ सत्यशोधन समिती गठीत करण्यात येईल असे आश्वासन देणारे लेखी पत्रक विद्यापीठ प्रशासनाने दिले.या पत्रकात ’संचालक योगेश सोमण यांच्यावर चौकशीनंतर कारवाई करण्याबाबतचा उल्लेख’ केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. परंतु या पत्रकातच खाडाखोड करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या पत्रकात खाडाखोड करून सोमण यांच्यावर ’तात्काळ कारवाई करण्यात येईल’ असा उल्लेख करण्यात आलाचा हा आरोप आहे. ही खाडाखोड का करण्यात आली, यामागे नेमके कारण काय, कोणत्या राजकीय दबावापोटी ही खाडाखोड करण्यात आली आहे का? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी योगेश सोमण यांच्या समर्थनार्थ असणारे विद्यार्थी करत आहेत. तसेच विद्यापीठ प्रशासनाने रात्री आंदोलनकर्त्यांना दिलेल्या लेखी आश्वासनात कोणत्या दबावाखाली ही खाडाखोड केली याचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी होत आहे.