‘भागो मोहन प्यारे’ या झी मराठीवरील मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेले पात्र म्हणजे ‘मदन म्हात्रे.’ ही भूमिका अगदी चोखपणे साकारणाऱ्या क्षितिज झावरे यांच्याविषयी...
‘‘मी पहिलं भाषण केलं, तो क्षण आजही मला आठवतो. लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्ताने केलेलं ते भाषण होतं. त्यावेळी भाषण करताना माझा उडालेला थरकाप आजही मला आठवतो. वर्गातल्या भिंतीचा रिकामा कोपरा पकडला आणि जे काही पाठ केलं होतं, ते एका दमात पटापट बोलून मी मोकळा झालो. कोणासमोर काहीतरी सादर करण्याची ती माझी पहिली वेळ होती...” आणि आज हाच गोंधळलेला, गडबडलेला तो विद्यार्थी मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडदा गाजवतोय.
रमेश मोरे लिखित आणि सतीश लोटके दिग्दर्शित ’आमचं आकाशच वेगळं’ या नाटकातून क्षितिज यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. राज्य नाट्यस्पर्धेत अहमदनगर केंद्रातून हे नाटक सादर झाले. त्यांच्या या नाटकाने अहमदनगर केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवत राज्य पातळीच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या नाटकात त्यांनी ’मनोज’ ही भूमिका साकारली होती. क्षितिज यांचा नाट्यसृष्टीतील प्रवास सुरु झाला तो याच ‘मनोज’पासून. नंतरच्या काळात सलग दोन वर्षे नाटकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. संतोष पवार लिखित ’जाणून बुजून’ या नाटकाने अहमदनगरहून थेट अंतिम फेरीत धडक मारत राज्य पातळीवर प्रथम पारितोषिक पटकावले. या नाटकासाठी क्षितिज यांना राज्य शासनाकडून अभिनयाचे प्रथम पारितोषिक घोषित झाले. त्याचवर्षी व्यावसायिक नाट्यविभागात भरत जाधव यांना ’सही रे सही’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले, तर क्षितिज यांना हौशी नाट्यविभागातून अभिनयाचे प्रथम पारितोषिक वयाच्या १९व्या वर्षी जाहीर झाले. यावेळेस गोव्याच्या कला अकादमीत झालेल्या कार्यक्रमात क्षितिज आणि भरत जाधव यांना ही पारितोषिक प्रदान करुन गौरविण्यात आले.
मूळ पारनेरचे असलेल्या क्षितिज झावरे यांचे शिक्षण अहमदनगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालयात झाले. पुढे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक स्कूलमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी थेट व्यवसायाला हात घातला. पण, लहानपणापासूनच त्यांना अभिनय, नाटक याविषयी प्रचंड उत्सुकता आणि आवड होती. स्नेहसंमेलनात होणार्या नाटकांत सहभागी होण्यासाठी कायमच ते प्रयत्नशील असायचे. पण, त्यावेळेस काही ठरलेल्या टीम असायच्या. त्यांच्या आधी कार्यशाळाही पार पाडायच्या. त्यामुळे क्षितिज यांना शालेय जीवनात नाटकात काम करण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण शिक्षण पूर्ण होताच, क्षितिज पुन्हा आपल्या आवडीकडे वळले.
ते सांगतात,“त्यावेळेस माझ्या पिढीचा नायक म्हणजे शाहरुख. मीदेखील त्याचा चाहता होतो आणि तो त्याकाळी माझे प्रेरणास्थान! हे हास्यास्पद असले तरी प्रत्येक पिढीचा एक नायक असतो, ज्याचं ते अनुकरण करतात.” तसेच शाहरुखचे कामही क्षितिज यांच्यासाठी कायमच प्रेरणादायी ठरले. भटकंतीची प्रचंड आवडत असल्याचे क्षितिज आवर्जून सांगतात. भावविश्वाला स्पर्श करणारे संगीत आणि मित्रांसोबत वेळ घालवतानाही ते चांगलेच रमतात. गोवा, काश्मीरसोबतच काही दिवस युरोपात राहिल्याने त्यांना युरोपही तितकाच भावला. आपला जन्म युरोपात नाही तर गोवा, कोकणसारख्या ठिकाणी व्हायला हवा होता, असं त्यांना कायम वाटतं. पण, नगर शहराविषयीही त्यांच्या मनात तितकीच आपुलकी आणि प्रेम दिसून येतं. “मी जिथे असेन तिथे आनंदी राहायला आवडतं,” असा आनंदी जीवनाचा मूलमंत्र ते सांगतात.
केदार शिंदे लिखित ’आभास की भास’ ही एकांकिका क्षितिज यांनी स्वतः दिग्दर्शित केली, ज्यात अभिजीत दळवी आणि क्षितिज यांनी एकत्र काम केले. या एकांकिकेनेही प्रथम पारितोषिक पटकावले. या यशाचे गुपित सांगताना क्षितिज म्हणतात, “मी काही वर्षे पडद्यामागे राहून काम केले. तंत्रज्ञ, संगीत, दिग्दर्शन यांसारख्या गोष्टीतील बारकावे शिकून घेतले, ते मला इथे कमी आले. त्यामुळे त्या एकांकिकेला एक वेगळे स्वरूप देऊ शकलो.” राज्य नाट्यस्पर्धेत क्षितिज यांनी केलेला एक प्रयोग महाराष्ट्राभर गाजला, तो म्हणजे, त्यांनी योगेश सोमण लिखित ’अन् सोंगच फार.’ हे विनोदी नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सादर करत त्यांनी ‘राज्य नाट्यात विनोदी नाटकास वाव नाही,’ हा समज मोडीत काढला. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी क्षितिज यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने अहमदनगर केंद्रातून दुसरा क्रमांक पटकावत अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीच्या सादरीकरणानंतर ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले. “हे नाटक रंगभूमीवर येणं हे आमच्यासाठी खूप मोठा यश होतं,” असे ते आवर्जून नमूद करतात. यानंतर एका लेखकाच्या शोधात असतानाच आपण स्वतःच लेखन करावे, असे वाटल्यामुळे मग क्षितिज लेखनाकडे वळले. २०१३मध्ये त्यांनी लिहिलेल्या पहिल्या वहिल्या ’आय एम कॅप्टन मलिक’ नाटकाने हॅट्ट्रिक करत सर्व प्रकारातील पारितोषिके जिंकत, ते अंतिम फेरीत दाखल झाले. भारत-पाकिस्तान या विषयावर हे नाटक होते, पण काही कारणास्तव अंतिम फेरीत या नाटकाला तितकेसे यश मिळाले नाही. ही कसर भरून काढली ती ’द ग्रेट एक्सचेंज’ या नाटकाने. या नाटकाने क्षितिज यांना अभिनयातील रौप्यपदकाचे मानकरी बनवले, पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवला.
२००६साली ’सविताबानो’ या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. ’झी मराठी’च्या ’भागो मोहन प्यारे’मधील त्यांचा ’मदन म्हात्रे’ प्रेक्षकांना अधिक भावला. त्यासाठी त्यांना ’झी मराठी’च्या पुरस्काराचे नामांकन ही मिळाले. क्षितिज यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अहमदनगर जिल्हा शाखेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्याचबरोबर प्रमुख कार्यवाहपदही सांभाळले. रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये ई-लर्निग प्रोजेक्टवर ते काम करतायेत. जिल्हापरिषदेच्या मुलांनीही बाहेरील स्पर्धेत टिकावं, सीबीएसई आणि इंग्रजीमाध्यमातील शाळांमध्ये असणाऱ्या सर्व सोयीसुविधा युक्त शिक्षण यांनाही मिळावे त्यांचाही तो अधिकार आहे याकरिता त्यांचा हा प्रयत्न आहे.
हौशी रंगभूमीवरून रुपेरी पडद्यावर मालिका साकारताना अतुल परचुरेंसारखा मोठा भाऊ मला मिळाला हे देखील त्यांनी आवर्जुन सांगितले. नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या तरुण पिढीला ते सांगू इच्छितात कि, “याठिकाणी येऊन तुम्ही चांगलं काम करा. याठिकाणी तुम्ही नट असणं एवढी एकच अपेक्षा नाहीये. तुम्हाला हव्या त्या सर्व गोष्टी मिळायला नशिबाची साथ पण लागते. तुम्ही फक्त एक नट असून चालत नाही तर तुम्ही माणूस म्हणून ही तुम्ही सर्वांशी जुळवून घेणे गरजेचे असते. सेटवर वावरताना वक्तशीरपणा असावा. तुम्ही रुपेरी पडद्यावर काम करा पण हौशी रंगभूमीशी नातं तोडू नका.आज कलाकार घडतो तो याच हौशी रंगभूमीवरून. आपलं कुटुंब जगू शकेल त्यांचा उदरनिर्वाह करू शकाल एवढी शैक्षणिक पात्रताही कमवा इतकंच मी सांगेन.” अशा चतुरस्र अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक असणार्या क्षितिज झावरे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!