उस्मानाबाद : ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळते. संमेलनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी निमंत्रित कवींनी विविध विषयांवरील, मानवी भावभावनांवरील तसेच सामाजिक व शेतकी प्रश्न, समस्यांवरील अनेकानेक कविता सादर केल्या. तर दुपारी कथाकथनाचा कार्यक्रमही झाला. कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश तराळ हे होते. तर सहभागी कथाकारांत विलास सिंदगीकर, रवींद्र भयवाल, रवींद्र पांढरे, हिंमत पाटील, माधवी घारपूरे व सरोज देशपांडे यांचा समावेश होता. साहित्य संमेलनाला आलेल्या रसिक, प्रेक्षक व श्रोत्यानी कविसंमेलन तसेच कथाकथनालाही उत्तम प्रतिसाद दिला.
साहित्यिक कार्यक्रमाबरोबरच आणखी इतरही उपक्रमाचे आयोजन संमेलनात करण्यात आले आहे. त्यातलेच एक म्हणजे भारत गजेंद्रगडकर यांनी काढलेल्या लेह व लडाख येथील छायाचित्रांचे प्रदर्शन. भारत गजेंद्रगडकर उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचा प्रवास नेहमीच सुरु असतो. गजेंद्रगडकर केवळ प्रवास करुनच थांबत नाहीत तर जिथे भेट दिली त्या त्या स्थळाची, ठिकाणाची उत्कृष्ट छायाचित्रेही काढतात. लेह व लडाखला भेट दिल्यानंतरही त्यांनी तिथल्या सौंदर्याने नटलेल्या निसर्गाची, हिमाच्छादित गिरीशिखरांची, सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या डोंगररांगांची छायाचित्रे आपल्या कॅमेराच्या लेन्समधून टिपली. गजेंद्रगडकर यांच्या याच छायाचित्रांचे प्रदर्शन संत गोरोबाकाका साहित्य संमेलनात सुरु आहे. लेह-लडाखच नव्हे तर इतरही ठिकाणच्या व्यक्तींची, संस्कृतीची, परंपरांची छायाचित्रेही त्यांच्या या प्रदर्शनात मांडण्यात आलेली आहेत.