चिरंतन स्फूर्तीचा स्रोत स्वामी विवेकानंद

    11-Jan-2020
Total Views |

vv_1  H x W: 0



‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’चा संदेश देत युवांच्या मनात नवचेतना जागृत करणारे युगप्रवर्तक, महान संन्यासी स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचे विचार केवळ भारतभूमीपुरते मर्यादित नव्हते, तर अवघ्या जगाला त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. स्वामीजींचे विचार कालातीत आहेत. तेव्हा, आज स्वामी विवेकानंदांची जयंती आणि ‘राष्ट्रीय युवा दिना’निमित्त त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करुया.



कोलकाताच्या उत्तर भागात’ सिमुलीया’ भागामध्ये दत्त परिवार राहत असे. दुर्गाप्रसाद दत्त हे एका कायदेविषयक काम करणार्‍या व्यवसायात नोकरी करत होते. श्यामासुंदरी नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. विश्वनाथ नावाच्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्य भावना प्रबळ झाली आणि ते संन्यास घेऊन निघून गेले. विश्वनाथ दत्त हे अत्यंत बुद्धिमान व आधुनिक विचारांचे होते आणि वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी आत्मविश्वासाने वकिलीचा व्यवसाय सुरू केला. पुढे भुवनेश्वरीदेवीयांच्याशी विवाहबद्ध झाले. मोठ्या संसाराची जबाबदारी त्यांनी अतिशय अनुकूल परिस्थितीतही अतिशय खंबीरपणे पेलली. स्वामी विवेकानंदांचे म्हणजे पूर्वाश्रमीच्या नरेंद्र दत्त यांचे माता-पिता. दोघांचेही उत्तमोत्तम गुण घेऊन नरेंद्र जन्माला आले होते. विश्वनाथ दत्त यांनी भरपूर संपत्ती मिळवली. परंतु, राखली नाही. भुवनेश्वरीदेवी याही आधुनिक विचारांच्या होत्या. त्यांनी मुलांबरोबरच मुलींनाही शाळेत घातलं. स्वामीजींचे धाकटे बंधू भूपेंद्रनाथ हे क्रांतिकारक चळवळीत होते. स्वामीजींना तीन भाऊ व सहा बहिणी होत्या.


स्वामीजींचा जन्म पौष कृष्ण सप्तमीला म्हणजे १२ जानेवारी
, १८६३ ला पहाटे ब्राह्ममुहूर्तावर झाला. मकरसंक्रांतीचा पवित्र दिवस होता तो. त्यांच्या जन्मापूर्वी भुवनेश्वरीदेवींना असे स्वप्न पडले की, भगवान शिव आपल्यापोटी पुत्र म्हणून येणार आहेत. त्यांना ’वीरेश्वर’ हे शिवाचे नाव देण्यात आले. व्यवहारातील नाव अर्थात ’नरेंद्र’ हेच होते. सर्वजण त्यांना ’बिले’ या टोपण नावाने हाक मारायचे. तरुण वयात संन्यासी झालेले नरेंद्रचे आजोबा दुर्गप्रसाद यांच्याशी नरेंद्रचे खूप साम्य होते, असे त्यावेळचे लोक म्हणत. त्यामुळे हाही एक दिवस वैराग्य वृत्तीने घर सोडून जाईल, अशी आईला काळजी वाटत असे. नरेंद्र लहानपणी खूप खोडकर होता. जेव्हा त्याचा अवखळपणा प्रमाणाबाहेर जात असे, तेव्हा भुवनेश्वरी देवी सरळ त्याला वाहत्या पाण्याच्या नळाखाली घेऊन बसवत आणि ‘शिव शिव’ असा नामोच्चार करीत. मग हे बाळ शांत होत असे. स्वामीजींची शिवभक्ती प्रसिद्ध होती. एकदा मठातील संन्यासी बंधूंनी शिवरुपात नटवलं होतं आणि खरोखर भगवान शिवांचा आविर्भाव झाल्यासारखे स्वामीजी दिसत होते.


स्वामीजींना भगवान गौतम बुद्धांविषयी अत्यंत श्रद्धा आणि प्रेम होते
. स्वामीजींचे अंतःकरणइतरांच्या व्यथा, वेदना पाहून कळवळत असे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत असत. भगवान श्रीरामकृष्ण आणि नरेंद्राची जेव्हा भेट झाली, त्यावेळी ते म्हणाले होते, “नरेंद्राला कोणीच ओळखू शकणार नाही. तो नररूपात आलेला नारायण आहे. मानवतेची दुःख दूर करायला तो आला आहे.” श्रीरामकृष्ण हे नरेंद्रला आपली लीला सहचर समजत असत. भूतलावर त्यांच्यासह काम करायला आलेले त्यांचे शिष्य आणि सहकारी अनेक होते, पण नरेंद्र त्या सर्वांचा मुकूटमणी होता.


नरेंद्रच्या विविध दिशांनी विकसित होणार्‍या क्षमता
, त्यांचं वाचन, त्यांचा व्यासंग, त्यांचं वक्तृत्व कोलकात्यातील मान्यवरांशी त्यांनी केलेले वादसंवाद संगीतातील त्यांची साधना आणि उपजत असलेले नेतृत्वगुण यांचा मोकळ्या वातावरणात झालेला विकास ही सर्व जणू भविष्यकाळात त्यांच्या हातून जे कार्य होणार होते, त्याची पूर्वतयारी होती. अत्यंत गतिमान वाचनशक्ती आणि प्रकाशमय स्मृती हे भविष्यकालातही नरेंद्रबाबत इतरांना चकित करून गेलेले गुणविशेष होते. या गुणविशेषणातून पुढे ‘नरेंद्र ते स्वामी विवेकानंद’ हा प्रवास झाला आणि स्वामीजी दिग्विजयी झाले.


‘स्वामी विवेकानंद’ हा सप्ताक्षरी मंत्र युवाचेतना जागृत करतो. प्रकांड बुद्धिमत्ता, ज्ञान, वैराग्य, धैर्य या गुणसंपदेने अलंकृत झालेल्या स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनातविविध विषयांमध्ये असामान्य गती संपादित केली होती. वैखरीच्या साम्राज्यातील त्यांचे सम्राटपद सर्वतोपरी होते. वाणीच्या सामर्थ्याने स्वामीजींनी आपल्या राष्ट्राला जागे केले. भारतीय अध्यात्माला वेदांताच्या मूळ स्रोताकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या वाक्शक्तीचा उपयोग केला. युवकांना विजिगिषु वृत्तीने भरून आणि भारून टाकले. संन्यास धर्माला समाजसेवेचे परिमाण दिले. अमेरिका आणि युरोपीय देशातील हजारोंना खर्‍या भारताचा परिचय घडवला आणि त्या परिचयातूनच भगिनी निवेदितांसारखे अनेक शिष्य स्वामीजींच्या बरोबर भारतात आले. स्वामीजींच्या जीवनाचे प्रेरणामुल्य मोजण्यासाठी तेव्हाही कोणते मोजमाप नव्हते आणि मानवी जीवनाच्या आजच्या प्रगत अवस्थेतही ते मूल्य अचूक मोजता येईल, अशी शक्यता नाही. नुसत्या त्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानेच मनाचे सारे दैन्य नाहीसे होते. त्यांचे उभे राहणे त्यांचे बसणे, त्यांचे रूप एवढे पाहण्यानेही पाहणार्‍याच्या मनात हत्तीचे बळ संचारते. विवेक आणि वैराग्ययातूनच विशुद्ध चारित्र्य निर्माण होते. विशुद्ध चारित्र्याचा परमोच्च आविष्कार म्हणजे स्वामी विवेकानंदाचे व्यक्तिमत्त्व. ज्ञान आणि वैराग्य सत्यनिष्ठेनेच जीवनात स्थिरावते. ज्ञान, वैराग्य व सत्यनिष्ठा या त्रयींतूनच स्वाभिमान प्रकट होतो. स्वामीजी अशा गुणसंपन्नतेचे आविष्कारण होते.


स्वामी विवेकानंद म्हणजे
राष्ट्राशी तन्मय झालेले व्यक्तिमत्त्व’ असेच म्हणता येईल. भारत नेमका कसा आहे, हे जाणण्याची ज्याला इच्छा आहे, त्याने खुशाल स्वामीजींच्या ग्रंथांचे वाचन करावे. त्यात ‘राष्ट्र आणि राष्ट्रहित सर्वतोपरी’ हीच भावना लक्षात येईल. राष्ट्रचेतनेच्या युवावस्थेलादेहरूपात प्रगट व्हावे वाटले आणि तिने स्वामीजींच्या रुपात स्वतःला प्रगट केले. स्वामी विवेकानंदांना स्वतःसाठी काय मिळवायचे होते? त्यांना फक्त भारताला जगाच्या गुरूपदी बसवण्याचा मोह होता आणि म्हणूनच स्वामीजींचे अनुसंधान राष्ट्राशीच जोडले होते.


वाचे बरवे कवित्व।

कवित्वी बरवे रसिकत्व।

रसिकत्वी परतत्व। स्पर्शू जैसा ॥

माऊलींनी सांगितलेल्या या ओवींच्या उंचीचे वक्तृत्व स्वामीजींना लाभले होते. आज स्वामीजींचे जे साहित्य आपल्याला उपलब्ध आहे ते ते सर्व, त्यांनी लिहिलेली पत्र सोडून सगळे स्वामीजींच्या व्याख्यानांचे संकलन आहे. स्वामीजींचे भाषण म्हणजे वेद-उपनिषदांच्या ज्ञानाचाच कलोचित आविष्कार होता.


११ सप्टेंबर
, १८९३ शिकागो येथील सर्वधर्मपरिषद. हा दिवस स्वामी विवेकानंदांच्या विजयासाठीच परमेश्वराने निवडलेला होता. स्वामीजींच्या या दिवशीच्या एका भाषणाने अवघा हिंदुस्थान सन्मानाने उभा ठाकला. ‘अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो’ या चारच शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. श्रोत्यांतील अनेक जण उभे राहिले, अनेक आनंदाने ओरडू लागले. काही काळ टाळ्यांचा सतत कडकडाट सुरू होता. असे स्वामींजींचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. खर्‍या अर्थाने जागतिक पातळीवर भारताचे नाव स्वामीजींनी सुवर्णांकीत केले. दक्षिणेश्वरच्या मंदिरातील श्रीरामकृष्णांच्या चरणाशी बसून वेचलेल्या दिव्य संस्कारांचे ते प्रगटीकरणच होते. त्या भाषणातील प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणाचा भाव होता. शब्द साधे होते, पण सच्चे होते. माऊलींनी जसे ज्ञानेश्वरीमध्ये काही लक्षणं सांगितली आहेत ’मितुले आणि साच’ म्हणजे सत्याचेच प्रतिपादन हवे आणि नेमके हवे. ‘बोलते जे अर्णव। पीयुषाचे॥’ बोलण्यात आग्रहाइतकेच आर्जव हवे. अगत्य हवे. माधुर्य ही हवे. ही सारी वैशिष्ट्ये स्वामीजींच्या व्याख्यानात दिसतात. स्वामीजींची साद प्रेमपूर्ण होती, असे वक्तृत्वच प्रभावी असते, जे विशुद्ध चारित्र्यातून आणि बुद्धीच्या परिपक्वतेतून प्रगट होते. भक्ती-ज्ञान- विवेक-वैराग्य यांचा अलौकिक ठेवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचे शब्द आपणास सदैव काही संदेश देतात. उत्तुंग प्रेरणा देत असतात. विवेकानंदांनी आपल्या भाषणात विश्वाचे कल्याण करू शकणार्‍या भगवद्गीतेचा संदर्भ दिला. आपल्या वागण्याने व शस्त्राने विनाकारण कोणीही कोणाला त्रास देऊ नये, असे झाले, तर जीवनाचा अर्थ उमगेल आणि जीवन अर्थपूर्ण होईल.


स्वामीजींनी भारतासाठी संदेश दिला आहे
, “हे भारता, विसरू नकोस की, तुझ्या स्त्रियांचा आदर्श सीता, सावित्री, दमयंती आहेत. विसरू नकोस की, तुझे उपास्य देव सर्वत्यागी उमानाथ शंकर आहेत. विसरू नकोस की, तुझा विवाह, तुझे धन, तुझे जीवनही इंद्रियसुखासाठी नाही. केवळ तुझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही. विसरू नकोस की, तुझा जन्म मातेसाठी बली म्हणूनच झाला आहे. विसरू नकोस की, तुझा समाज म्हणजे त्या विराट जगन्मातेची केवळ छाया आहे. विसरू नकोस की, दलित, अज्ञ, दरिद्री, निरक्षर, चांभार, भंगी हे सारे तुझ्याच रक्तमांसाचे आहेत, तुझेच भाऊ आहेत. हे वीरा, धीट हो धैर्य सोडू नकोस. तू भारतवासी आहेस, त्याबद्दल गर्व वाटू दे आणि अभिमानाने घोषणा कर की, ’मी भारतवासी आहे, प्रत्येक भारतवासी माझा भाऊ आहे. अज्ञ भारतवासी, दरिद्री भारतवासी, ब्राह्मण भारतवासी, चांडाळ भारतवासी हे सर्व माझे भाऊ आहेत. भारतवासीहा माझा प्राण आहे. भारताच्या देवदेवता या माझ्या देवदेवता आहेत. भारतातील समाज हा माझा बालपणाचा पाळणा आहे. माझ्या तरुणपणीची फुलबाग आहे. माझ्या म्हातारपणीची काशी आहे. मला खरा मनुष्य बनव,” हाच स्वामीजींचा आग्रह होता.


स्वामी विवेकानंद ही आपल्या मर्मबंधातील ठेव आहे
. सर्वांना आपलेसे वाटणारे आणि प्रेरणास्वरूप असलेले स्वामीजी आणि त्यांची अमृतवाणी आपल्याला साद घालत आहे. ही वाणी वेदांताची आहे. आत्म्याच्या अमरत्वाची आहे. समतेची, मैत्रीची, स्वातंत्र्याची वाणी आहे. विश्वबंधुत्वाची ही वाणी आहे. स्वामीजी केवळ बंगालचेच नव्हते, केवळ भारताचेही नव्हते, तर ते सार्‍या जगाचे होते. सर्वस्वाचा त्याग करणारे ते संन्यासी होते आणि त्यांच्या हृदयात ‘स्वदेशप्रेम’ व ‘विश्वबंधुत्व’ या भावनांचा अभूतपूर्व विकास झाला होता. ते विराटाचे पुजारी होते. त्यांचा ईश्वर हा कोणत्याही एका मंदिरात नव्हता. त्यांच्या दृष्टीने देशप्रेम, मानवसेवा व ईश्वराची आराधना या सार्‍या गोष्टी समान होत्या. समग्र भारत वर्षाचे कल्याण व्हावे म्हणून ते म्हणाले होते- ’‘पुढील ५० वर्षे देशाची सेवा हीच तुमची साधना असू द्या. राष्ट्रदेवता हीच तुमची एकमात्र आराध्यदेवता असू द्या.” स्वामीजींच्या या संदेशामध्ये देशप्रेमाचे व राष्ट्रीयत्वाचे बीज होते. त्यामुळेच तर आज हा महान वृक्ष बनला आहे. देशसेवेचा हा महामंत्र हजारोंच्या हृदयात संचारित झाला आणि त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय उत्थान झाले. आज स्वातंत्र्य मिळून सत्तरहून अधिक वर्ष झाली, पण भारतीय जनता आपल्या घोर निद्रेतून पूर्णपणे जागी झालेली नाही. अजूनही येथे दुःख, दैन्य, गरिबी, स्वास्थ्याचा अभाव या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. सामान्य मनुष्याची उन्नती होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने भारत जागृत झाला, असे म्हणता येईल व या जागरणाचे आद्य होते. स्वामी विवेकानंद त्यांची आपल्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करण्याचे दायित्व आपल्यावरच आहे.


मातृभूमी हे दैवत

आपण स्थापियले पूजिले

त्याग, पराक्रम, सेवा

यांचे त्रिदल पदी वाहिले


आज त्याग
, पराक्रम आणि सेवा या संकल्पना एकविसाव्या शतकात समजण्याची आवश्यकता आहे. ‘त्याग’ ही एक वृत्ती आहे. देव-देश कार्यापुढे व्यक्तिगत मानसन्मान सर्व काही गौण आहे. आपण भारतीय आज जीवनाच्या अनेक क्षेत्रांत उत्तमतेचे मानदंड उभे करत आहोत. पराक्रमाचा इतिहास आपल्याला पूर्वीपासूनमिळाला आहे. आज आपल्या देशाचे रूप पालटायचे असेल तर प्रबळ प्रेरणा, प्रबळ सामूहिक इच्छाशक्ती आणि निश्चयशक्ती हवी आहे आणि ते मिळवण्याचे पावनतीर्थ म्हणजे स्वामी विवेकानंद यांचे चरित्र आणि त्यांचे विचार आहेत.

- सर्वेश फडणवीस