मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी मुंबईतील खड्ड्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांची सद्यस्थिती, खड्डे भरण्याचे तंत्रज्ञान आणि पालिकेच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईत पाऊस उशिरा सुरू झाला तरी मुंबईतील रस्त्यांच्या खड्डे दुरुस्तीची कामे पाऊस पडल्यावरसुद्धा पूर्ण झालेली नव्हती. साधारणपणे मुंबईतील कामे पालिका दि. १ ऑक्टोबरपासून ३१ मेपर्यंत पावसाळा नसताना पूर्ण करत असते. २०१९ मध्ये मुंबई पालिकेने ७२५ रस्त्यांची व १८ रस्त्यांच्या चौकांची कामे हातात घेतली आहेत. शिवाय गेल्या वर्षीची राहिलेली ६३५ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेतच. पालिकेने फक्त ४५ टक्के कामे जून महिन्यापर्यंत संपवली. ही कामे मान्सूनव्यतिरिक्तच्या दिवसांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असते. रस्ता विभागाचे मुख्य अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या म्हणण्याप्रमाणे, “रस्त्यातील खड्ड्यांची संख्या कमी होत आहे. सध्या असणारे खड्डे हे रस्तादुरुस्ती करताना अयोग्य पद्धतीने कोल्डमिक्स भरल्यामुळे वा जलवाहिनी फुटल्यावर घाईने कामे केल्यामुळे कदाचित उद्भवले असतील.”
मुंबई पालिका ऐन पावसाळ्यात खड्डे दुरुस्तीकरिता वरळीला बांधलेल्या मिक्स कारखान्यामधून आणलेला कोल्डमिक्स माल वापरत आहे. तेथून १२०० टनांपेक्षा अधिक माल सर्व २४ प्रभागातील रस्तादुरुस्तीच्या कामांकरिता वापरला जाणार आहे. ‘डिफेक्ट लायाबिलीटी’ मुदत जारी असलेल्या कंत्राटदारांच्या कामाकरिता तो माल वापरला जाणार नाही, तो त्यांच्या खर्चाने आणला जाईल. गेल्या वर्षीपर्यंत पालिका परदेशाहून (ऑस्ट्रिया व इस्रायलहून) आयात केलेला कोल्डमिक्स माल वापरत होती. मात्र, यापुढे पालिकेच्या केंद्रात बनलेला माल वापरला जाणार आहे. त्यामुळे परदेशी मालावरचा खर्च वाचेल. हॉटमिक्सचा वापर केवळ मान्सूनव्यतिरिक्तच्या दिवसांमध्ये केला जातो. परंतु, कोल्डमिक्स पावसाळ्यातसुद्धा वापरता येते.
गेल्या वर्षी खड्डे दुरुस्तीकरिता कोल्डमिक्स पद्धत वापरली होती, पण २ हजार, ८९ ठिकाणांहून नागरिकांच्या खड्ड्यांविषयी तक्रारी आल्या. आता यापुढे ‘एमसीजीएम २४ ु ७’ अॅप व मदतीच्या यादीत दिलेल्या २४ प्रभागातील दूरध्वनी क्रमांक यांच्या साहाय्याने नागरिक रस्तेविषयक तक्रारी करू शकतील.
पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात आणि त्यात खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. मुंबई वाहतूक पोलिसांच्या साहाय्याने मुंबईतील अशा धोक्याच्या २०१८ मध्ये २१ जागा पालिकेने शोधल्या होत्या. २०१९ मध्ये १८ जागा राहिल्या आहेत. ही ठिकाणे शहरात दहा, पूर्व उपनगरात सहा व पश्चिम उपनगरात दोन अशी विखुरलेली आहे. अशा ठिकाणांपासून नागरिकांनी सावध राहावे. ही ठिकाणांची माहिती पालिका प्रभाग कचेरीमध्ये मिळू शकेल. मुंबई पालिकेने पालिका सोडून ३९ रस्त्यांकरिता (१२६ किमी लांब) इतर संस्थांची यादी दिली आहे. त्या रस्त्यांची मालकी व रस्त्यांची देखभाल एमएसआरडीसी, एमएमआरडीए, एसआरए, आरे, पीडब्ल्यूडी, बीपीटी, म्हाडा आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी यांच्याकडून होत आहेत. मुंबईतील असलेल्या एकूण रस्त्यांपैकी बहुतेक रस्ते पालिकेच्या मालकीचे आहेत व त्यात रुंदीकरणाची वा काँक्रिटीकरण्याची कामे सुरू आहेत.
काही मुख्य रस्त्यांची कामे खालीलप्रमाणे सुरू आहेत.
एल. बी. एस. मार्ग
पालिकेने शीव ते घाटकोपर भागाकरिता रुंदीकरणाचे काम हातात घेतले आहे. रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. अशा कामांमुळे वाहतूककोंडी होते. रस्त्यावर माती पसरलेली असते व खड्डे पण असतात. त्यातून अपघात होण्याची शक्यता असते. मायकेल हायस्कूलजवळ ‘क्रॉसड्रेन’ची तसेच ‘बॉक्सड्रेन’ची कामे अपूर्णावस्थेत आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्ग
हा रस्ता एमएमआरडीएच्या देखभालीचा आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर बॅरिकेट्स आहेत व खड्डेही पडलेले आहेत. डेब्रीजचे व्यवस्थापन चांगले होत आहे, पण मेट्रोच्या कामांमुळे अडथळा येत आहे. महानगर आयुक्तांनी अभियंत्यांना योग्य आदेश दिले आहेत. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन चांगल्याप्रकारे होत आहे. एमएमआरडीए लवकरच आपत्कालीन व्यवस्थेकरिता केंद्र स्थापन करणार आहे.
एल. जे. मार्ग
रस्त्याचे काम चांगले झाले आहे. परंतु, मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे व डेब्रीज निर्माण होतात. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता होती. पदपथांकरिता पण बॅरिकेट्स लावल्यामुळे पादचार्यांनाकोणताही धोका उद्भत नाही. एमएमआरडीएने तुंबलेले पाणी खेचण्याकरिता पंप लावले आहेत. एमएमआरडीए व पालिका अभियंत्यांच्या समन्वयामुळे नागरिकांना सुरक्षित रस्त्यांवरून प्रवास करता येतो.
एस. व्ही. मार्ग
काही ठिकाणी रुंदीकरणाची कामे चालू असल्यामुळे थोडे खड्डे पडले आहेत. पण आपत्कालीन घटना सोडल्या, तर रस्ता चांगल्या स्थितीत आहे.
अंधेरी-कुर्ला मार्ग
हा रस्ता खराब अवस्थेत असल्यामुळे धोक्याचा ठरला आहे. अनेक ठिकाणी डेब्रीज आहेत. मेट्रोची कामे झाल्यावर चांगल्या नियोजनाभावी रस्त्याची स्थिती खराब आहे. रस्त्यावरील दुरुस्तीची ६० टक्के कामे पालिकेकडून संपली आहेत. १०० टक्के दुरुस्तीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन कामामुळे रस्ता दुरुस्तीत अडथळे येत आहेत.
रस्त्यावर खड्डे किती?
खड्ड्यांबाबत एका तक्रारसंचात ३५० मुंबईकरांनी ४ हजार, ३५१ तक्रारी केल्यानंतर ४,००१ ठिकाणांवरील खड्डे बुजविले गेले असे पालिकेचे म्हणणे आहे. वरळीच्या कारखान्यात कोल्डमिक्समिश्रीत खडीचे उत्पादन करण्यात येत आहे. त्याचा वापर होत आहे. दुसर्या तक्रारसंचामध्ये भांडुपमध्ये जास्त तक्रारी आल्या आहेत. पालिकेचे म्हणणे आहे की, भांडुपच्या ३१२ तक्रारींपैकी ४३ तक्रारींची कामे बाकी आहेत. गोरेगावच्या ३३२ तक्रारींपैकी २९३ तक्रारींची कामे पूर्ण झाली आहेत. मालाड येथील ३१३ तक्रारींपैकी २८८ चे काम झाले. कुर्ला - २८८, अंधेरी प. - २६०, कुलाबा चर्चगेट - १४९ व दहिसर - ६२ ठिकाणांच्या तक्रारींचे निवारण केलेले आहे.
रस्ते खचण्याच्या घटना
२९ जानेवारी- मरिन ड्राईव्ह येथील सहा मीटर लांब व दोन मीटर रूंद रस्ता खचला. तो तीन दिवसांमध्ये दुरुस्त करण्यात आला.
५ जुलै - संघर्षनगर चांदिवलीचा २०० मीटर लांब रस्ता मोठ्या पावसामुळे खचला. १०० कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. विकासकाला एसआरए बांधकामाचे काम थांबवावे लागले. विकासकाकडून भराव घालून रस्ता दुरुस्तीचे काम दोन-तीन दिवसांमध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
३ जुलै - काळा चौकीत जमीन खचल्याने चार कुटुंबे रस्त्यावर आली. पालिकेच्या कामामुळे परिणाम झाल्याचा आरोप केला गेला आहे. पालिकेचे पर्जन्य जलवाहिनी बसविण्याचे काम सुरू होते.
२७ जून २०१८- मेट्रो चित्रपटगृहाजवळचा रस्ता खचला. परंतु, पंतप्रधानांची फेरी (पंतप्रधानांचा दौरा) असल्याने हा रस्ता २४ तासांमध्ये दुरुस्त केला गेला.
२८ जून २०१८ - ‘दोस्ती रिअॅल्टी लिमिटेड’चे बांधकाम पालिकेने थांबविले. कारण, अॅन्टॉप हिल, वडाळा येथे रस्त्याच्या हद्दीवरची भिंत भिंत कोसळली व रस्ता खचला होता. तो दुरुस्त करावा लागला.
१७ मे २०१८ गिरगावमध्ये चर्नी रोडला पुनर्वसन कामामुळे एक चार चौ.मीटर क्षेत्राचा रस्ता खचला होता. तो पालिकेला दुरुस्त करावा लागला.
रस्ता दुरुस्तीकरिता/बांधणीकरिता काही उपयुक्त मुद्दे
कोल्डमिक्स व हॉटमिक्स या वादात तज्ज्ञ लोकांचे सांगणे आहे की मुंबईतल्या जड व सततच्या वाहतुकीला आणि मोठ्या पावसाला तोंड देण्यासाठी हॉटमिक्स जास्त उपयुक्त ठरेल. सर्व रस्त्यांची कामे मात्र शास्त्रीय ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या पद्धतीने करावयाला हवीत. पालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत की, खड्डे दुरुस्तीची कामे सकाळी ६ ते ८ या वेळेत करावीत म्हणजे वाहतुकीला अडथळा येणार नाही. पालिकेने ठरविले आहे की, नवीन रस्त्यांवर युटीलिटी डक्ट बांधावेत. ही कल्पना चांगली आहे म्हणजे वारंवार रस्ते खोदावे लागणार नाहीत.
गेल्या पाच वर्षांत २०१४-१५ पासूनच्या गेल्या पाच वर्षांत पालिकेने २९ हजार, ७२६ खड्डे दुरुस्तीला ६८.३१ कोटी रुपये खर्च केले. परंतु, काँक्रीटचा रस्ता बांधण्यास १८ मीटर रुंदीचा रस्ता असला तर तो काँक्रीटचा बनतो. रस्ता वारंवार सेवावाहिनींच्या कामाकरिता तोडावा लागतो. त्याकरिता तो अस्फाल्टचा बनवितात.
९ मीटर रुंद व १ किमी अस्फाल्टचा रस्ता बांधण्यास ३.१५ कोटी रुपये तर काँक्रीटचा रस्ता बांधण्यास ५.८५ कोटी रुपये खर्च येतो. काँक्रीटचा देखभालीचा खर्च शून्य व त्याचे शेल्फ आयुष्य १० ते १५ वर्षे; तर अस्फाल्ट रस्त्याचे शेल्फ आयुष्य पाच वर्षे, पण खड्डे दुरुस्तीचा खर्च दरवर्षी पडतो व अपघातांची शक्यता म्हणून आता पालिकेने निर्णय घ्यावा की, सर्व रस्ते काँक्रीटचे बनवावे.
मुंबईकरांना सुरक्षित व सर्वसमावेशक असे रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘मुंबई स्ट्रीट लॅब’ संकल्पना कार्यान्वित झाली आहे. सुरुवातीला एस. व्ही. रस्ता, नेपियन्सी रस्ता, विक्रोळी पार्कसाईट मार्ग १७, मौलाना शौकत अली रस्ता आणि राजाराम मोहन रॉय रस्ता या पाच रस्त्यांकरिता नव्या संकल्पनेनुसार रस्त्यांची निर्मिती करण्याची पालिकेची योजना आहे. नगररचनाकारांकडून आराखडे मागविण्यात येतील.
‘लॉस एँजेलिस’मध्ये शहरातील उष्णता कमी होण्याकरिता अस्फाल्ट रस्त्यांवर ‘अॅण्टिहिट कोटिंग’ लावतात. हे कूल-सील सौरकिरणं परावर्तित करते व चाचणीमध्ये आढळले की, ते ११ अंशांपर्यंत तापमान कमी करते. प्रत्यक्षात एवढे होत नसेल. पण मुंबईत प्रयोग करण्यास हरकत नसावी. एक किमी रस्त्याकरिता १५ लाख रुपये खर्च येईल व ते सात वर्षे टिकेल, असा अंदाज वर्तविला आहे.