'आयपीएस' ते 'अल्ट्रामॅन'पर्यंतचा प्रवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019   
Total Views |



नुकत्याच झालेल्या 'रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका' (रॉ) या जागतिक स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून भारताचा झेंडा फडकावणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या या कर्तृत्वाविषयी...


सध्याच्या तरुणाईमध्ये 'फिटनेस' आणि एकूणच स्वतःच्या शरीराला पिळदार, बळकट करण्याचे वेड दिसून येते. अशावेळी जिममध्ये जाण्याबरोबरच स्टिरॉइड्स घेणे आणि फक्त दिखाव्यासाठी 'बॉडी बनवणे' हा जणू एक ट्रेंडच बनला आहे. पण, हे करत असताना आपल्या शरीरासाठी नेमके योग्य काय, याचा विचार सर्रास टाळला जातो. या शरीरकमाईचा आपण देशासाठी काही सदुपयोग करू शकतो, ही भावना तर फार कमी दिसते. मात्र, अपवादही आहेतच. ३०-४० वर्षांहून अधिक वयाच्या काही व्यक्ती स्वतःचे स्वास्थ्य जपून देशाचे नावही उंचावण्याचे काम करतात. त्यापैकीच एक म्हणजे कृष्णप्रकाश... 'ट्रायथलॉन' या आगळ्यावेगळ्या अ‍ॅथलेटिक स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने धावणे, पोहणे आणि सायकलिंग अशा तीन स्पर्धांचा समावेश होतो. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला 'आयर्नमॅन'चा किताब दिला जातो. जगभरामध्ये अशा स्पर्धा होत असतात आणि खडतर परिस्थितीचा सामना करून हजारो स्पर्धक त्यात आपली तंदुरुस्ती पडताळत असतात. भारताकडून पहिल्यांदा अभिनेता मिलिंद सोमण याने हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर या स्पर्धेची ओळख भारतामध्येही झाली. त्याच्यानंतर भारताचा दुसरा 'आयर्नमॅन' होण्याचा मान महाराष्ट्राचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांना मिळाला. २०१७ रोजी त्यांनी 'आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ट्रायथलॉन' स्पर्धा १४ तासांमध्ये जिंकून नवीन विश्वविक्रम केला होता. त्यानंतरही त्यांनी अशीच अनेक उंच शिखरे सर केली. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

 

कृष्णप्रकाश यांचा जन्म १५ ऑगस्ट, १९६९ रोजी झाला. त्यानंतर त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण हे झारखंडमधील हजारीबागमध्ये गेले. त्यांचे वडील हेदेखील उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे शालेय शिक्षण सेंट रॉबर्टस स्कूल, हजारीबागमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट कोलंबस महाविद्यालयात झाले. या काळामध्ये क्रीडा प्रकारातील त्यांची आवड त्यांनी जपली होती. अभ्यासासोबतच मोकळ्या वेळेत त्यांनी स्थानिक टेकड्यांवर ट्रेकिंग केले. तसेच, नदीमध्ये पोहायला जाणे आणि इतर क्रीडाप्रकारांमध्येही भाग घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांनी नेहरू युवा केंद्रासोबत सलग दोन वर्षे समाजसेवाही केली. १९९५ मध्ये राज्य शासनाच्या परीक्षांमध्ये भाग घेण्याचे त्यांनी ठरवले. या परीक्षेमध्ये त्रिस्तरीय निवड प्रक्रिया होती. त्यांनी पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये दोन टप्पे पार केले. परंतु, तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना अपयश आले. परंतु, तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी तीनही टप्पे पार केले आणि झारखंडमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये दुसरे स्थान मिळविले. त्यांची 'आयपीएस'साठी निवड झाली. त्यांनी हैद्राबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये १९९८-९९ मध्ये प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणानंतर त्यांना १९९९ मध्ये गडचिरोलीमध्ये पहिली पोस्टिंग मिळाली. मुंबईमध्ये बदली होण्यापूर्वी त्यांनी नांदेड, मालेगाव, बुलढाणा, अमरावती, सांगली आणि अहमदनगरसारख्या तालुक्यांमध्येही काम केले. या दरम्यान त्यांनी स्वत:ला खेळ आणि इतर गोष्टींपासून दूर ठेवले नाही, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अनेक खेळांमध्येदेखील भाग घेतला. याचा फायदा त्यांना पुढे झाला.

 

२०१४ पासून त्यांनी मुंबईतील मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मार्चमध्ये मालेगावमधील मॅरेथॉनला गेले असताना त्यांना 'आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस'बद्दल समजले. याबद्दल उत्कटता दाखवत त्यांनी फ्रान्समधील 'आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ट्रायथलॉन' स्पर्धेत भाग घेतला. या कठीण स्पर्धेची जोरदार तयारीदेखील त्यांनी केली. रोज आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी रेसकोर्स, वरळी सी फेस येथे धावण्याचा सराव केला. स्विमिंगसाठी गिरगाव चौपाटी, मफतलाल बाथ, पोलीस जिमखाना आणि गरवारे क्लब येथे सराव करत असत. सायकलिंगसाठीदेखील त्यांनी कसून सराव केला. यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नीनेदेखील साथ दिली. त्यांच्या या सरावाचे फळ म्हणजे ऑगस्ट २०१७ ला फ्रान्समध्ये झालेल्या 'आयर्नमॅन ट्रायथलॉन' स्पर्धेमध्ये त्यांनी ३.६८ किमी स्विमिंग, ४२ किमी मॅरेथॉन आणि १८० किमी सायकलिंग अवघ्या १४ तास ८ मिनिटांमध्ये पार करत विश्वविक्रम केला. त्यानंतर त्यांचा विक्रमांचा ओघ सुरूच राहिला. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत त्यांनी प्रशांत महासागरामध्ये १० किमी स्विमिंग, पर्वतीय भागांमध्ये ४२.१ किमी सायकलिंग आणि ८४.३ किमी धावून हा सर्व प्रवास निश्चित वेळेपेक्षा आधी संपवत 'अल्ट्रामॅन' हा किताब आपल्या नावावर केला. हा ९६ तासांचा हा प्रवास त्यांनी अवघ्या ८४ तासांमध्ये पूर्ण केला. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय अधिकारी ठरले. २०१९ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये 'रेस अक्रॉस वेस्ट अमेरिका'सारख्या कठीण स्पर्धेमध्ये 'सोलो मेल' प्रकारात चौथा क्रमांक मिळवून सायकलिंगमध्ये नवा विक्रम नोंदविला. कृष्णाप्रकाश यांनी वेळेआधीच १५०० किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा पूर्ण केली आणि अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले. 'आयपीएस ते अल्ट्रामॅन व्हाया आयर्नमॅन' असा अद्वितीय प्रवास करणाऱ्या कृष्णप्रकाश यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@