सरकारी नोकरी मिळणे सहजशक्य असतानासुद्धा शौरिन्द्रनाथ मात्र खडतर मार्गाने गेले. आपल्या पाठीवर कोणाचा तरी हात असेल, तेव्हाच यश मिळते ही धारणा चुकीची आहे. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, आत्मविश्वास, सातत्य आणि ध्येयस्पष्टता असेल तर कोणतेही कितीही कठीण असलेले ध्येयसुद्धा पूर्ण करता येते. मराठी तरुणांनी या गुणांचा अवलंब केल्यास ते नक्कीच यशस्वी होतील, असे शौरिन्द्रनाथ दत्ता यांचे मत आहे. किंबहुना, याच गुणाच्या जोरावर ते मनोरंजन क्षेत्रातले वतनदार झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर काही वर्षांतच वतनी जमीन हक्क कायदा अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत वतनदार/ जमिनदारांच्या जमिनी सरकारने काढून घेण्यास सुरुवात केली. अनेक जमीनदार आपल्या जमिनी सरकारला परत करताना चतुराई करत होते. मूळचे बंगालमधील पण पिढ्यान्पिढ्या आसाममध्ये राहिलेल्या आणि शेकडो एकर जमिनीचे मालक असलेल्या एका जमीनदाराला एकाने असाच चतुराईचा सल्ला दिला. त्याने जमीनदाराला एक सल्ला दिला की, वेगळी चूल दाखवून जमिनीचे वाटप केलेले कागदोपत्री दाखवा. त्यामुळे काही शेकडा एकर जमीन तरी तुमच्या ताब्यात राहील. मात्र, त्या जमीनदाराने हा प्रस्ताव धुडकारत सांगितले की, "आपलंच सरकार जमीन घेत आहे, तर त्यात काय हातचे राखायचे. देशासाठी आपण त्याग नाही करायचा तर कोण करणार? मात्र, जमिनीसाठी संयुक्त कुटुंबपद्धती विभक्त करून वेगळ्या चूल मांडणे म्हणजे माझ्या आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांशी ती प्रतारणा होईल. त्यामुळे जमिनी गेल्या तरी बेहत्तर, पण आम्ही भावंडे एकत्रच राहू." दत्ता घराण्यातील या कर्तबगार पुरुषाचा नीतिमत्तेचा वारसा व्यवसायातदेखील तेवढ्याच बाणेदारपणे चालवत आज काही कोटींची उलाढाल शौरिन्द्रनाथ दत्ता करत आहे. 'मीडिया वन सोल्युशन्स' हे त्यांच्या कंपनीचे नाव. रेडिओ या माध्यमांमध्ये कार्यरत असणारी ती एकमेव कंपनी आहे.
शौमेन्द्रनाथ आणि लक्ष्मी या दत्ता दाम्पत्याच्या पोटी शौरिन्द्रनाथचा जन्म झाला. शौमेन्द्रनाथ कृषी विभागातले एक उच्चपदस्थ अधिकारी. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळविले. राहायला सरकारी घर, गाडी, नोकरचाकर मात्र तरीही या साऱ्या गोष्टींचा त्यांनी कधीच बडेजाव मिरवला नाही. लक्ष्मी दत्ता या तितक्याशा शिकल्या नव्हत्या. परंतु, त्यांना दूरदृष्टी होती. काहीशी कर्मठ कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या वातावरणात त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना पदवीधर बनविले. शौरिन्द्रनाथ सातवीपर्यंत बंगाली माध्यमात शिकला. आठवीपासून पुढचे शिक्षण मात्र'मिशनरी स्कूल'मध्ये झाले. मात्र, त्यासाठी त्याला वसतिगृहात राहावे लागले. मात्र, यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला. स्वावलंबन, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची वृत्ती, परिस्थितीला शरण न जाणे हे गुण त्याच्यात आपसूक आले. आईच्या म्हणण्यानुसार, शौरिन्द्रने व्यवस्थापन विषयामध्ये पदवी प्राप्त केली. पुढे पदव्युत्तर पदविका मिळवण्याचे निश्चित केले. त्यासाठी शौरिन्द्र दिल्लीला गेला. पहिल्यांदाच तो आसामच्या बाहेर गेला होता. अभ्यासाचा भाग म्हणून २००१ साली तो मुंबईत आला. एका ट्रक कंपनीमध्ये त्याने काही प्रकल्प केले. नंतर त्याच कंपनीमध्ये त्याला शिकाऊ उमेदवारी मिळाली. पाच आकडी पगाराची त्याला ऑफर होती, पण ती त्याने नाकारली.
इंटर्नशीप संपल्यानंतर तो मुंबईतच चुलत आजीकडे राहिला. खरंतर शौरिन्द्रला जाहिरात आणि इव्हेन्ट्सची आवड होती. यात आपण चांगले करिअर करू शकतो, असे त्याने काकाला सांगितले. काकाने त्यांच्या मित्राच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यास पाठवले. हुशार आणि चुणचुणीत असलेल्या शौरिन्द्रला लगेच त्यांनी निवडले. सुरुवातीला शिकाऊ उमेदवार म्हणून घेतले. मानधन होते सहा हजार रुपये. याच ठिकाणी शौरिन्द्र चित्रपटांच्या वितरणाविषयीदेखील शिकला. कंपनीने त्यास नोकरीस ठेवले. मुंबईत राहण्यासाठी फ्लॅट, गाडी असे सर्व काही होते. २००८ मध्ये जागतिक मंदी आली. १२०० कर्मचारी असलेल्या कंपनीला घरघर लागली. दरम्यान, शौरिन्द्रचा विवाह पंजाबी कुडी अंजू सोबत झाला. शौरिन्द्रच्या प्रत्येक वाटचालीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. २००९ साली शौरिन्द्रने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 'मीडिया वन सोल्युशन्स' असे कंपनीचे नाव ठेवले. एका सहकाऱ्यानिशी सुरू झालेल्या या कंपनीत आज २५ कर्मचारी कार्यरत आहेत. काही कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल आहे. हिंदी, मराठी, दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातील विपणन, वितरण यामध्ये ही आघाडीची म्हणून ओळखली जाते. रेडिओ या माध्यमप्रकारात विपणन करणारी ही बहुधा एकमेव कंपनी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसंबंधी रेडिओवर ज्या जाहिराती आपण ऐकल्या असतील, त्या 'मीडिया वन सोल्युशन्स'च्या माध्यमातून झालेल्या आहेत. 'इट्समज्जा डॉट कॉम' ही त्यांचे संकेतस्थळ मनोरंजनक्षेत्रातील एक माहितीपूर्ण संकेतस्थळ म्हणून समजले जाते. मराठी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आदी भाषांमध्ये हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. मनोरंजनासोबतच साहित्य, खाद्यपदार्थ, संस्कृती, पर्यटन, कला, क्रीडा, पेहराव यांनादेखील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. सरकारी नोकरी मिळणे सहजशक्य असतानासुद्धा शौरिन्द्रनाथ मात्र खडतर मार्गाने गेले. आपल्या पाठीवर कोणाचा तरी हात असेल, तेव्हाच यश मिळते ही धारणा चुकीची आहे. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, आत्मविश्वास, सातत्य आणि ध्येयस्पष्टता असेल तर कोणतेही कितीही कठीण असलेले ध्येयसुद्धा पूर्ण करता येते. मराठी तरुणांनी या गुणांचा अवलंब केल्यास ते नक्कीच यशस्वी होतील, असे शौरिन्द्रनाथ दत्ता यांचे मत आहे. किंबहुना, याच गुणाच्या जोरावर ते मनोरंजन क्षेत्रातले वतनदार झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.