गरज ही शोधाची जननी म्हटली जाते. मग गरज कोणतीही असो. ती पूर्ण करण्यासाठी अनेकदा डोकॅलिटी वापरली जाते आणि अशा कामाचे कौतुक तर होतेच. आशिष राऊत या नगरी तरुणाने आपल्या कल्पकतेतून ‘फोल्डिंग टॉयलेट’ ही अनोखी संकल्पना मांडली, त्याच्याविषयी...
आशिषने तयार केलेले ‘फोल्डिंग टॉयलेट’ हे भारतातीलच नव्हे, तर जगातील पहिले ’फोल्डिंग टॉयलेट’आहे. त्यामुळे त्याच्या या प्रयोगाची दखल घेत भारत सरकारनेदेखील आशिषचे कौतुक केले. भारत सरकारच्या ’विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग’ व ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या फेब्रुवारीत दिल्लीत आयोजित सातव्या राष्ट्रीय पातळीवरील ‘इन्स्पायर अवॉर्ड मानक’ प्रदर्शनात आशिषने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत बाजी मारली. आशिषच्या ‘फोल्डिंग टॉयलेट’ या प्रकल्पास देशभरातून आठ लाख उपकरणांमधून अंतिम सर्वोत्कृष्ट 60 उपकरणांमध्ये निवड होण्याचा बहुमान मिळाला. महाराष्ट्रातून प्रथम तर राष्ट्रीय पातळीवर विशेष मानांकन देऊन आशिषला गौरविण्यात आले. राज्यातील एकूण ६० उपकरणांची निवड यात करण्यात आली होती. त्यातील अंतिम सर्वोत्कृष्ट ६५ मध्ये आपले स्थान निश्चित करत आशिषने महाराष्ट्रातून प्रथम पारितोषिक मिळवले.
‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’,गांधीनगर येथे मार्च महिन्यात आयोजित केलेल्या ’फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन’ प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आशिषच्या या प्रयोगाचे कौतुक केले. त्याच्या या जिद्दीची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते आशिषचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण जगाचे लक्ष्य वेधणार्या या उपकरणाचे जगभरातील सर्वच शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी कौतुक केले. जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठीदेखील त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. जपानमध्ये आशिषला एकट्याला शेवटच्या दिवशी भारताचे प्रातिनिधिक भाषण करण्याची संधी मिळाली. त्याच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत आणि या प्रयोगशीलतेला हातभार म्हणून भारत सरकारकडून त्याच्या या उपकरणाला ’पेटंट’ देण्यात आले आहे. आशिषने भारतातील सर्वोच्च मानल्या जाणार्या आयआयटी बॉम्बे, तसेच बंगळुरुतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे घेण्यात आलेल्या ‘इनोव्हेशन वर्कशॉप’मध्येसुद्धा निवड होण्याचा बहुमान मिळवला.
आशिष एक वैज्ञानिक असून तो एक रंगकर्मीसुद्धा आहे. त्याला एकांकिका लेखनाचे अनेक पुरस्कार मिळाले असून सध्या तो अहमदनगरमधील ‘निर्मिती रंगमंच’ या संस्थेमार्फत नाटकेसादर करतो. आशिषला महाराष्ट्र शासनाचा ‘मराठी विज्ञान परिषदे’चा ‘सर्वोत्कृष्ट लेखका’चा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. आशिषला लेखन तसेच विशेषतः दिग्दर्शनाची जास्त आवड आहे. आशिषने आत्तापर्यंत अनेक एकांकिका व नाटकांमध्ये कामे केली आहेत. त्याला मराठी साहित्य तसेच विशेषतः इतर देशांमधील इंग्रजी पुस्तके वाचण्याची आवड आहे. ‘नॅशनल इन्स्पायर अवॉर्ड’ जिंकणार्या आशिषचे कर्तृत्व नक्कीच आजच्या तरुणाईला प्रेरणा देणारे आहे. इतक्या लहान वयात अहमदनगरसारख्या छोट्या शहरात राहून आपल्या इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर आशिषने हे यश प्राप्त केले. भारत सरकारनेही त्याच्या प्रयोगशीलतेवर कौतुकाची थाप देत प्रोत्साहन दिले. काही दिवसांतच महाराष्ट्र सरकारकडून आशिषचा हा प्रकल्प राज्यातील काही छोट्या खेड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाईल. त्यानंतर या उपकरणाला मिळणारा प्रतिसाद व त्याची उपयोगिता लक्षात घेऊन संपूर्ण देशात याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आशिषने सांगितले.
- गायत्री श्रीगोंदेकर