मुंबईच्या वायुप्रदूषणात अतिसूक्ष्म कणांची पातळी धोकादायक अवस्थेत पोहोचली असून त्यामुळे वायुप्रदूषणात वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ही समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) 'पीएम २.५' चे आंतरराष्ट्रीय सुरक्षित अनुज्ञेय प्रमाण १० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ठरविले आहे. पण, मुंबईच्या हवेतील प्रदूषकांची 'पीएम २.५ मिमी' कणांची वार्षिक सरासरी पातळी ५१.८ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत पोहोचली आहे. देशातील प्रदूषित हवेची तुलना करण्याकरिता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) सुरक्षित अनुज्ञेय प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ठेवले आहे. त्या हिशोबानेसुद्धा मुंबईची अशुद्ध हवा सुरक्षित मर्यादेच्या बाहेरच आहे. नागरी हवेच्या बदलत्या प्रदूषकांच्या व उत्सर्जनाच्या व्याप्तींचे निरीक्षण करणारे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरथ गुट्टीकुंडा यांना मुंबईच्या हवेतील 'पीएम २.५' चे प्रदूषण २७ ते ७६.६ एकक म्हणजे सरासरी ५१.८ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आढळते असे जाहीर केले. सीपीसीबी अधिकारी व्ही. शुक्ला म्हणतात, “देशातील प्रदूषकांच्या व्याप्तीची तुलना ठरविलेल्या राष्ट्रीय प्रमाणांशी करायला हवी. कारण, प्रत्येक देशात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी ही सुरक्षित अनुज्ञेय प्रमाणे वेगवेगळी ठरविलेली असतात.” 'पीएम २.५' म्हणजे हवेतील २.५ मिमी व्यासापेक्षा लहान सूक्ष्मकणांची प्रदूषके. ही हवेत अनेकदिवस वा आठवड्यांपर्यंत राहतात. ती इतकी छोट्या व्यासाची असतात की, मानवी शरीरातील अरूंद हवावाहिनीतून श्वासावाटे प्रवास करून शरीरातील फुप्फुसापर्यंत पोहोचतात व मोठ्या रोगांना आमंत्रण देतात. महाराष्ट्र राज्य सरकारने हवेच्या दर्जाचे निरीक्षण करण्याकरिता २३ ठिकाणी यांत्रिक दर्जाची निरीक्षण-यंत्रे बसविली आहेत. त्यातील मुंबईत ११ ठिकाणांची २४ तास चालू ठेवलेली असतात. नवी मुंबईत १, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर व पुणे प्रत्येकी एक केंद्र. परंतु, मुंबई महानगराचे क्षेत्र एवढे मोठे आहे की, प्रदूषकांच्या व्याप्तीचे मापन करण्यासाठी ६८ केंद्रांची गरज आहे. मुंबईच्या शीव व वांद्रे भागात सर्वात जास्त प्रदूषण आढळते. या चालू असलेल्या निरीक्षण-केंद्रातील मापनात आढळले की, गेल्या चार वर्षांतील 'पीएम २.५'च्या प्रदूषकांची व्याप्ती खूप जास्ती पातळीवर आहे. 'पीएम २.५'ची पातळी २०१५ मध्ये ५५.९ एकक होती. २०१६ मध्ये ४९.१ एकक पातळी झाली व २०१८ मध्ये वाढून ५१.८ झाली. 'पीएम २.५' ची ही वाढ होण्यास लोकसंख्या वाढ, घनकचऱ्याची व्याप्ती, नागरिकांच्या ऊर्जावापरामुळे, वाहने वापरात वाढ आणि स्थापत्त्य बांधकामाची व्याप्ती आदी गोष्टी जबाबदार आहेत. तुलना करण्याकरिता सध्याची आरएसपीएम पातळी-निर्देशांक मुंबई (शीव) १४७ व कल्याण (डोंबिवली) (१२४) अशी आहे.
शहरामध्ये कोणत्या गोष्टींमुळे पीएम प्रदूषण वाढते ते खालील तक्त्यात टक्क्यांनी दर्शविले आहे. (एमपीसीबीच्या माहितीप्रमाणे)
कारणे पीएम २.५ पीएम १०
औद्योगिक कामे ३६ २३
जैवइंधन (काळे कर्ब उत्सर्जन) २७ १४
परिवहन १६ ७
वायुवहनातून धूळ २१ ५६
सरकारकडून या प्रदूषकांवर काहीच नियंत्रण ठेवले नाही, तर २०३० मध्ये हे 'पीएम २.५'ची प्रदूषण पातळी प्रमाण २३ टक्क्यांनी वाढेल, असे गुट्टीकुंडा यांचे म्हणणे आहे. सीपीसीबीचे अधिकारी व्ही. शुक्ला यांचे म्हणणे आहे की, प्रदूषण नियंत्रणाचे नियोजन आमच्याकडून सुरू आहे. याबाबतीतला पहिला नियंत्रण अहवाल सप्टेंबर २०१९ मध्ये तयार होईल व त्यानंतर तो दर चार महिन्यांनी नियंत्रण अहवाल बनेल. आम्ही या नियंत्रणातून २५ टक्के प्रदूषण कमी करण्याचा उद्देश ठेवला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा पण यात सहभाग असणार आहे. ठाणे, कल्याण व नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रांमध्ये अतिप्रदूषित कारखान्यांची भर पडली आहे. प्रदूषणाचे नियंत्रण करण्याकरिता एमपीसीबीने मुंबईतील कारखान्यांना, परिवहन कामांकरिता, ऊर्जानिर्मिती केंद्रांवर व इतर ठिकाणी काही आचार-संहिता ठरविली आहे ती अशी -
२०२० पासून भारत उत्सर्जन नियमन तख प्रमाणे कडकपणे पाळणे जरुरी आहे. साईटवर बांधकाम व तोडण्याची क्रिया मोठ्या विश्वासार्ह कंत्राटदारांकडून करून घ्यावे म्हणजे कचऱ्यावर नियंत्रण राहील. साईटवर १४ फूट उंचीपर्यंत हद्दीवर तांब्याचे पत्रे उभारावेत म्हणजे धुळीवर नियंत्रण राहील. अनेक ठिकाणी हरितपट्टे उभारावेत. सिमेंट बॅचिंग प्लॅण्टसारखी प्रदूषण निर्माण करणारी यंत्रे बंद करावीत अन्यथा आम्हाला बंद करण्याचे हुकूम काढावे लागतील. ऊर्जानिर्मिती केंद्रांवर सल्फरडायॉक्साईड काढून टाकण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रे बसवावीत. अतिरिक्त उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याकरिता सतत कार्यशील राहावे व त्याबद्दल आम्हाला ऑनलाईन कळवत राहावे. स्वयंपाकाकरिता सरपण जाळू नये. इतर ठिकाणी कचऱ्याचे वा कशाचेही ज्वलन करून धूर करू नये. घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे व कुठेही घनकचरा नेता-आणताना हवेत उडू देऊ नये. घराघरातील प्रदूषण कमी करण्याकरिता व्हीओसी रंगकाम कमी वापरावे व खिडक्यामधून शुद्ध हवा खेळती ठेवावी.
वायुप्रदूषणाविषयी उपयुक्त माहिती
वायुप्रदूषणामुळे उष्ण कटिबंध प्रदेशात जास्त वादळे निर्माण होतात. मानवाच्या विकासकामांमुळे हवामानात बदल घडतात. त्यातून समुद्रात व इतर ठिकाणी उबदार तापमान वाढते व विनाशकारी वादळांचे प्रमाण वाढते. आयआयटी मुंबईला यावरील संशोधनातून स्थानिक वायुप्रदूषण व पाऊस पडण्याची तीव्रता यांचा संबंध आहे असे आढळले. सूक्ष्मकण व धूळ यातून बनलेल्या विविध प्रकारच्या घन वा द्रव एरोझोलमुळे ढगांवरती प्रक्रिया होऊन पावसाचे प्रमाण कमी वा जास्त होते. हवेत अमोनिया वायूचे प्रमाण मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर एकक (५० ते १५० एकक) प्रमाणात राहते, १५० ते ५०० एकक असे जास्त झाल्यामुळे फुप्फुसामध्ये पीडा उत्पन्न होते. ५०० ते ५ हजार एकक अतिजास्त प्रमाणामुळे प्राण गमावण्याची शक्यता असते. मोसमी पावसाळी हवेमुळे अमोनियाचे प्रमाण वाढण्याची क्रिया होऊ शकते. नायट्रोजन प्रदूषण-तेलशुद्धीकरण व खतांच्या कारखान्यामुळे नायट्रोजन प्रदूषणाचा वाढता धोका असतो. महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांवर नायट्रोजन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक दर्शविले जाते. शीव व वांद्रे येथे पातळी-निर्देशांक अनुक्रमे ८३ व ६६ एकक दाखवितो. मुंबई-पुण्यात दमाग्रस्त बालकांमध्ये वाढ नायट्रोजनच्या प्रदूषणामुळे असावी, अशी माहिती 'लॅन्सेट'च्या अहवालात आली आहे. कार्यालयामधील सभागृहात वा कुठेही एकत्र येण्यामुळे आंतर वायुप्रदूषणामध्ये वाढ होऊन हवेतील कार्बनडायॉक्साईड वाढते व कधीकधी ते हवेचा प्रतिदशलक्ष १२०० भाग होऊ शकते. यातून कर्करोग व दमा उद्भवू शकतो.
हवेतील सूक्ष्मकणांचे प्रमाण रोखल्यास आयुर्मानात वाढ होऊ शकते. सूक्ष्मकणांची पीडा शरीराला एचआयव्ही, एड्स, धुम्रपान, दहशतवाद यापेक्षाही जास्त होत आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी हवा दर्जा निर्देशांक विकसित केला आहे. हवेतील सूक्ष्मकणांच्या प्रदूषणामुळे व्यक्तीचे आयुर्मान १.८ वर्षांनी कमी झाले आहे. या निर्देशांकानुसारभारत व चीनमध्ये जगातील ३६ टक्के लोकसंख्या असून तेथील आयुर्मान कमी झाले आहे. वायुप्रदू्षणामुळे शरीरातील रक्तदाबाचे प्रमाण वाढते. प्रदूषणातील एरोझोलमुळे सूर्याकडून मिळणाऱ्या 'ड' जीवनसत्त्वाचा लोप होतो, असे दिल्लीमधल्या राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेच्या (NPL) संशोधनातून शोधले आहे. हवेतील एरोझोल हे घन व द्रव स्वरूपात असते. घनकचरा डम्पिंग क्षेत्रामध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण केल्यास हवेतील प्रदूषणात घट होऊ शकते, असा शोध आयआयटी मुंबईनी लावला आहे. वर्दळीच्या ठिकाणचे प्रदूषण कमी करण्याकरिता हवा शुद्धीकरण यंत्रे बसविली व त्या यंत्राने वायुप्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे साधले आहे. त्यामुळे अशी यंत्रे आता बऱ्याच ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. वायुप्रदूषणाचा सामना करण्यासाठी चीनने लेझरवर चालणारे 'सेंसेज' हे नवे यंत्र बाजारात आणले आहे. बंदिस्त जागेतील प्रदूषण किती आहे तसेच, हवेची प्रतवारी मोजण्याबाबत हे यंत्र काम करते. अचूक निरीक्षण, हवेतील कार्बनचे प्रमाण, हवेतील तापमान व आर्द्रता दाखवितो. 'जादूची चटई' हवेतील प्रदूषण खेचून घेते व कमी करते. न्यूयॉर्कमधील एका संस्थेने एक विशिष्ट प्रकारच्या प्रोटिन चटईचा उपयोग प्रदूषण कमी करण्यासाठी केला. या 'तांत्रिक चटई'मुळे रासायनिक प्रदूषण खेचले जाते. हापूस आंब्याच्या राईमुळे हवेतील कार्बनडायॉक्साईडचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्रात, गोव्यात व कर्नाटकात अनेक आमराई आहेत व त्या १ लाख, ६ हजार, २१० हेक्टर क्षेत्रात विखुरल्या आहेत. त्यामुळे वार्षिक ९,९१३ दशलक्ष टनांच्या व्याप्ती असलेला अशुद्ध कार्बनडायॉक्साईड वायू कमी होतो, असा निष्कर्ष बंगळुरूच्या 'आयआयएचआर'० संस्थेने काढला आहे. कोठेही हरित स्वरूप वाढविणाऱ्या बागेमुळे वायुप्रदूषणात घट होऊ शकते. त्याकरिता एकाने काही झाडांची यादी दिली आहे. त्या झाडांची वाढ करावी -
सिल्व्हर किंग, पिस लिली, शेक प्लांट, लिपस्टिक प्लांट, अरेका पाम, स्पायडर प्लांट, मनी प्लांट. एकूणच, वायुप्रदूषण रोखण्यासाठी यापुढील काळात कठोर उपाययोजना केल्याशिवाय गत्यंतर नाही.