वंदना : पर्वतांची 'स्नो'राणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2019   
Total Views |



आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या स्कीईंग या अनोख्या खेळामध्ये सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे उत्तराखंडच्या छोट्याशा खेड्यातून आलेली वंदना पंवार...


हिमालयासारखी विराट आणि अफाट पर्वतरांग आपल्या देशाला लाभली आहे. हिमालयात अनेक ठिकाणी पर्यटनस्थळे विकसित झाली असून केवळ भारतीयच नव्हे, तर देशोदेशीचे पर्यटक तेथे येऊन बर्फावरील 'स्कीइंग' व अन्य खेळांचा आनंद घेत असतात. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये या खेळालाही एक विशेष स्थान आहे. क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांमुळे अशा जिगरबाज खेळांकडे काही अंशी दुर्लक्ष होते, ही नेहमीचीच ओरड. तसेच, अशा जिगरबाज खेळामध्ये पुरुषी मक्तेदारी हा समज. त्यामुळे या खेळाचे वेड फक्त एका विशिष्ट गटाला होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये 'स्कीइंग' हा फक्त पुरुषांचाच खेळ असा समज मोडून काढत एका छोट्याशा खेड्यातून एक नाव पुढे आले. ते म्हणजे वंदना पंवार. बर्फाच्छादित पर्वतरांगांवर 'स्कीइंग' हा खेळला जाणारा खेळ ज्यामध्ये 'स्कीज'चा वापर केला जातो. ओबडधोबड मार्गावर 'स्कीज'च्या साहाय्याने खेळला जाणारा धाडसी खेळ म्हणजे खूप मोठे हिंमतीचे काम. यामध्ये वंदना यांची कामगिरी पाहून डोंगर भागात राहणाऱ्या मुलींसाठी त्यांनी एक नवी उमेद निर्माण केली आहे. आज जाणून घेऊया तिच्या विक्रमांबद्दल...

 

पर्वतावरची 'स्नो' राणी अशी ओळख असणाऱ्या वंदना पंवार हिचा जन्म देहरादूनमध्ये झाला. उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील सिरास गावातून आलेली ही मुलगी एक दिवस 'स्कीइंग' या खेळामध्ये भारताचा झेंडा उंच फडकवेल असा कोणाच्या मनात विचारही आला नसेल. उत्तराखंडमधील जोशीमठचे रंजितसिंग पंवार यांची ती मुलगी. लहानपणापासूनच तिच्यामधील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक दिसत होती. तिला लहानपणापासूनच 'स्कीइंग' या खेळाबद्दल जिज्ञासा होती. या खेळामध्ये तिला मिळालेल्या यशाचे श्रेय ती तिच्या वडिलांना तसेच तिचा भाऊ विवेकला देते. या खेळामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी तिच्या भावाने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. आवड म्हणून लाकडाच्या दांड्यांपासून 'स्कीइंग'चा सुरू केलेला प्रवास हा अद्यापही सुरु आहे. वंदनाने स्कीइंगच्या अनेक प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला आहे. या खेळाच्या बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास केला. वंदनाने नेहरू पर्वतारोहण संस्थान, उत्तर काशीमधूनही प्रशिक्षण घेतले आहे.

 

१९९८मध्ये अगदी लहान वयातच 'राष्ट्रीय स्कीइंग चॅम्पियनशिप' स्पर्धेत भाग घेत तिने 'ज्युनियर गर्ल्स' प्रकारात पहिले स्थान मिळवले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. २००० मध्ये आयोजित केलेल्या महिला स्पोर्ट्स् चॅम्पियनशिप (ज्युनिअर)मध्येही तिने पहिले स्थान पटकावले होते. २००२ मध्ये वंदनाने 'नॅशनल स्कीइंग चॅम्पियनशिप'मध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याचबरोबर २००३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय हिवाळी खेळात वंदनाने दुसरे स्थान पटकावले होते. तिने २००६मध्ये झालेल्या 'वॉटर स्कीइंग' स्पर्धेत 'ए' ग्रेड मिळवत जगाला दाखवून दिले की, या क्षेत्रातही मुली ठसा उमटवू शकतात. २००८ मध्ये झालेल्या 'वॉटर स्कीइंग'मध्येही तिने 'ए' ग्रेड मिळवला. २००७ मध्ये वंदनाने 'राष्ट्रीय स्कीइंग चॅम्पियनशिप'मध्ये तिसरे स्थान मिळविले. त्याच वेळी, तिला पाचव्या राष्ट्रीय हिवाळी खेळ गुलमर्ग (काश्मीर) मध्ये प्रथम स्थान मिळाले होते. तिचा प्रवास हा तिच्या उच्च ध्येयांसोबत असाच पुढे चालत राहिला. वर्ष २०१० मध्ये मनाली येथे आयोजित 'राष्ट्रीय स्कीइंग चॅम्पियनशिप'मध्ये पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले. २०११ मध्ये औली येथे आयोजित 'औली स्कीइंग चॅम्पियनशिप'मध्ये दुसरे स्थान पटकावले. तसेच, २०११ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई हिवाळी खेळात तिने तिसरे स्थान मिळवले. तिच्या या कामगिरीने कुठेही खचून न जाता खेळामधील सातत्य आणि अपार मेहनत यामुळे या क्षेत्रामध्ये तिला प्रचिती मिळाली. याव्यतिरिक्त तिने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या स्कीइंग स्पर्धेमध्ये पदके जिंकली आहेत. यामध्ये तिने फक्त उत्तराखंडचेच नाही तर भारताचेही नाव उंचावले आहे.

 

तिच्या या कामगिरींमुळे पर्वतरांगांवर राहणाऱ्या मुलींना एक नवी ओळख निर्माण करून दिली. स्कीइंग या खेळामध्ये सुरुवातीला पुरुषांची मक्तेदारी होती. मात्र, कालांतराने वंदनाच्या साहसी आणि धाडसी खेळाने पुरुषांच्या या खेळातील प्रभुत्वाला आव्हान देत या खेळामध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणींच्या पंखात नवे बळ दिले. तिच्या मते स्कीइंग या खेळासारखा रोमांचकारक साहसी खेळ दुसरा कुठलाही नाही. परंतु, पुरेसे संसाधन नसल्यामुळे भारतामध्ये या खेळाकडे थोडेफार दुर्लक्ष होताना दिसते आहे. नवीन पिढीला याकडे वळविण्यासाठी देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी या खेळाची प्रशिक्षण शिबिरे झाली पाहिजेत. ज्यामुळे या खेळातही भारताचे नावलौकिक करण्यासाठी तरुण पिढी आकर्षित होईल. वंदनाने विषम परिस्थितीमध्ये आणि संसाधनाचा अभाव असतानादेखील या खेळातील प्रेमापोटी मेहनत आणि जिद्दीने या क्षेत्रामध्ये अनेकांची 'रोल मॉडेल' बनली आहे. अशा या 'स्नो' राणीला पुढच्या कामगिरीसाठी अनेक शुभेच्छा...!

@@AUTHORINFO_V1@@