नवी दिल्ली : भारतीय माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांच्यातील वादविवाद हा नवा नाही. मात्र, मैदानाबाहेरही हे एकमेकांना भिडत असतात. शाहिद आफ्रिदीने काश्मीर विषयावर केलेल्या ट्विटला यावेळेस गंभीरने चांगलेच उत्तर दिले आहे. 'काही जणांचे वय आणि बुद्धी कधीच वाढत नाही,' असे गंभीरने आफ्रिदीला फटकारले आहे.
काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला भेट देणार असल्याचे ट्विट केले होते. त्यावर गंभीरला विचारले असता त्याने सांगितले की," मला त्याच्याबद्दल अधिक सांगायची गरज नाही. काही लोक कधीही मोठे होत नाहीत, ते क्रिकेट खेळतात पण त्यांचे वय कधीच वाढत नाही, त्यांची बुद्धीदेखील वाढत नाही. त्याला प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे असेल तर त्याने राजकारणात उतरावे," अशा खोचक शब्दात आफ्रिदीवर टीका केली.
भारतामध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानची स्थिती सध्या बिथरली आहे. या ना त्या कारणाने प्रत्येक ठिकाणी अपप्रचारही करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व गोष्टींमध्ये काही पाकिस्तानी खेळाडूंनीदेखील उड्या मारायला सुरुवात केली. आफ्रिदीने आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर गंभीरने त्याला सणसणीत टोला मारला आहे.