आपला विशाल देश आणि अनेक प्रादेशिक संस्कृती यामुळे चित्र, शिल्प, मूर्ती अशा प्रत्येक कलेत आपल्याला प्रतीके आणि चिह्ने यांचे वैविध्य पाहायला मिळते. भारतीय रांगोळी कलेचे वैविध्य जसे शैलीमध्ये आहे, तसेच ते वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये आणि अर्थातच त्यातील प्रतीके आणि चिह्नांमध्येसुद्धा आहे. रांगोळी रेखाटनात प्रदेशागणिक वापरल्या जाणाऱ्या प्रतीके-चिह्नांचा अभ्यास खूपच वैविध्यपूर्ण आणि रंजक आहे. अशा प्रत्येक शैलीतून आणि वापरल्या जाणाऱ्या साहित्यातून मिळणारे नि:शब्द अर्थसंकेत, आपल्या पूर्वजांच्या प्रगत अभ्यासाचा दाखला सतत देत असतात.
दगडापासून बनवलेली खरखरीत थोडीशी जाडसर रांगोळी पूड हे सामान्यतः रांगोळीसाठी महाराष्ट्रात वापरले जाणारे माध्यम आहे. मात्र, याबरोबरच प्रदेशागणिक रांगोळीची अन्य माध्यमे प्रचलित आहेत. पाण्यात भिजवलेल्या तांदळाचे वाटून बारीक केलेले पांढरे पीठ अथवा पेस्ट पाण्याने पातळ करून जमीन आणि भिंतीवर रांगोळी काढण्यासाठी वापरली जाते. त्यात काही नैसर्गिक रंग मिसळले की वेगवेगळे रंग बनवता येतात. विशेषतः तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये या माध्यमाचा वापर जास्त होतो. गव्हाची टरफले आणि तूस बारीक वाटून गडद रंगाची पूड तयार होते. अशी पूड पाण्यात कालवून राजस्थान आणि महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या गेरूच्या ऐवजी जमीन सारवण्यासाठी वापरले जाते.
कृषिप्रधान पंजाब, डोग्रा आणि डूगार अशा डोंगराळ हिमालयीन प्रदेशातील घराघरात आजही गाईच्या शेणाने सारवलेल्या अंगणात अथवा घराच्या आतील जमिनीवर रांगोळी रेखाटली जाते. मात्र, याची रेखाटन पद्धत थोडी वेगळे असते. हा शेण सारवटा ‘लिपना’ (लिंपण) या नावाने त्या प्रदेशात प्रचलित आहे. यावर काढल्या जाणाऱ्या रांगोळीला ‘लिखनु’ (लिहिणे) अथवा ‘ऐपान’ असे संबोधित केले जाते. गडद रंगाची माती या शेणाने सारवलेल्या जमिनीवर वेगळा रंग म्हणून वापरली जाते. अंगण आणि जमीन शेणाने सारवल्यावर ती पूर्ण सुकण्याआधी एक गोलसर दगड त्यावर फिरवला जातो. यावेळी हाताबरोबरच संपूर्ण शरीराची एका तालातली लय वापरली जाते. दगड फिरवताना यातून अर्धवर्तुळाची एक नक्षी तयार होते. दगडाच्या आकारावर या अर्धवर्तुळाचा आकार अवलंबून असतो. घरात आनंदी वातावरण असेल, त्यावेळी अर्धवर्तुळाचे उघडे तोंड घराच्या दरवाजाच्या दिशेने असते. कुटुंबातील सदस्याचा मृत्यू अथवा अशा गंभीर प्रसंगात, अर्धवर्तुळाचे उघडे तोंड घराच्या आतल्या दिशेने असते. घरात आलेल्या पाहुण्याला अशा सारवलेल्या जमिनीच्या नक्षीवरून कुटुंबाची मानसिकता पटकन लक्षात येते. अशी प्रतीके आणि नि:शब्द तरीही निश्चित कौटुंबिक परिस्थितीचा सामाजिक संकेत देणारी चिह्ने ही आजही वापरल्या जाणाऱ्या प्राचीन भारतीय चिह्नसंस्कृतीचे कलावैभव आहे.
या हिमालयीन प्रदेशात ‘गोलू’ अथवा ‘माकोल’ या नावाची पांढरी माती निसर्गतः उपलब्ध होते. या पांढऱ्या रंगाचा उपयोग मात्र फार वेगळ्या पद्धतीने केला जातो. या पांढऱ्या मातीची ढेकळे पाण्यात भिजवून त्याचा घट्टसा रंग एका मडक्यात ओतला जातो. या मडक्याच्या तळाला एक छोटेसे छिद्र केलेले असते. जमिनीवर गुडघ्यावर बसून घरातल्या महिला हे भांडे दोन्ही हातात घेऊन गोलाकार फिरवतात. (चित्र क्र. 1) अशी गोलाकार नक्षी कमळाच्या पाकळ्यांच्या आकारात रेखाटली जाते. अर्धवर्तुळाकृती रेखाटलेल्या शेण सारवट्यावर रेखाटलेली अशी गडद आणि पांढऱ्या रंगाची रांगोळी आणि त्यातील चिह्न-प्रतीकातून कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा परिचय होतो.
रांगोळीमध्ये परंपरेने अनेक चिह्नांचा वापर होतो. महाराष्ट्रामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या सणानिमित्त काढली जाणारी ‘चैत्रांगण’ नावाने संबोधित रांगोळी अशाच अनेक चिह्नांनी अलंकृत असते. (चित्र क्र. 2) सूर्य-चंद्र-गणपती-तोरण-गुढी-मंगल कलश-स्वस्तिक-ओंकार-देवतांची आयुधे-वस्तू- प्राणी-पक्षी अशी अनेक प्राचीन भारतीय चिह्न आणि प्रतीके या ‘चैत्रांगण’मध्ये रेखाटली जातात. यातल्या प्रत्येक प्रतीकाला निश्चित अर्थ आहे. आधीच्या अनेक लेखांमध्ये यातील अनेक चिह्नांच्या अर्थसंकेतांचा परिचय आपल्याला झालाच आहे. शेणाने किंवा मातीने अंगण आणि घराची जमीन सारवून त्यावर रांगोळी काढायची प्रथा महाराष्ट्रातही प्रचलित आहे. अशी सारवलेली जमीन ओली असताना त्यावर बाभळीच्या बियांची रांगोळी काढली जाते, अशी रांगोळी वर्षभर टिकते.
‘चैत्रांगण’ रांगोळीशी नाते सांगणारी बंगाल, आसाम, ओडिशामध्ये प्रचलित असलेली रांगोळी ‘अल्पना’ या संबोधनाने आपल्याला परिचित आहे. ‘आलेपन- आलिंपन’ अशा मूळ संस्कृत शब्दांपासून ‘अल्पना’ या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. ‘आलेपन’ म्हणजे रेखाटणे. ‘आसन अल्पना-व्रत अल्पना-सणाची अल्पना’ असे या अल्पनेचे तीन प्रकार आहेत. व्रत अल्पना (चित्र क्र. 3) म्हणजे स्त्रियांच्या माघमंडळ व्रत-तारा व्रत-सेन्जुती व्रत-लक्ष्मी व्रत अशा वर्षभरात केल्या जाणाऱ्या व्रत-वैकल्यांच्या वेळी काढली जाणारी रांगोळी. ‘व्रत अल्पना’ नेहमी चौकोनी असतात, अन्य ‘अल्पना’ फक्त गोलाकारात रेखाटल्या जातात. या ‘अल्पनां’मध्ये ‘चैत्रांगण’ रांगोळीत रेखाटली जाणारी अनेक चिह्नं समाविष्ट असतात.
भारतातील पारशी कुटुंब नेहमीच त्यांच्या प्रथा- परंपरा-संस्कृतीची जपणूक करतात. नवरोज-पतेती सारखे सण असोत, लग्न समारंभ असो किंवा कुटुंबातील कोणी परदेशी जायला निघाला असेल अथवा घरी परत येणार असेल, अशा प्रत्येक प्रसंगात, पारशी बांधव आपले घर ‘चाक’ या नावाच्या विविध चिह्नांच्या रांगोळ्यांनी सजवतात. यातली प्रामुख्याने रेखाटली जाणारी रांगोळी म्हणजे ‘फिश’ किंवा ‘मासा.’ (चित्र क्र. 4) साधारण अडीच हजार वर्षांपासून प्राचीन इराणमधील पर्शियन संस्कृतीमध्ये या माशाचे चिह्न राजा सायरस याने ‘राजचिह्न’ म्हणून स्वीकारले होते. पारशी बांधवांचा नेमका स्वाभावधर्म या प्रतीकातून व्यक्त होतो. उल्हासित, आनंदी वृत्ती आणि कुठल्याही अडचणीत तरंगत राहून त्यातून बाहेर पडण्याची क्षमता हे या माशाच्या चिह्नाचे संकेत आहेत. पारशी कुटुंबात मात्र हा मासा विविध माध्यमातूनसुद्धा व्यक्त झालेला दिसतो. पात्रांनी मच्छी हा केळीच्या पानात शिजवलेला मासा - ‘धनशाक’ हा माशाच्या आकारात सजवलेला मांसाहारी पदार्थ - रांगोळीतील शुभ चिह्नदर्शक मासा आणि लग्नाच्या वरातीत वधू समोर मासा घेऊन नाचणारी कोळीण अशा अन्य रूपातून हा पारशी मासा आपल्याला दर्शन देतो.
उदवाडा-संजान-बिलीमोरा-नवसारी अशा दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर वसलेल्या गावांमध्ये अनेक पारशी कुटुंबं कित्येक शतकांपासून स्थायिक झालेली आहेत. वेशभूषा-घर सजावट-दैनंदिन आणि कौटुंबिक धार्मिक विधी-रसना संस्कृती या सर्व जीवनशैलींमध्ये पारशी बांधवांनी आपली पारंपरिक संस्कृती जपली आहे. आजही पहाटेपासून या पारशी कुटुंबातील महिला घराच्या अंगणात रांगोळी म्हणजे चाक रेखाटण्याची परंपरा जपून आहेत. (चित्र क्र. 5) पातळ धातूचे साचे आणि कागद-प्लास्टिकच्या स्टेन्सिल याचा वापर करून पारशी कुटुंबात ‘चाक’ रेखाटले जातात. सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या खरखरीत रांगोळी पावडरच्या ऐवजी नायलॉन चॉकपासून बनवलेली अगदी बारीक पावडर या रांगोळीसाठी वापरली जाते. कुमार-किशोरवयीन आणि तरुण मुलामुलींसाठी नवरोज-पतेती या सणांच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धा प्रत्येक पारशी वसाहतीत नियमितपणे घेतल्या जातात.
भारतीय मूल्य संस्कृतीमध्ये, श्रद्धा आणि भक्ती या दोन भावनांना आणि ‘करूणा’ आणि ‘वात्सल्य’ या दोन मानवी गुणवत्तांना महत्त्वाचे स्थान आहे. ‘देव’ या संकल्पनेवरील निस्सीम श्रद्धा आणि आपल्या आराध्य देवतेप्रति भक्तीभावना ही भारतीय हिंदू संस्कृतीतील प्रत्येक व्यक्ती-कुटुंब-समाजाचे वैशिष्ट्य आहे. ही भक्ती आणि श्रद्धेच्या भावना दृश्य स्वरूपात चिह्नांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून व्यक्त होतात. श्रीगणेशाच्या आगमनाच्या वेळी चित्र क्र. 6 मध्ये दिसणारी पावले घराच्या दिशेने अंगणापासून थेट माजघर आणि देव्हाऱ्यापर्यंत रेखाटली जातात. ही सर्व चिह्ने, आपल्या आराध्यांच्या आणि श्रद्धेय देवतांच्या घरातील वास्तव्याचे संकेत देतात. मग अशी पावले श्रद्धा-भक्ती भावनांनुसार श्रीगणेशाची असतात, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची असतात, चैत्रात गौरीची असतात. लहान मुलांच्या मूल्य परिचयाची आणि मूल्य वृद्धीची साधने म्हणून ही चिह्नसंस्कृती परंपरेने प्रत्येक भारतीय कुटुंबात शतकानुशतके स्वीकारली गेली आहेत.
आजही कृषिप्रधान असणाऱ्या आपल्या देशात पशुधन आणि गाय, बैल, म्हैस, घोडा, नाग अशा प्राण्यांना कुटुंबातील सदस्याचे स्थान दिले गेले आहे. या बरोबरच या सर्व प्राण्यांना देवदेवतांच्या सन्निध असणाऱ्या वाहनांचा सन्मान दिला गेला आहे. हे सर्व प्राणी आजही आपल्या ग्रामीण आणि नागरी जीवनात आपले अत्यावश्यक सजीव साथी आहेत. परंपरेने प्रत्येक भारतीय कुटुंबात देवदेवतांइतकेच महत्त्व गायीला दिले गेले. भारतीय संस्कृतीत गाय करुणा आणि वात्सल्याचे प्रतीक मानली गेली आहे. आज ग्रामीण आणि प्रगत शहरी आणि नागरी जीवनशैलीत, उंबरठ्यापासून माजघर आणि देव्हाऱ्यापर्यंत, ‘गोपद्म’ चिह्न म्हणजे गायीची पावले शुभ चिह्न म्हणून रेखाटली जातात. (चित्र क्र. 7) प्राचीन भारतीय संस्कृतीतील शेती व्यवस्थेतील ही शेतकी परंपरा आहे असे म्हणायला हरकत नाही.
दिवाळीच्या आधीचे वसुबारस, गोकुळाष्टमी, पोळा अशा सणांच्या दिवशी आणि काही कुटुंबात रोज, गोपद्म रांगोळी काढली जाते. (चित्र क्र. 8) प्रदेशागणिक या चिह्नाचे स्वरूप थोडेफार बदलताना दिसते. वेगवेगळ्या माध्यमातून परंपरेने वृद्धिंगत झालेल्या आणि आजही दृष्य स्वरूपात व्यक्त होणाऱ्या आपल्या चिह्नसंस्कृतीचा परिचय, ‘चिह्ननिमित्त निमित्त चिह्न’ या लेखमालेतून मला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून वाचकांसाठी सादर करता आला, हे माझे भाग्य आहे. माझ्या संग्रहातील अनेक पुस्तकांचा आणि निबंधांचा संदर्भ या अभ्यासात आणि लेखात घेतला आहे. यापुढील साठाव्या आणि शेवटच्या लेखात मूळ भारतीय बुद्धिबळाचा 64 खणांचा पट आणि सोंगट्यांच्या प्राचीन चिह्नसंकेतांचा परिचय वाचकांना करून देणार आहे.