कोल्हेकुईला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |


 


'तडीपार अध्यक्ष' ही संज्ञा प्रचलित करणारे आता 'फरार माजी गृहमंत्री' किंवा 'हेराफेरी करणारा अर्थमंत्री' अशी संज्ञा प्रचलित का करीत नाहीत? हा खरा प्रश्न आहे.


'पी. चिदंबरम यांच्याविषयी सहानुभूती बाळगावी, असे काही नाही,' असे सुरुवातीला म्हणत, नंतर 'देशाच्या यंत्रणा कशा पक्षपाती वागतात,' असे हळूहळू म्हणायला सुरू करण्याची एक 'फॅशन' आपल्याकडे आली आहे. दुटप्पी वागण्याचा मक्ता केवळ दुतोंड्या राजकारण्यांचाच नसतो, तर त्यात बड्या वर्तमानपत्राच्या भल्यामोठ्या खुर्च्यांत बसून मोठे झालेले संपादकसुद्धा असतात. या विधानाला प्रत्यक्ष आधार मिळवून देण्याची जबाबदारी सध्या भारतीय माध्यमांतील काहींनी प्रामाणिकपणे घेतली आहे. आता त्यांना त्याचा मोबदलाही देणारे कोणी नाही, तरीसुद्धा यांची खोड जात नाही. यातील काही चतुर तहहयात गांधी परिवाराची तळी उचलून राज्यसभा घेऊन चिडीचूप झाले आहेत, तर काही अजूनही अशाच काही आशांवर तडफडत आहेत. यात काही विकृतांचाही भरणा आहे. त्यांना काहीच मिळू शकत नाही, याची त्यांनाही पुरेपूर कल्पना आहे. परंतु, मोदीद्वेषाचा कंडू त्यांना रात्री-अपरात्री चेतवत असतो आणि मग हे चेवाचेवाने लिहू लागतात. विषय परराष्ट्रातील काही घटनांचा, मात्र आडून मोदी-शाहंना तिरकस बाण मारण्याची संधीही हे लोक सोडत नाहीत. आता मोदी-शाह इतके भक्कम आहेत की, यांच्या तीरकमठ्यांनी मारलेल्या बाणांनी त्यांच्यावर साधा ओरखडाही उठत नाही. 'तडीपार अध्यक्ष' हे अमित शाहंविषयी नाणावलेले विशेषण याच विकृतांनी तयार केले आणि चालविलेदेखील. आजही यांच्या अग्रलेखांमध्ये ते विशेेषण हमखास वापरले जाते. चिदंबरम यांच्या विरोधात अद्याप तरी कुठल्या संपादकाने 'फरार माजी गृहमंत्री' किंवा 'हेराफेरी करणारा अर्थमंत्री' अशी संज्ञा प्रचलित केल्याचे ऐकिवात किंवा वाचण्यात आलेले नाही. असे का घडत नाही, याचे कारण दडलेले आहे.

 

कार्ती चिदंबरम प्रकरणात एक झाकोळलेला पैलू आहे. चिदंबरम यांची ही कंपनी माध्यमांमध्ये पैसा गुंतवित होती. भारतीय माध्यमांचा व्यवसाय अत्यंत जिकिरीचा आहे. किंबहुना, संपूर्ण जगात या धंद्याकडे अत्यंत आतबट्ट्याचा धंदा म्हणून पाहिले जाते. आता चिदंबरम पिता-पुत्र या अशा धंद्यात इतका पैसा का गुंतवू पाहात होते, हे लक्षात येईल. लोकशाही व्यवस्थेत माध्यमांचे महत्त्व मोठे आहे. माध्यमे अभिमत तयार करण्याचे काम करतात. या अभिमताचाच वापर सत्ताधारी पक्ष आपल्या बाजूने लोकांना वळविण्यासाठी करतात. आपल्याकडे माध्यमांना लोकशाहीतला 'चौथा स्तंभ' असे म्हटले जाते. वस्तुत: या विधानाला कुठलाही घटनात्मक आधार नाही. मात्र, नीरा राडिया प्रकरणात माध्यमे आपला दलालीचा धंदा कसा चालवितात, हे आपल्याला पाहायला मिळाले. वस्तुत: चिदंबरम प्रकरणात सर्व गोष्टींची चर्चा होते आहे. मात्र, या महत्त्वाच्या मुद्द्याची चर्चा होताना दिसत नाही. त्याचे कारण कार्ती यांच्या गुंतवणुकीत दडले आहे. युपीए-१ नंतर या देशात माध्यमांनी आपल्यासमोर काय पेश केले आणि त्याचा काय परिणाम झाला, हे अभ्यासावे लागेल. चिदंबरम यांना केवळ 'आरोपी' म्हटले, तर आता यांची ही परिस्थिती आली आहे. ज्या दिवशी चिदंबरम यांना 'गुन्हेगार' ठरविले जाईल, त्या दिवशी यांच्या कोल्हेकुईने देश निनादून जाईल. मोदी आले नसते, तर या देशाला या भंपकगिरीतून कोणी सोडविले असते? असा प्रश्न उपस्थित केल्याशिवाय राहावत नाही. वस्तुत: चिदंबरम यांच्या कारकिर्दीदरम्यान उपस्थित करता येतील, असे अनेक प्रश्न आहेत आणि ते आजही अनुत्तरित आहेत. २०१५ साली इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांना अटक झाली होती. माध्यम समूहासाठी पैसा उभा करण्यासाठीच या जोडप्याची खटपट सुरू होती. इंद्राणी मुखर्जी यांनी 'आयएनएक्स' माध्यम समूहाची 'प्रमोटर' म्हणून जबाबदारी घेतली होती. इंद्राणी मुखर्जीने 'ईडी'ला दिलेल्या अधिकृत जबाबात अनेक गोष्टींचे रहस्योद्घाटन केले आहे. आपला नवरा व आपली किमान तीन वेळा चिदंबरम यांच्याशी झालेली भेट. त्यांच्या मुलाशी संबंधित असलेल्या कंपन्यांना अदा केल्या गेलेल्या कंपन्या. अशा कितीतरी गोष्टी यात आहेत.

 

राकेश मारिया या मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा बळीही यात अतिउत्साह दाखविल्यामुळे गेला होता. मोठ्या उत्साहाने राकेश मारिया यांनी इंद्राणी यांचा जबाब घेण्याची चर्चा रंगली होती. वस्तुत: चौकशीचे काम पोलीस निरीक्षकाचे, मात्र खुद्द आयुक्तच यासाठी पोलीस ठाण्यावर आले होते. ही सगळी लगबग कुणासाठी होती, याचे बिंग तेव्हाच फुटले होते, मात्र आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सगळे बिंदू जोडले जात आहेत आणि चिदंबरम यांच्या उद्योगांचे बिंग फुटत आहे. याबाबतच्या अधिकृत बातम्याही आज चिदंबरम यांचा कळवळा आलेल्या मंडळींनी प्रकाशित केल्या आहेत. आता मुद्दा असा की, त्यावेळी इंद्राणी व पीटर संबंधाच्या व त्यांच्या मुलीच्या हत्येच्या चटकदार बातम्या छापणार्यांना चिदंबरम संकटात आले असताना आज या सगळ्या गोष्टी का आठवत नाहीत? स्वत: काँग्रेसनिष्ठ नसताना अर्थ, गृह अशी मोठी खाती सोनियांचा विश्वास संपादन करून चिदंबरम यांनी काय कौशल्याने मिळविली असतील, त्याला तोड नाही. भारतातल्या कुठल्याही गृहमंत्र्यांविषयी इतकी चर्चा झालेली नाही इतकी चिदंबरम यांच्याबाबत झालेली आहे. अगदी त्यांच्या नक्षलविरोधी कारवाईबाबतही. 'ऑपरेशन ग्रीन हंट' हे देखील असेच गाजले होते. देशातली सर्वच नक्षलग्रस्त राज्यांनी एकहाती एक मोहीम सुरू करायची आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करायचा, असा हा आराखडा होता. वरवर पाहाता हा मुद्दा उत्तम वाटत असला तरी एक गंभीर चर्चा सुरू झाली आणि ही मोहीम थंडावली. ज्या खनिज खाणीच्या जमिनींवर जंगलात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे, त्या 'वेदांता'ला हव्या आहेत, अशीही चर्चा होती आणि चिदंबरम 'वेदांता'चे वकील होते. चिदंबरम कुटुंबीयांचे काय होईल, ते न्यायालय ठरवेल. मात्र, त्यापूर्वीच चाललेले मोदी-शाह यांना लक्ष्य करण्याचे उद्योग एका चोरट्या कोल्हेकुईचे आवाज आहेत.

@@AUTHORINFO_V1@@