स्टेट बँक डेबिट कार्डला निरोप देणार

    20-Aug-2019
Total Views |



मुंबई : देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक अर्थात, स्टेट बँक ऑफ इंडियाने आता आपल्या डेबिट कार्ड सेवेला निरोप देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याऐवजी योनो डिजिटल पेमेंट प्रणालीवर भर देण्याबाबतही बँकेकडून सुतोवाच करण्यात आले आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात आर्थिक व्यवहारांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

 

स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी एका कार्यक्रमात बोलताना या निर्णयाबाबत सुतोवाच केले. रजनीश कुमार म्हणाले की, आज देशात सुमारे ९० कोटी डेबिट कार्ड तर ३ कोटी क्रेडीट कार्ड आहेत. स्टेट बँक लवकरच डेबिट कार्ड सेवा बंद करण्याच्या विचारात आहे. त्याऐवजी योनो डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर वाढवण्यावर आम्ही भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. योनो प्रणालीद्वारे एटीएम मशीनद्वारेच कार्डशिवाय पैसे काढता येतील तसेच दुकानांमध्ये खरेदीही करता येईल.

 

स्टेट बँकेने सध्या सुमारे ६८ हजार योनो कॅशपॉइंट्स स्थापन केले असून ही संख्या येत्या १८ महिन्यांत तब्बल १० लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे रजनीश यांनी स्पष्ट केले. योनो सुविधेद्वारे डेबिट कार्डशिवाय ग्राहकांना पैसे काढता येतात. ही प्रणाली खूपच सोपी असल्याचेही रजनीश यांनी यावेळी सांगितले. स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे देशातील आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’सोबतच आता ‘कार्डलेस’देखील होण्याची चिन्हे आहेत.