मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेने गेली कित्येक दशकं या महानगराच्या विकासात कायम भरच घातली आहे आणि म्हणूनच या लोकल सेवेला आजही ‘मुंबईची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखले जाते. अशा या लोकल सेवेतील प्रस्तावित बदल आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेणारा हा लेख...
मुंबईत उपनगरीय रेल्वेचे जे मोठे जाळे तयार झाले, त्याला एक मोठा इतिहास आहे. या पायाभूत सेवेचा पायाच ब्रिटिशांनी रचला. दि. १६ एप्रिल, १८५३ ला बोरीबंदर (आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे स्थानकापर्यंत ३४ किलोमीटर रेल्वेमार्ग बांधला गेला. आजघडीला सुमारे ७५ लाख मुंबईकर दररोज उपनगरीय रेल्वेचा लाभ घेतात. या सेवेचा वार्षिक प्रवाशांच्या संख्येचा आकडा बघितला, तर तो २२० कोटी आहे, हा जगातील लोकसंख्येचा तिसर्या हिस्साइतका आहे. सध्या पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर व नेरुळ-उरण या मार्गांवर २ हजार, ३४२ हून अधिक गाड्यांच्या उपनगरीय रेल्वेसेवा उपलब्ध झाल्या आहेत व तब्बल १३ लाख रेल्वे कर्मचारी ही सेवा राबत आहेत. हे सध्याचे उपनगरीय रेल्वेचे जाळे ५०० किमी लांब, ११९ स्थानके असणारे आणि २५८ गाड्यांच्या २ हजार, ९५१ फेर्यांमार्फत ७५ लाखांहून अधिक प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात वाहतूक पुरवणारे आहे. या उपनगरीय सेवेमध्ये आणखी सुधारणा होत आहेत. त्यात प्रस्तावित छशिमट-पनवेल उन्नत मार्ग, पनवेल-विरार मार्ग, हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत विस्तारित, उपनगरीय सेवांकरिता आधुनिक सिग्नल यंत्रणा व १०० टक्के विद्युतीकरण, अनेक स्थानकांमध्ये सुधारित कामे, २०० स्थानके विमानतळासारखी उभारणे व अनेक स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आणि विशेष म्हणजे वातानुकूलित गाड्या सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पांच्या ६५ हजार कोटींहून अधिक स्थूल किंमतीच्या विकासाकरिता सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. या सेवेच्या लांब अंतराच्या व उपनगरीय रेल्वेच्या अधिक-उणेविषयी आपण थोडी नजर टाकूया. या रेल्वेसेवेशी संबंधित काही निसर्गनिर्मित, तर काही मानवनिर्मित संकटांची व सुविधा पुरविण्याविषयी माहिती घेऊया.
जुलैच्या महिन्यातच मुंबई-कोल्हापूर ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’मध्ये रात्री १२.३० वाजल्यापासून हजारांहून अधिक प्रवासी बदलापूर स्थानकाजवळील भागात अडकले होते. पाच तासांनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली व एनडीआरएफकडे बोटी व लाईफ जॅकेट असल्याने त्यांच्या मदतीने सर्व प्रवाशांची १४ ते १८ तासांनी सुटका करण्यात आली. सुदैवाने कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. तसेच, रेल्वेमार्ग ओलांडताना जानेवारी ते जून २०१९ या कालावधीमध्ये सहा महिन्यांत उपनगरीय रेल्वे क्षेत्रात ७१३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी कल्याण ते कसारा उपविभागातील मृतांची संख्या १०२ आहे. हे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन, मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून रेल्वेमार्गाशेजारी संरक्षक भिंती व जाळ्या उभारल्या जाणार आहेत. सुमारे १९ हजारांहून अधिक लेव्हल क्रॉसिंग स्वयंचलित करावयाचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. कर्जत ते लोणावळा यादरम्यान दरड कोसळण्याच्या घटनेमुळे मुंबई ते पुणे रेल्वेसेवा १३ दिवस बंद ठेवण्यात आली होती. पुणे-मुंबई दरम्यानच्या पाच एक्सप्रेस गाड्या १७ ऑगस्टपासून पूर्ववत करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीचे काम अजूनही सुरूच आहे. मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेची गती ताशी १६० किमी करण्याचे नियोजन सुरू आहे. हा प्रवास ४० मिनिटांनी कमी करण्याचा विचार आहे. दरडी पडण्याचा त्रास कमी करण्याकरिता ‘मंकी हिल’जवळ पाच किमी लांब बोगद्याचा प्रस्ताव आहे. घाटावर २०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचेही समजते. तसेच दिल्ली-मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ साडेतीन तासांनी कमी होणार आहे. मुंबई-शिर्डी रेल्वे प्रवास आगामी काळात तीन तासात शक्य होणार आहे. त्याशिवाय काही विकासकामे व सुविधा पुरविण्याची माहिती व रेल्वेची विचारधारा अशी- ‘एमयुटीपी-३’ अंतर्गत वातानुकूलित लोकलकरिता तांत्रिक बाब व अन्य यंत्रणेसाठी काढलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. कारण, या सेवांना विलंब होणार असल्याने अखेर ४७ वातानुकूलित लोकल सेवा भाडेतत्त्वावरच घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्ध वातानुकूलित सेवाही मुंबईत सुरू होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या सध्या डब्यांचे दरवाजे माणसांकडून उघडले जात असले तरी लवकरच गार्डच्या डब्यात सेन्सॉर बसवण्याचे ठरल्याने ते स्वयंचलित होतील, अशी व्यवस्था होणार आहे.
छशिमट ते ठाणे भुयारी मार्गाचा प्रवास
हा भुयारी मार्ग कार्यान्वित झाल्यास या मार्गावरील ४० ते ४५ मिनिटांचा प्रवास केवळ २१ मिनिटांमध्ये शक्य होईल. त्यामुळे एकूणच रेल्वेने वेगवान उपनगरीय रेल्वे वाहतुकीचे लक्ष ठेवले आहे. या प्रस्तावानुसार प्रकल्पाचा खर्च १७ हजार, ९६२ कोटी राहू शकेल. या मार्गाची प्रस्तावित लांबी ३३.८ किमी असेल. हा रेल्वेमार्ग मेट्रोसारखा व नऊ डब्यांचा असेल. या मार्गाच्या शक्यतेकरिता दिल्लीच्या ‘मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (DMRC) २०१८ मध्ये अभ्यास केला होता. यातून २ हजार, ७०० प्रवासी प्रवास करूशकतील. या प्रकल्पाकरिता एकूण २४ हजार, ९३४ हेक्टर जमीन लागेल व त्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक जमीन सरकारी मालकीची आहे. या मार्गावर छशिमट व ठाणे व्यतिरिक्त दादर, कुर्ला, घाटकोपर व भांडुप ही स्थानके असतील. घाटकोपरचे स्थानक भुयारी ठेवता येणार नाही. यासंबंधी ‘डीएमआरसी’ने २०० पानांचा अहवाल बनविला आहे. हा प्रस्ताव रेल्वेने नीति आयोगाकडे मंजुरीकरिता पाठवण्याचे ठरविले आहे. रेल्वेने मुंबई, ठाण्यातील अनेक स्थानकांचा पुनर्विकास करण्याचे ठरविले आहे. त्यात आधुनिकीकरण व सुविधांचा समावेश असेल.
मध्य रेल्वे (घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा, कुर्ला, मुंब्रा, आंबिवली, वाशिंद, चुनाभट्टी.) हार्बर रेल्वे (जीटीबी नगर, गोवंडी, मानखुर्द.) पश्चिम रेल्वे (मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा, विरार, चर्नी रोड.) १६६ वर्षांच्या जुन्या भायखळा स्थानकाकरिता साडेतीन कोटी खर्च करून विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पेण स्थानकाला भविष्यात गर्दीचे मोठे स्वरूप येणार असल्याने ते स्थानक सौरऊर्जा व पवनचक्कीद्वारे वीज निर्माण करून हरित बनविण्यात येणार आहे. मोठ्या स्थानकांवर सुरक्षिततेकरिता विमानतळासारखी तपासणी करण्याची व्यवस्था होईल. (मोठ्या स्थानकांवर सुरक्षितेकरिता विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल.) स्थानकांवर वाय-फायची व्यवस्था करण्यात येईल, तसेच प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी पाच मिनिटांमध्ये तिकिटे काढण्याची सुविधा असेल.पाण्याची आपत्ती आल्यास सुरक्षिततेकरिता रेल्वे प्रशासन लाईफ जॅकेट व बोटी घेणार आहे. तसेच ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण करण्याचेही रेल्वेने ठरविले आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली स्थानक हे तीन लाखांहून अधिक गर्दी असणारे स्थानक ठरले आहे. मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी येथील गर्दी लाखाच्या आत असली, तरी सांताक्रुझ व वांद्रे येथे २०१८-१९ मध्ये दीड लाखांहून कमी गर्दी होऊन प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. ज्या ठिकाणी गर्दी वाढत आहे, त्या स्थानकांवर आणि इतर काही ११ स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल स्थानकासारख्या काही स्थानकांवर खाण्याच्या स्टॉल्सची तपासणी होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये २७ किमी लांबीच्या नेरुळ, सीवूड-दारावे, बेलापूर, खारकोपर उपनगरीय विभागाचे उद्घाटन केले. पनवेल ते छशिमट १० हजार, ८७० कोटींच्या ४९ किमी उन्नत रेल्वेमार्गाऐवजी पनवेल ते वडाळा ८ हजार, ७३९ कोटींच्या ३५ किमी उन्नत मार्ग विचारात घेण्याचे ठरविले आहे. कारण, वडाळा ते जीपीओ ‘मेट्रो ११’ चा प्रस्ताव केलेला आहे. लोकलमधील मोटरमनच्या केबीनमध्ये सुरक्षिततेकरिता सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.
मुंबई रेल्वेमध्ये महिला प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. तुलनेकरिता इतर शहरांची संख्या बघा - मुंबई (४१ टक्के), बंगळुरू (३९ टक्के), नवी दिल्ली (३७ टक्के), हैदराबाद (३१ टक्के), सरासरी (३७ टक्के). केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणतात, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होईल व त्याची स्थूल किंमत १ लाख, ८ हजार कोटी आहे. जून २०१९ पर्यंतचा प्रकल्पाकरिता खर्च ३ हजार, २२६ कोटी झाला आहे. हा एवढा खर्चिक प्रकल्प रेल्वेने हातात घेतला आहे. पण देशात अजून बरीच विचारधारा या प्रकल्पाच्या बाजूने नाही म्हणून हा प्रकल्प सावकाश करावा, असे बर्याच तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबई ते गांधीनगर, हावडा ते पुरी, नवी दिल्ली ते लखनौ व चेन्नई ते मदुराई मार्गांवर खाजगी रेल्वे धावण्याकरिता प्रस्तावांचे सर्वेक्षण घेतले गेले. ‘तेजस एक्सप्रेस’सारख्या चैनीच्या गाड्या वापरल्या जातील. यातील मुंबई ते गांधीनगर मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या खाजगीकरणाचे वारे शिरत आहे. परंतु, भाडेवाढीच्या भीतीने त्याला नागरिकांचा कदाचित विरोध होऊ शकतो. रेल्वेने आधुनिकीकरण व सुविधा देण्याचा विचार केलेला आहे व अनेक नवीन मार्गांचे पण प्रस्ताव आहेत. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेसेवेवरील ताण कमी होऊ शकेल. याचा परिणाम दिसूही लागला आहे. दक्षिण मुंबईतील गर्दी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.