वन्यजीवनाची वेगळी चित्रे टिपणारा ‘फोटोग्राफर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2019   
Total Views |

 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यसृष्टी श्रेणीतील ‘शूट ऑफ द फ्रेम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार छायाचित्रकार बैजू पाटील यांना नुकताच जाहीर झाला. आज जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

 

 
जीवाची काळजी न करणारी काही माणसं, छायाचित्रकार आपल्याला जंगलांमध्ये पाहायला मिळतात. वन्यसृष्टीतील मनमोहक आणि आल्हाददायक असे दुर्मीळातील दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी ही मंडळी आपला कॅमेरा घेऊन बरीच जोखीम पत्करतात. कधी गुडघाभर चिखलामध्ये तासन्तास उभे राहावे लागते, तर कधी काट्याकुट्यातून वाट काढत त्यांना कितीतरी लांबपर्यंत प्रवासही करावा लागतो. पण अशा अवलियांना या सर्व गोष्टींची फिकीर नसते. कारण, एक वेड म्हणून एखादे काम हातात घेतले की, ते मनाला संतुष्टी मिळेपर्यंत करत राहणे हेच त्यांचे ध्येय असते. म्हणतात ना, कोणतेही असामान्य काम करायचे असेल तर त्याचा ’बाऊ’ करून चालत नाही! असेच काहीसे मत औरंगाबाद ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकार अशी ओळख निर्माण करणारे बैजू पाटील यांचे मत आहे. नुकताच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यसृष्टी श्रेणीतील ‘शूट ऑफ द फ्रेम’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणार्‍या कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. दि. १९ ऑगस्ट हा ’जागतिक छायाचित्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज या ध्येयवेड्या छायाचित्रकाराबद्दल जाणून घेऊया...

 

 
बैजू पाटील यांचा जन्म औरंगाबादमध्ये झाला. त्यांनी वाणिज्य शाखेमधून शिक्षण पूर्ण केले. मात्र, त्यांनी पहिले प्राधान्य हे छायाचित्रणालाच दिले. त्यांनी आवड म्हणून सुरू केलेला हा प्रवास त्यांची ओळख बनला. त्यांनी आधी छंद म्हणून छायाचित्रण चालू केले होते. परंतु, कॅमेर्‍याच्या आकर्षणाने त्यांना छायाचित्रणाच्या जगात खेचून नेले. याव्यतिरिक्त शालेय आणि महाविद्यालयीन काळात त्यांना अनेक छंद होते. बैजू पाटील यांना लॉन टेनिस, स्विमिंग आणि खो-खो आदी खेळांमध्ये चार सुवर्णपदके आणि तीन रजतपदके मिळाली आहेत. तसेच, त्यांना चित्रकलेचीदेखील आवड होती. चित्रकलेतील रंगसंगतीची जाण आणि आवड त्यांना या छायाचित्रणासाठी पूरक ठरली. छायाचित्रण ही नुसती आवड न ठेवता त्यांनी त्यामधील अनेक गोष्टी त्यांनी अवगत केल्या. छायाचित्रणाचा अभ्यास करण्यासाठी बैजू पाटील यांनी बंगळुरू, मुंबई, सिंगापूर आणि दिल्ली या ठिकाणी भ्रमंती केली. औरंगाबाद हे एक ऐतिहासिक शहर असल्यामुळे इथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

 

 
लहानपणी जेव्हा ते एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायचे, तेव्हा तिकडे फिरणार्‍या परदेशी पर्यटकांच्या गळ्यातील वेगवेगळे कॅमेरे बघून त्यांनाही कॅमेरा हवाहवासा वाटायचा. यामुळे त्यांनी पहिला कॅमेरा घेतला आणि छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. बैजू पाटील यांनी काढलेल्या फोटोंची लोकांकडून प्रशंसा होऊ लागली. यामुळे त्यांना छायाचित्रणासाठी नवीन ऊर्जा मिळाली. ’आपण वेगळे आणि काहीतरी चांगले काम करत आहोत,’ असा सकारात्मक विश्वास त्यांना मिळाला. त्यानंतर त्यांनी यामध्ये अभ्यास करण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना या कलेमध्ये आणखी पारंगत होण्यासाठी गुरुची गरज होती. ते बरेच ठिकाणी फिरले. परंतु, बैजू पाटील यांना नवीन काही शिकण्यास मिळाले नाही. यामध्ये त्यांची पाच वर्षे गेली. नंतर, त्यांनी त्यांच्या अनुभवातून नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात केली. ते स्वत:चेच गुरू झाले आणि त्यांनी आपली वाटचाल कायम ठेवली.

 

 
बैजू पाटील यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले. ‘RBS - Sanctuary award for the Best Wildlife Photographer - २०१०’ हा त्यापैकी एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. तसेच ‘वाईल्ड लाईफ’वर आधारित असलेले त्यांचे ’वाईल्डस्केप’ नावाचे एक पुस्तकही प्रकाशित केले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन यांच्या हस्ते आणि मुकेश अंबानींच्या उपस्थित राजभवनात बैजू पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. नवीन तरुण छायाचित्रकारांना चांगले मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी हे पुस्तक काढले. २०१३ मध्ये आशियाई पातळीच्या छायाचित्रांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या छायाचित्राला प्रथम पारितोषिक मिळाले.

 

 
भरतपूर पक्षी अभयारण्यात पाणकावळा (लार्ज कार्मोस्ट) एका गोल्ड फिशला गिळत असलेले छायाचित्र १५ हजार छायाचित्रांमध्ये निवडून आले. या स्पर्धेमध्ये भारत, कोरिया, नेपाळ, पाकिस्तान, जपान आदी ठिकाणांहून छायाचित्रे पाठवण्यात आली होती. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वन्यजीव छायाचित्राचा ‘सेवस’सारखा पुरस्कार प्राप्त करणारे औरंगाबादचे बैजू पाटील हे पहिले भारतीय ठरले होते. त्यांना ’एशिया बेस्ट वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर,’ ’सेंच्युरी एशिया वाइल्ड महाराष्ट्र फोटोग्राफर ऑफ द इयर,’ ’रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड पुरस्कार,’ ’कॅनन फोटोग्रॉफर ऑफ द इयर,’ इमॅरेट दुबईमधील ’फाइन आर्ट व सेवस एस बँक’ असे अनेक पुरस्कार मिळाले. याशिवाय, ते वन्यजीवसृष्टी वाचवण्यासाठी शाळा-महाविद्यालये व ठिकठिकाणी प्रबोधन करीत आहेत. शिवाय, त्यांना नुकताच वन्यक्षेत्रातील मानाचा असा ‘शूट ऑफ द फ्रेम’ पुरस्कार मिळाला आहे. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया येथे होणार्‍या कार्यक्रमात बैजू पाटील यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. जगभरातील १७ हजार, ५०० छायाचित्रांवर मात करून त्यांच्या छायाचित्राची निवड झाली. ‘पिसारा फुलवून नाचणार्‍या मोरासमोर पर्यटकांनी आरडाओरडा केल्याने एक भांबावलेले अस्वल येते’ ही छबी त्यांनी रणथंभोर राष्ट्रीय अभयारण्यात टिपली होती.
@@AUTHORINFO_V1@@