एक साहाय्यक 'सुरेख' कारकीर्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2019   
Total Views |




वयाच्या ७४ व्या वर्षी 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री' म्हणून पुरस्कार मिळालेल्या एक चिरतरुण अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या विशेष कार्याबद्दल जाणून घेऊया...

 

चित्रपट म्हणजे एक नायक, एक नायिका आणि एक खलनायक. अशी एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीची ओळख होती. परंतु, कालांतराने विषयाला केंद्रस्थानी मानणारेही अनेक चित्रपट सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. (बरे, हे काहीच चित्रपटांच्या बाबतीत घडते.) या चित्रपटांमध्ये सर्वच पात्रांना समान महत्त्व असते. २०१८ मध्ये असाच एक चित्रपट आला.

 

'बधाई हो' हा चित्रपट एका 'वेगळ्या' गोष्टीवर होता. त्यामध्ये बरीचशी मोठी मंडळी होती, जी नावाजलेली होती. आयुष्यमान खुराणा, नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा वगैरे वगैरे... तरीही या सर्व कलाकारांमध्ये एक चेहरा भाव खाऊन गेला तो म्हणजे आजीचे पात्र रेखाटणार्‍या सुरेखा सिकरी यांचा. तसे बघायला गेले तर हा चेहरा छोट्या पडद्यावरील सर्वात परिचित चेहरा. परंतु, या चित्रपटाने सुरेखाजींना एक विशेष ओळख दिली. त्यांनी त्या पात्रामध्ये एक नाही तर तब्बल तीन पात्रे निभावली.

 

तीही या वयात, आता त्यांचे वय आहे ७४! एक म्हणजे मुलासाठी तळमळणारी आई, एक कटकटी पण कठीणप्रसंगी सुनेच्या पाठीशी उभी राहणारी सासू, तर एक प्रेमळ आणि खट्याळ आजी, जिचे नातवांवर आणि नातवांचे तिच्यावर अपार प्रेम आहे. त्यांच्या या अभिनयाने त्यांना ती आजी प्रत्येकाच्या घरामधील वाटू लागली. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना नुकताच २०१८ चा 'सर्वोत्कृष्ट सहकलाकार' म्हणून ६६ वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. यामुळे 'सहकलाकार' याचे महत्त्व काय आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. त्यांच्या ४० वर्षांच्या अभिनय क्षेत्रामध्ये अनेक चढ-उतार आलेे. जाणून घेऊया त्याचा लेखाजोखा.

 

अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचा जन्म १९४५ मध्ये नवी दिल्ली येथे झाला. परंतु, त्यांचे बालपण हे अल्मोरा आणि नैनितालमध्ये गेले. त्यांचे वडील हे वायुदलामध्ये कार्यरत होते आणि त्यांची आई शिक्षिका होती. बालपणापासूनच सुरेखांना अभिनयामध्ये रस होता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी 'अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, अलिगढ'मधील जीईसीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर १९६८ मध्ये त्यांनी 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून (एनएसडी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात ही नाटकांपासून केली. सलग १० वर्षे सुरेखा सिकरी या एनएसडीच्या 'रेपरेटरी कंपनी'मध्ये काम करत होत्या. तिथे त्यांचा अनेक बड्या कलाकारांशी संबंध आल्यामुळे त्यांच्यातील अभिनयातील कलागुणांना प्रगल्भ होण्यास मदत झाली.

 

या कालावधीमध्ये त्यांनी 'संध्या छाया,' 'तुघलक,' आणि 'आधे अधुरे' या मालिकांसाठी प्रोडक्शनमध्ये कामे केली. टीव्ही आणि चित्रपटांबाबत असलेले कुतूहल त्यांना स्वप्ननगरी मुंबईमध्ये घेऊन आले. १९७८ मध्ये सुरेखा सिकरी यांनी अम्रित नाहता दिग्दर्शित 'किस्सा कुर्सी का'मधून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले. या पहिल्याच चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाने सर्वांना कामाची दखल घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये कामे मिळू लागली.

 

नाटक, मालिका आणि निवडक चित्रपट अशी त्यांची कसरत सुरू झाली. १९८६ मध्ये त्यांनी 'तमस' या गोविंद निहलानी दिग्दर्शित चित्रपटामध्ये काम केले. त्यांच्या या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. या चित्रपटामधील भूमिकेसाठी सुरेखा यांना १९८८ चा 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री' म्हणून 'राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात आला. येथून त्यांच्या अभिनयाला खरी ओळख मिळाली. प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'परिणती' या चित्रपटामध्ये त्यांची मोठ्या पडद्यावरील पहिली प्रमुख भूमिका होती. त्यानंतर त्यांनी 'नजर,' 'करामती कोट,' 'लिटिल बुद्धा,' 'मम्मो,' 'नसीम,' 'सरदारी बेगम,' 'सरफरोश,' 'हरी-भरी,' 'झुबेदा,' 'रेनकोट' इ. असे अनेक संवेदनशील आणि निवडक चित्रपट केले. यामध्ये त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.

 

१९९५ साली 'मम्मो' या चित्रपटासाठी त्यांना दुसर्‍यांदा 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री'चा 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला. तसेच, १९८९ मध्ये 'संगीत नाटक अकादमी पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित करण्यात आले. श्याम बेनेगल, अपर्णा सेन, रितूपर्णो घोष, मणी कौल आणि सईद मिर्झा अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत कामे केली. सुरेखा सिकरी यांचा छोट्या पडद्यावरील प्रवासदेखील तेवढाच उल्लेखनीय आहे. त्यांनी अनेक मालिकांमध्ये कामे केली. कधी सकारात्मक, तर कधी नकारात्मक अशा विविध प्रकारची पात्रे त्यांनी उभी केली.

 

त्यांची ओळख असलेले सर्वांच्या लक्षात असलेले पात्र म्हणजे 'बालिकावधू' या मालिकेतील 'दादीसा.' त्यांनी सलग आठ वर्षे हे पात्र छोट्या पडद्यावर साकारले. तसेच, 'सात फेरे - सलोनी का सफर,' 'एक था राजा एक थी राणी,' 'परदेस में है मेरा दिल' आणि 'जस्ट मोहब्बत' या मालिकांमधील त्यांच्या व्यक्तिरेखा नावाजल्या गेल्या. हिंदीसोबत त्यांनी मल्याळम चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. २०१८ मध्ये आलेल्या 'बधाई हो'मधील त्यांनी साकारलेली 'आजी' सर्वांच्या लक्षात राहिली. यासाठी सुरेखा सिकरी यांना 'सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार जाहीर झाला आहे. याचसोबत त्यांच्या नावावर तीन वेळा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचे 'राष्ट्रीय पुरस्कार' जमा झाले आहेत. त्यांची जिद्द आणि वयाच्या ७४ व्या वर्षीही काम करण्याची त्यांची ऊर्जा ही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरते आहे. त्यांच्या या ऊर्जेला आणि जिद्दीलासलाम...

 
 
@@AUTHORINFO_V1@@