ऐरोलीत साजरा झाला आंतरराष्ट्रीय कांदळवन दिवस

    26-Jul-2019
Total Views |


 


'कांदळवन संरक्षण विभाग' ( मॅंग्रोव्ह सेल) व 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचा 'कांदळवन संरक्षण विभाग' ( मॅंग्रोव्ह सेल) व 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या वतीने शुक्रवारी ऐरोलीतील 'किनारा व सागरी जैवविविधता केंद्रा'मध्ये 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिवस' साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 'कांदळवनांमधील जीवन' या विषयावर आधारित आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
 

 
 

 

कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने 'युनेस्को'ने २०१५ मध्ये 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिवस' साजरा करण्याचे निश्चित केले. तेव्हापासून २६ जुलै रोजी जागतिक पातळीवर कांदळवन दिवस साजरा करण्यात येतो. सागरी परिसंस्थेमध्ये कांदळवन महत्वाची भूमिका बजावतात. राज्यात ३०४. चौ.किमी क्षेत्रावर कांदळवन पसरले असून त्यांना संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. कांदळवनांचे संवर्धन आणि रक्षणासाठी वन विभागाअंतर्गत २०१२ मध्ये 'म्रॅगोव्ह सेल' या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. तर कांदळवनासंबंधी संशोधन व उपजीविका उपक्रम राबविण्याकरिता २०१५ मध्ये 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' स्थापन झाले. या दोन्ही संस्थांच्या वतीने शुक्रवारी संयुक्तरित्या मोठ्या उत्साहात 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिवस' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ऐरोलीतील केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन 'मॅंग्रोव्ह सेल'च्या उप वनसंरक्षक नीनू सोमराज यांनी केले.
 
 
 
 

 

कांदळवन व सागरी परिसंस्थेबद्दल प्रबोधन करण्यासाठी 'मॅग्रोव्ह फाऊंडेशन'कडून दर महिन्याला व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. 'कांदळवन दिना'च्या निमित्ताने कांदळवनांचे अभ्यासक डाॅ. प्रसाद कर्णिक यांचे व्याख्यान पार पडले. तर भिवंडीतील 'न्यू हाय स्कूल'मधील विद्यार्थी व शिक्षकांनी केंद्राला भेट दिली. यावेळी 'मॅंग्रोव्ह सेल'च्या खास 'फ्लेमिंगो बस'मधून मुलांना शाळेेतून केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी विद्यार्थ्यांनी केंद्राला भेट देण्याबरोबरच कांदळवन सफारीचा आनंद लुटत त्यामधील जैवविविधतेची माहिती जाणून घेतली. यानिमित्ताने फाऊंडेशनकडून छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी हौशी छायाचित्रकारांनी १६० हून अधिक छायाचित्र पाठवली होती. छायाचित्र स्पर्धेचे श्रीकांत मणीपूरी, सुर्दशन एस, निकेतन ठाकूर, शौनक मोदी आणि नितिन विजयन विजेते ठरले. त्यांना रोखरक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबईबरोबर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध कार्यक्रम पार पडले.


 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat