नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी विनंती आम्ही पुन्हा पाकिस्तानला करणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले. जाधव यांना सुखरूप भारतात आणेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याबद्दल देशभर आनंदाचे वातावरण असताना राज्यसभेत आज याबाबत निवेदन करताना जयशंकर म्हणाले की,“या अतिशय संवेदनशील अशा मुद्द्यावर भारताला मिळालेल्या विजयाबद्दल संपूर्ण सभागृह आनंदी असेल याबद्दल शंका नाही. अतिशय कठीण परिस्थितीत साहस आणि धैर्य दाखवल्याबद्दल जाधव परिवाराचे त्यांनी कौतुक केले पाहिजे. संपूर्ण सभागृह अशा परिस्थितीत जाधव परिवाराच्यापाठिशी आहे, याबाबत मला खात्री आहे. जाधव यांच्या सुरक्षेसाठी तसेच सुटकेसाठी सरकारतर्फे सुरू असलेले प्रयत्न पुढेही सुरू राहतील, सरकार यात कोणतीही कसर ठेवणार नाही,” असा निर्वाळा त्यांनी दिला.
जयशंकर पुढे म्हणाले की, “२०१७ मध्ये सरकारने जाधव यांच्या सुटकेसाठी सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा निर्धार याच सभागृहात जाहीर केला होता. त्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा मुद्दा नेण्याचाही समावेश होता,” याकडे लक्ष वेधत जयशंकर म्हणाले की, “सरकारने केलेल्या प्रयत्नांना सध्या काही प्रमाणात यश आले आहे. यात ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि यांच्या चमूने दिलेल्या योगदानाचाही समावेश आहे, त्यामुळे त्यांचेही आपण अभिनंदन केले पाहिजे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात खोट्या आरोपांखाली कुलभूषण जाधववर खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली,” याकडे लक्ष वेधत जयशंकर म्हणाले की, ”मात्र हे करताना कायद्यानुसार आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आवश्यक असलेली कायदेशीर मदत त्यांना देण्यात आली नाही. बुधवारी न्यायालयाने यासंदर्भात दिलेला निकाल हा फक्त भारत आणि जाधव परिवाराचाच विजय नाही तर आंतरराष्ट्रीय करारानुसार होणार्या कायद्यांवर विश्वास ठेवणार्यांचाही विजय आहे,”असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat