जागतिक बँकिंग क्षेत्रात भारतीय चेहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jul-2019   
Total Views |



स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अन्शुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक-मुख्य वित्त अधिकारीपदी निवड करण्यात आली. त्यांनी जागतिक बँकेच्या पहिल्या महिला आर्थिक वित्त अधिकारी होण्याचा मान मिळवला. बँकिंग क्षेत्रात इतक्या उच्चपदावर पोहोचणाऱ्या या भारतीय बँकरविषयी...


भारतीय महिला सध्या निरनिराळ्या क्षेत्रात अनेकानेक शिखरे गाठण्याचे विक्रम रचत आहेत. आजघडीला प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी ही दिवसेंदिवस उंचावत आहे. राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्र, विज्ञान-तंत्रज्ञान तसेच बँकिंग क्षेत्रातसुद्धा दुर्गांनी आपले स्थान सिद्ध केले आहे. भारतीय महिलांच्या यशमालिकेतील एक घटना म्हणजे - नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका अन्शुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य वित्त अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी जागतिक बँकेच्या पहिल्या महिला आर्थिक वित्त अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अन्शुला कांत यांना वित्तीय व्यवस्थापन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीयांसाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. या बँकेच्या अध्यक्षपदावर सुरुवातीपासूनच अमेरिकेचा वरचष्मा राहिला आहे. अशात कांत यांना हा मान मिळाल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जागतिक स्तरावरील वित्त क्षेत्रात अनेक भारतीयांनी आजवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यात डॉ. मनमोहन सिंग, डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया, विक्रम पंडित, डॉ. रघुराम राजन आदी व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. आता या यादीमध्ये अन्शुला कांत यांचेदेखील नाव समाविष्ट झाले आहे. त्यांना फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आहे. जाणून घेऊया कसा होता त्यांचा भारतीय स्टेट बँक ते जागतिक बँकेपर्यंतचा प्रवास.

 

५८ वर्षीय अन्शुला कांत यांचा जन्म ७ सप्टेंबर, १९६० रोजी झारखंड जिल्ह्यातील जमशेदपूरमध्ये झाला. १९७८ मध्ये 'लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन'मध्ये अर्थशास्त्र विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९८१मध्ये त्यांनी 'दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स'मध्ये त्या प्रमाणित सहयोगी आहेत. १९८३ मध्ये त्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'मध्ये 'प्रोबेशनरी ऑफिसर' म्हणून सामील झाल्या. अन्शुला यांना 'फायनान्स आणि बँकिंग' क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी मुंबई मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. मुंबईतील कॉर्पोरेट सेंटरमध्ये सिंगापूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, परफॉर्मन्स प्लानिंग आणि रिव्ह्यू यासारख्या इतर जबाबदाऱ्यादेखील त्यांनी पार पडल्या. 'स्पेशल कमर्शियल ब्रांच'चे साहाय्यक महाव्यवस्थापक, वाराणसी कालीन आणि रेशीम निर्यात केंद्र आणि मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट मूल्यांकन सेल हा प्रभागांमध्ये त्यांनी काम पाहिले. लखनौ-सिंगापूरमधील त्यांच्या कार्यकाळात सिंगापूरमधील बँकांसाठी रिटेल ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली होती.

 

दरम्यान, त्यांनी सीए संजय कांत यांच्याशी विवाह केला. त्यांना सिद्धार्थ आणि नुपूर ही दोन मुले आहेत. मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतानादेखील त्यांनी गृहिणी म्हणूनही तितक्याच शिताफीने जबाबदारी सांभाळली. सप्टेंबर २०१८ पासून त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत होत्या. त्यांनी स्टेट बँकेत अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले असून मुख्य आर्थिक अधिकारी या नात्याने ३८ दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न बँकेला मिळवून दिले होते. वित्त, बँकिंग आदी क्षेत्रांतील ३५ वर्षांचा अनुभव अन्शुला कांत यांच्या गाठीशी आहे. भारतीय स्टेट बँकेत सीएफओपदी असताना बँकिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करणाऱ्यांमध्ये अन्शुला यांचे नाव घेतले जाते. इथे त्या रिस्क, ट्रेझरी, फंडिंग यासारख्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत स्टेट बँकेने मोठा पल्ला गाठला आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष मालपैस यांनीदेखील त्यांची तारीफ करताना सांगितले की, "अन्शुला कांत यांच्या अनुभवांचा उपयोग जागतिक बँकेच्या व्यवहारांमध्ये होईल. तसेच, त्या बँकिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठीही ओळखल्या जातात. जागतिक बँकेच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी, पण अन्शुला कांत यांच्याबरोबर काम करणे ही आनंदाची बाब असेल," अशा शब्दांमध्ये त्यांनी कांत यांचे स्वागत केले. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी संपूर्ण भारतीयांकडून हार्दिक शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@