मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील एक ज्येष्ठ कलाकार दया डोंगरे यांना यंदाचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे 'जीवनगौरव' पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
या लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल की, सहसा सासू तर खाष्ट असते, मग तिचाच तो भोळा चेहरा कसा काय? तर त्यामागे कारण आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे. होय, कारण मराठी सिनेसृष्टीत 'खाष्ट सासू' म्हटले की समोर चेहरा उभा राहतो तो दया डोंगरे यांचा. साधारण ८०-९०च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्रींनी खाष्ट सासूची भूमिका निभावली. पण, दया डोंगरेंचे खाष्ट-करारी व्यक्तिमत्त्व आणि त्यांची भेदक नजर या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी अनेकांच्या मनात घर केले होते. बरं, एवढंच नव्हे, तर वैविध्यपूर्ण भूमिका रंगमंचावर तसेच चित्रपटात साकारण्याची त्यांना संधी मिळाली. कधी आधुनिक आचारविचारांची स्त्री, तर कधी हेकेखोरपणे स्वतःचे हट्ट पूर्ण करणारी स्त्री, अशा अनेक दर्जेदार भूमिका त्यांनी लीलया वठवल्या. गायिका होण्याची इच्छा असतानाही त्यांना आपसूकच उत्कृष्ट अभिनेत्रीची ओळख मिळाली.
दया डोंगरे यांचा जन्म ११ मार्च, १९४० अमरावतीला मोडक परिवारामध्ये झाला. वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकऱ्यांमुळे त्यांना कर्नाटकातील धारवाड येथे शिक्षण घ्यावे लागले. काही काळ त्या पुण्यात वास्तव्यास होत्या. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले. घरातील कलासक्त वातावरणामुळे त्यांचा कलही विविध कला आत्मसात करण्याकडेच होताच. त्यांच्या आई यमुताई मोडक हेही रंगभूमीवरील एक आदराने घेतले जाणारे नाव. 'किचकवध', 'हाच मुलाचा बाप' या नाटकांमधून यमुताईंनी केलेला अभिनय त्या काळात सर्वांच्या नजरा खिळवून गेला. आपल्या आईकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाविद्यालयीन जीवनातही दयाताईंनी आपल्या अभिनयाची विशेष चुणूक दाखविली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो. ग. रांगणेकर लिखित 'रंभा' या नाटकात त्यांनी इतके अप्रतिम काम केले की, त्यासाठी त्यांना प्रशस्तिपत्रक मिळाले. त्यानंतरच्या काळात आलेले 'संकेत मिलनाचा' हे परकीय संकल्पनेवर आधारित नाटकही तितकेच गाजले. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाही गाजवल्या. त्यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी दिल्लीच्या प्रसिद्ध 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' म्हणजे 'एनएसडी'मध्ये प्रवेश घेतला. परंतु, त्याच काळात लग्न झाल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. लग्नानंतरही त्यांची अभिनयाची ओढ काही थांबली नाही. त्यांनी सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांच्या 'नाट्यद्वयी' या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी 'तुझी माझी जोडी जमली रे', 'नांदा सौख्यभरे', 'याचसाठी केला होता अट्टहास', 'इडा पिडा टळो' यांसारख्या नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची एक विशेष छाप सोडली. १९६९ मध्ये त्या मुंबईत स्थायिक झाल्या आणि त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. 'नाट्यमंदिर' या संस्थेने विद्याधर पुंडलिकांचे 'माता द्रौपदी' हे नाटक रंगमंचावर आणले. या नाटकामध्ये द्रौपदीच्या भूमिकेत विजया मेहता होत्या, तर गांधारीची भूमिका दया डोंगरे साकारत होत्या. या दोन अभिनेत्रींची अभिनयाची जुगलबंदी म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव. मात्र, काही कारणास्तव या नाटकाचे फारसे प्रयोग होऊ शकले नाहीत. परंतु, त्यानंतर आलेल्या 'लेकुरे उदंड झाली' या नाटकाने दया डोंगरे यांना खरी ओळख मिळाली. या नाटकानंतर त्यांचा स्वतःचा चाहतावर्ग निर्माण झाला. नाटकाचा प्रवास सुरू असतानाच त्यांनी दूरदर्शनवर काम करण्यासदेखील सुरुवात केली. त्यांनी अनेक हिंदी मालिकांमधून विविध भूमिकांना न्याय दिला. त्यांच्या प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले. याचसोबत त्यांनी मराठी चित्रपटांमध्येदेखील आपला अभिनयाचा ठसा उमटवला.
'मायबाप' आणि 'उंबरठा' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'आत्मविश्वास' या चित्रपटामध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली. पण त्याचवेळेस त्यांनी 'नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटामध्ये साकारलेल्या करारी स्त्रीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. त्यानंतर 'खट्याळ सासू नाठाळ सून' या सदाबहार विनोदी चित्रपटातील त्यांनी साकारलेली सासूची मध्यवर्ती भूमिकाही तितकीच संस्मरणीय ठरली. नाटक, चित्रपट आणि मालिका या अशा मनोरंजनाच्या तिन्ही क्षेत्रांत काम केल्यानंतरही त्यांची पहिली पसंती ही रंगभूमीलाच होती. 'आश्रय', 'जुम्बीष' सारखे चित्रपट तर 'मंतरलेली चैत्रवेल', 'चि. सौ. कां. चंपा गोवेकर','अमानुष' यांसारख्या नाटकांमधून आपल्या अनोख्या अभिनय कौशल्याने ७०-८०च्या दशकात दया डोंगरेंनी रुपेरी पडदा आणि रंगभूमीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले. 'मायबाप' आणि 'खट्याळ सासू नाठाळ सून' या चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या विशेष अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 'नाट्यदर्पण प्रतिष्ठान'चा विशेष पुरस्कारदेखील त्यांना बहाल करण्यात आला. सासूच्या वेगवेगळ्या स्वभावछटा पडद्यावर साकारणाऱ्या, तसेच विविध भूमिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या अशा चिरतरुण दया डोंगरे यांना 'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे'तर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचे दै. 'मुंबई तरुण भारत' तर्फे मन:पूर्वक अभिनंदन...!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat