शेजारी देश असूनही पाकिस्तानबद्दल आपल्याला किती कमी माहिती असते, याची पुस्तक वाचताना जाणीव होते. आपल्या लेखी फक्त एक 'मुस्लिम राष्ट्र' अशी ओळख असलेल्या या देशातही विविध भाषा, वंश, पंथ यांच्या अनुषंगाने अनेक प्रवाह आहेत आणि कुठल्याही दोन मानवसमूहात असू शकतील असेच ताणतणावाचे, संघर्षाचे संबंध त्यांच्यातही आहेत. पंजाबी लोकांचे असणारे वर्चस्व; त्यांनी बलोच, पश्तून, सिंधी जनतेवर केलेली दंडेली ; आजच्या पाकिस्तानच्या भूमीशी काहीही संबंध नसलेली उर्दू भाषा अन्य भाषांवर लादली गेल्याने निर्माण झालेला असंतोष याबद्दल लेखकाने लिहिले आहे.
'पाकिस्तान ' ही भारतीयांसाठी एक ठसठसती जखम आहे. त्या देशाचा नुसता उल्लेखदेखील मनात प्रचंड खळबळ निर्माण करतो. त्या खळबळीला असंख्य पदर आहेत. 'संताप' ही भावना या खळबळीमध्ये सर्वाधिक दृश्यमान असली तरी तिच्या तळाशी वेदना, विश्वासघात, दुःख, हताशा आणि सूडभावनादेखील असते. धर्मांध शक्तींच्या उन्माद आणि दहशतीमुळे आपल्या भारतभूमीवर कायमचा चरा उमटला आणि त्याने देशाचे तुकडे केले याची जाणीव आजही भारतीयांना अस्वस्थ करते. पण त्याहीपुढे जाऊन भारतीयांच्या मनात राग आहे कारण, एकदा स्वतंत्र झाल्यावर तरी सुखाने नांदायचे सोडून या नव्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतरही भारताला सतत त्रास दिला आहे. यातून पाकिस्तान आणि तिथल्या जनतेकडे बघण्याचा भारतीयांचा एक विशिष्ट दृष्टिकोन तयार झाला असेल तर त्यांना दोष देता येणार नाही. अशा परिस्थितीत कधीतरी पाकिस्तानबद्दलच्या सरसकट समजाचा पृष्ठभाग खरवडला जातो, तेव्हा त्याखाली आपण कल्पना न केलेली चित्रं दिसतात. प्रवीण कारखानीस लिखित 'मंजिल-ए-मकसूद पाकिस्तान' हे पुस्तक अशा चित्रांचं कोलाज डोळ्यासमोर उभं करतं.
पाकिस्तानभेटीची अपूर्व संधी
२००४ च्या आसपासचा कालखंड हा भारत-पाकिस्तान संबंधातला रोमँटिक कालखंड म्हणता येईल. भारतीय क्रिकेट संघाचा यावर्षीचा पाकिस्तान दौरा ऐतिहासिक होता. कारगिल युद्धामुळे ताणले गेलेले संबंध निवळण्याच्या दृष्टीने भारत सरकारने पावलं उचलली होती. त्यातलंच एक पाऊल म्हणजे भारत-पाकिस्तान क्रिकेटचे पुनरुज्जीवन. या दौऱ्याच्या निमित्ताने पाकिस्तानात गेलेल्या पत्रकार, कलाकार इत्यादींकडून आपल्या अनुभवांवर बरंच काही लिहिलं, बोललं गेलं आहे. प्रवीण कारखानीस यांनी सर्वसामान्य प्रेक्षक या नात्याने पाकिस्तानला भेट दिली आणि त्यानिमित्ताने केलेल्या भटकंतीदरम्यान आलेले मनोज्ञ अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. पाकिस्तानात एकट्याने प्रवास करणे हे तसे जिकीरीचेच, परंतु कारखानीस यांनी मुंबईपासून रोमपर्यंत केलेल्या दुचाकी प्रवासाचे रोचक अनुभव ('अष्टचक्री रोमायण' या पुस्तकात) ज्यांनी वाचले आहेत, त्यांना कारखानीस यांच्या या हिमतीचे आश्चर्य वाटणार नाही. पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी कराव्या लागलेल्या धावपळ-धडपडीने पुस्तकाची सुरुवात होते. तेव्हापासून पुस्तकाने घेतलेली पकड शेवटपर्यंत कायम राहते. पुस्तकात पाचही सामन्यांचे '.. याची डोळां ' केलेलं वर्णन आहे खरं, पण मुळात लेखकाच्या प्रवासाचा उद्देशच शक्य त्या प्रकारे पाकिस्तान टिपून घेणे हाच आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे पुस्तकाचा गाभा पाकिस्तानातील स्थळांचा आणि माणसांचा अनुभव हाच आहे.
सामाजिक आणि ऐतिहासिक नोंदी
शेजारी देश असूनही पाकिस्तानबद्दल आपल्याला किती कमी माहिती असते, याची पुस्तक वाचताना जाणीव होते. आपल्या लेखी फक्त एक 'मुस्लिम राष्ट्र' अशी ओळख असलेल्या या देशातही विविध भाषा, वंश, पंथ यांच्या अनुषंगाने अनेक प्रवाह आहेत आणि कुठल्याही दोन मानवसमूहात असू शकतील असेच ताणतणावाचे, संघर्षाचे संबंध त्यांच्यातही आहेत. पंजाबी लोकांचे असणारे वर्चस्व; त्यांनी बलोच, पश्तून, सिंधी जनतेवर केलेली दंडेली ; आजच्या पाकिस्तानच्या भूमीशी काहीही संबंध नसलेली उर्दू भाषा अन्य भाषांवर लादली गेल्याने निर्माण झालेला असंतोष याबद्दल लेखकाने लिहिले आहे. ज्या ज्या ठिकाणांना लेखकाने भेट दिली त्यांचा इतिहास आवर्जून लिहिला आहे. त्यामुळे पुस्तक म्हणजे नुसती स्थलदर्शनाची डायरी न होता त्याला अधिक खोली प्राप्त झाली आहे. अन्य प्रांतातून आलेल्या मूस्लिम राज्यकर्त्यांच्या कबरी, जन्मस्थळं यांच्या इतिहासाबद्दल आपल्याला माहिती मिळते. ते सगळे बाहेरून आलेले क्रूर आक्रमक असूनही ते फक्त 'इस्लामचे पाईक' होते म्हणून त्यांच्याविषयी प्रेम वाटणाऱ्या पाकिस्तानी जनतेच्या वृत्तीवरही लेखक बोट ठेवतो. इथल्या मूस्लिम पूर्वसुरींसोबतच हिंदू पूर्वसुरी, त्यांचे कार्य, त्यांच्या पुसट होत जाणाऱ्या आठवणीही लेखक मांडतो तेव्हा धर्मवेडापायी पाकिस्तानने पुसत नेलेल्या इतिहासाविषयी चुटपुट वाटत राहते.
प्रवासादरम्यान भेटलेल्या पाकिस्तानी हिंदूंशी झालेल्या संवादातून तिथल्या हिंदूंसमोर ‘आ’ वासून उभ्या असलेल्या प्रश्नांची जाणीव होते. आपल्या मुलीच्या लग्नासाठी, आपल्या जातीतला जाऊ दे, किमान हिंदू धर्म असलेला वर तरी मिळावा एवढी माफक अपेक्षा पूर्ण करणंही तिथल्या हिंदू वधुपित्यांना दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. वर उल्लेखलेल्या पाकिस्तानांतर्गत संघर्षांपेक्षा हा संघर्ष अधिक असमान बाजूंमधला आहे, हे जाणवतं. पुस्तकातली अजून एक लक्षणीय गोष्ट म्हणजे यात केलेला उर्दूचा उत्तम वापर. स्वतः लेखकाने पाकिस्तानातल्या लोकांशी साधलेला संवाद उर्दूमध्ये आहेच, शिवाय एक संपूर्ण प्रकरण पाकिस्तानातील प्रसिद्ध शायर, लेखक, कलाकार यांना वाहिलेले आहे. हे प्रकरण उर्दू काव्यपंक्ती, शेरोशायरी, चित्रपटगीतं यांनी समृद्ध आहे. ते वाचत असताना सीमेच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या कला आणि कलाकारांची मुळं एकच आहेत हे आपण किती सहजपणे विसरलो आहोत, याची जाणीव होते.
आदरातिथ्य
सर्वसाधारणपणे भारतीयांच्या मनात पाकिस्तानी लोकांविषयी एक संशयाचं धुकं असतं. पण २००३ च्या दौऱ्याच्या निमित्ताने पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांचे अनुभव ऐकले तर त्यांचा अनुभव खूप वेगळा असल्याचं दिसतं. प्रस्तुत पुस्तकामध्येही लेखकाने पाकिस्तानी नागरिकांकडून आलेले सुखद अनुभव नमूद केलेले आहेत. त्यात त्यांच्याकडून भाडे नाकारणारा टॅक्सीवाला आहे, लेखकाला आपला पाहुणा समजून आश्वस्त करणारा हॉटेलवाला आहे, विमानात भेटलेला आणि उतरल्यावर रात्रीची वेळ आहे म्हणून लेखकाला स्वतःच्या गाडीतून इच्छित स्थळी पोचवणारा सहप्रवासी आहे... मेहमान नवाज़ीचे अनेक किस्से यात वाचायला मिळतात, जे पाकिस्तान्यांविषयीच्या पारंपरिक समजुतींना छेद देतात. लेखकाने जसे हे अनुभव नमूद केले आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या वाटचालीत त्यांच्याकडून घडलेल्या चुका, अल्पसंख्याकांना तिथे मिळणारी वागणूक यावरही भाष्य केले आहे. लिखाणातले असे संतुलन आणि मांडणीमधला ओघ यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.
पुस्तकाच्या तांत्रिक बाजूंचा विचार करता एकूण छपाई सुटसुटीत आहे परंतु, पानावरचा दोन्हीकडचा समास अतिशय कमी रुंदीचा असल्याने वाचताना खटकत राहते. शिवाय पुस्तकात केवळ मधल्या काही पानांवर छायाचित्रं छापलेली असताना संपूर्ण पुस्तक आर्टपेपरवर छापण्याचे प्रयोजन कळत नाही. ते टाळले असते तर पुस्तकाची किंमत कमी होऊ शकली असती. असो. अशा काही गोष्टी वगळता पुस्तक उत्तम अनुभव देते. थोड्याश्या काळासाठी किलकिल्या झालेल्या दरवाजातून पूर्वग्रह बाजूला ठेवून, सजगपणे पाहिल्यामुळे पाकिस्तानच्या अंतरंगाचे धावते, तरीही लक्षात राहील, असे दर्शन लेखकाने घडवले आहे. प्रामाणिकपणे आणि नेटकेपणाने मांडल्याने पुस्तक वाचनीय झालं आहे. आपल्यासारख्याच असणाऱ्या तरीही आपल्यासारख्या नसणाऱ्या भारताच्या या शेजाऱ्याचे हे दर्शन जसे चकित करते तसेच कोड्यातही पाडते. व्यक्तिगत पातळीवर शहाणीव असणारा, सौजन्यशील पाकिस्तान एक समाज म्हणून इतका एकांगी आणि शहाणपण गमावलेला का आहे, हा प्रश्न पुस्तक संपताना त्यामुळेच छळत राहतो.
पुस्तक : मंज़िल-ए-मक्सूद पाकिस्तान
लेखक : प्रवीण कारखानीस
प्रकाशक : श्री सर्वोत्तम प्रकाशन, इंदूर
आवृत्ती : दुसरी (मार्च २०१९)
पृष्ठसंख्या : १८८
किंमत : ३०० रु.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat