आज ५ जून. जागतिक पर्यावरण दिन. त्यानिमित्ताने मुंबईतील सर्वात प्रदूषित अशा मिठी नदीची दुरवस्था आणि या नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न यांचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
दि. २६ जुलै, २००५ रोजी मिठी नदीने मुंबईला जोरदार तडाखा दिला आणि ही महानगरी अक्षरश: पाण्याखाली गेली. त्यामुळे ‘मिठी नदी’ म्हणजे ‘गोड नदी’ ही फक्त तशी नावापुरतीच मर्यादित राहिली असून या नदीच्या प्रकोपाने मात्र मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले. आज या नदीचे स्वरूप हे पर्जन्य-नाला वा मलजलनिस्सारणवाहिनीसारखे झाले आहे. म्हणूनच, या ‘मिठी’ नामक पाण्याच्या प्रवाहाला ‘नदी’ म्हणणे हे पूर्णत: चुकीचे ठरेल. गेल्या अनेक दशकांमध्ये हा जलप्रवाह असंख्य प्रदूषणकारक घटकांनी भरला आहे. तसेच, अनेक अतिक्रमणांनी तिच्यावर अनिर्बंधित भार टाकला. त्यामध्ये जवळच्या वस्त्यांमधील मलजल, तेथील घनकचरा, तसेच कित्येक औद्योगिक विषारी जलद्राव्यही सोडले जाते.
अफरोज शाह यांची कामगिरी
२०१६ साली जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम हातात घेऊन वर्सोवा किनारा पद्धतशीरपणे स्वच्छ करण्यात पुढाकार घेणारे व व्यवसायाने वकील असलेले अफरोज शाह यांचे ‘युनायटेड नेशन’चे एक ‘चॅम्पियन’ म्हणून जगभरात नाव झाले. अफरोजच्या मनात मिठी नदीची ही दुरवस्था बघितल्यानंतर ही नदी शुद्ध करण्याचे विचार प्रवाहित झाले. मिठी नदीविषयक नोव्हेंबर २०१८ मध्ये अफरोजने दिलेल्या एका मुलाखतीतील काही ठळक मुद्दे म्हणूनच आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने अधोरेखित करावेसे वाटतात.
अफरोज यांनी मिठी नदीवर एक फेरी मारली व त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या. घनकचरा जमविण्याच्या बाबतीत मुंबई महापालिकेकडून जवळच्या वस्तीला काही फायदा मिळत नाही, तसेच त्या वस्त्यांकरिता मलजलनिस्सारणवाहिनीचे जाळे नसल्याने ते अशुद्ध पाणी नदीप्रवाहात सोडले जाते. नदीच्या पहिल्या किमीपासून सुरुवात केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, पाण्यातील सर्व प्लास्टिक कचरा बाहेर काढून तो तेथील २५ हजार ते ३० हजार लोकांना प्रशिक्षित करुन पुनर्वापराकरिता पाठविण्याची व्यवस्था करायला हवी. एका रविवारी त्या लोकांबरोबर काही तास खर्च करून त्यांना प्लास्टिकसंबंधी प्रशिक्षण देण्याचेही ठरले. घनकचऱ्याचे ओले व सुके वर्गीकरण करावे, दुधाच्या प्लास्टिक पिशव्या स्वच्छ करून त्या वेगळ्या कराव्यात, असे मुद्दे चर्चिले गेले.मिठी नदीच्या काठावर काँक्रीटची भिंत कशासाठी बांधली गेली आहे, तसेच नदीच्या तळाला काही ठिकाणी काँक्रीटचे थर का टाकले आहेत, ते मात्र अफरोजला काही कळले नाही. या दोन्ही कामांमधून कसलेही पर्यावरणीय हित साधले जात नव्हते. त्यातच सरकारच्या व पालिकेच्या कामात हा शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचा उत्साह नसल्यामुळेच नदीची ही दयनीय अवस्था झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मिठी नदीवर आतापर्यंत झालेली कामे
एमएमआरडीए व मुंबई महापालिकेने आतापर्यंत १२०० कोटी रुपये मिठी नदीच्या प्रकल्पावर खर्च केले आहेत. त्या अंतर्गत नदीचा विकास करून नदीची रूंदी व काही ठिकाणी खोली वाढविली गेली आहे. तसेच काही अतिक्रमणे हटविली गेली व नदीच्या काठावर काँक्रीटची भिंत बांधण्यात आली. दि. २६ जुलै, २००५ मधील पुरानंतर माधवराव चितळे यांच्याकडून ‘सत्यशोधक कमिटी’ स्थापन करण्यात आली. त्यांनी २००६ मध्ये सरकारकडे अहवाल सादर केला. त्या अहवालात, अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यांचा उल्लेख करून ती त्वरित हटवण्यात यावीत, असे स्पष्ट म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षपणे नदीच्या ठिकाणी ती कामे पूर्ण झाली नाहीत. २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने मिठी नदीच्या नूतनीकरणासाठी अनेक सल्लागार नेमले. सप्टेंबर २०१८ मध्ये ‘वनशक्ती’ या गैरसरकारी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली. त्यात नदीवर इतकी कामे होऊनही नदीत मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण व अतिक्रमणे आहेत, ती कधी हटविणार याबद्दल विचारणा केली होती. न्यायालयाने ‘निरी’ संस्थेला तसेच ‘आयआयटी मुंबई’ला पण परत सल्लागार नेमावे, म्हणून आदेश दिले. त्यांनी अहवालात वांद्रे-कुर्ला संकुलाकरिता जमिनीवर भराव घालणे, अनधिकृत बांधकामे, प्रक्रिया न केलेले मलजल सोडणे इ. कारणांमुळे मिठी नदीला पूर येण्याचे थांबत नाही, असे नमूद केले. २०११ मधील ‘निरी’च्या अहवालात रिटेनिंग भिंत बांधण्याच्या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. या भिंतीमुळे पुराची शक्यता वाढत होती. या मिठी नदीत मोठे १३ नाले, तसेच अनेक छोटे नाले मलजल सोडत आहेत. मिठी नदीवरील चिखल मुक्तीचे काम पुरेसे झालेले नाही. त्यामुळे दर महिन्याला चिखलमुक्तीचे काम सुरू ठेवायला हवे. जुलै २००५च्या पुराच्या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली तरी, अजूनपर्यंत मिठी नदीचा नकाशा बनविला गेलेला नाही.
दरवर्षी मिठी नदीला पावसाळ्यात पूर का येतो?
या नदीच्या काठावरील वस्तीला आता दरवर्षीच्या पुराबद्दल नावीन्य वाटत नाही. पण, पावसाळ्यात मिठी नदी म्हणजे डासांचे आगार बनत आहे व नदीत मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकला गेल्यामुळे तेथील लहान मुलांना मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग इ. आजार होत आहेत. मिठी नदी विहार तलावापासून सुरू होते. पण, त्यात शेवाळ व घनकचरा, प्लास्टिक, मलजल सतत दिसत असते. ही नदी १७.८४ किमी लांबीची असून ती झोपडपट्ट्यांच्या अड्ड्यांमधून वाहत असते. पवईचा फिल्टर पाडा, साकीनाका, कुर्ला आणि वाकोला येथील वस्त्यांमधून शेवटी माहीमच्या खाडीत तिचे पाणी सोडले जाते. ११.८४ किमी नदी महापालिकेच्या हद्दीत व ६ किमी भरतीक्षेत्र एमएमआरडीएच्या अखत्यारित येते. नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र अंदाजे ७ हजार, २९५ हेक्टर आहे.
धारावीचे आशियात मोठे औद्योगिक म्हणून गणले गेलेले उद्योग व वस्त्या नदीच्या किनारी आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम सांगतात की, मिठी नदीमध्ये ९३ टक्के औद्योगिक मलजल व सात टक्के वस्त्यांमधील मलजल आढळते. मिठी नदीजवळ दीड हजारांहून अधिक औद्योगिक व्यवसाय होत आहेत व त्यांचे मलजल तेथे फेकले जात आहे. त्यावर कोणाचे बंधन नाही. फिल्टर पाड्याचे २८ वर्षाचे पवन पाल हे पण मिठी नदीवरील स्वच्छता मोहिमेत भाग घेतात. घनकचरा व मलजलाने नदी भरलेली असते. त्यामुळे तेथील आरोग्याची व्यवस्था बाळगणे कोणी बघायचे, हा प्रश्न पडतो. पाल म्हणतात, महापालिकेच्या माहितीवरून या नदीजवळ सुमारे १५ लाख नागरिक बसण्या-राहण्याकरिता झोपडपट्ट्यांमध्ये व औद्योगिक कामाकरिता ते गलिच्छ वस्त्यांमध्ये रोगराईने दिवस काढत आहेत.
पाणी साचत नाही, तोपर्यंत पावसाळा सुरू झाला नाही, असे येथील रहिवासी म्हणतात. ‘पाऊस पडला की पाणी तुंबणारच’ अशी कुर्ला (पश्चिम)च्या क्रांतिनगर व बैलबाजारच्या झोपडपट्ट्यांची अवस्था आहे. एकीकडे मिठी नदी व दुसरीकडे विमानतळाचे बांधकाम. या दोन्हीच्या मधील सखल भागात या १७०० घरांची वस्ती आहे, जेथे दरवर्षी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. मुख्य म्हणजे, हे पुराचे पाणी मलनिस्सारण जाळीदार वाहिनीतून उलटे बाहेर येते व दुर्गंधी आणि रोगराईचे आगार बनत राहते. अंधेरी-कुर्ला मार्गावर उत्तरेकडे जाताना पश्चिमेकडून मिठी नदी वाहते व पावसाळ्यात नदीची पातळी वाढते. विहार व पवई तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी बाहेर येते. अर्धा तास पाऊस पडला तरी तेथे पाणी तुंबते. नदी तीरावरील वस्त्यांकरिता अजून ठोस उपाययोजना आजवर झालेल्या नाहीत. पुनर्वसनाकरिता सरकारकडून कमानी येथे पुनर्वसन करणार म्हणून घोषणा झाल्या होत्या.
मिठी नदीसाठी २१ कोटींचा नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार
औद्योगिक परिसरातून सोडण्यात येणाऱ्या १० लाख लिटर सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेल्या नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी पालिकेने चार टप्प्यांत काम करण्याचे ठरविले आहे. या मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्वीडिश सल्लागार नेमून पालिका २१ कोटी रुपये मोजणार आहे. नदीचे पाणी शुद्ध होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये पालिका भुयारी मलनिस्सारणवाहिन्या आणि वर्सोवा व मालाडला मलजल प्रक्रिया केंद्रे स्थापन करणार आहे.
पर्जन्यवाहिन्या स्वच्छ व चिखलमुक्त करण्याची कामे पावसाळ्यापूर्वी दि. ३१ मे, २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट होते. या उद्देशाने एक आठवडा आधी निरीक्षणाकरिता मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त प्रवीण परदेशी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर व समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख यांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून मिठी नदीतून चक्क बोटीने प्रवास केला. जी माणसे मिठी नदीत घनकचरा टाकतील, त्यांचे पाणी तोडण्याचा पालिका आयुक्तांनी पालिका अधिकार्यांना आदेश दिला होता. नदीतील तरंगत्या प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे त्यांना बोटीचा प्रवास अकस्मातपणे थांबवावा लागला. नदीवरच्या चार पुलांपैकी तीन पुलांचा प्रवास त्यांनी केला. त्यापुढे प्रवेश बंद झाला म्हणून त्यांना मागे फिरावे लागले.
मिठी नदी शुद्ध करण्याचा प्रयास व प्रवास आजही सुरू आहे. किती सल्लागार आणले गेले तरी नको असलेली कामे करून मिठी नदीचे प्रदूषण व पूर वाढतोच आहे व ती ‘गोड’ होत नसून ‘कटू’च राहत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat