मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढती गर्दी आणि परिणामी उड्डाणांमध्ये होणारा विलंब नवी मुंबईचे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर बऱ्याचअंशी कमी होईल. तेव्हा, या विमानतळाच्या विकासाविषयी माहिती देणारा हा लेख...
'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे (पूर्वीचे नाव 'सहारा' विमानतळ) जगभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी देशामधील दिल्लीनंतर दुसरे, आशियातील चौदावे आणि जगातील अठ्ठावीसावे सर्वाधिक प्रवासी संख्या आणि एअर ट्राफिक हाताळणारे विमानतळ ठरले आहे. लंडनच्या एक धावपट्टी असलेल्या 'गॅटविक' विमानतळाहून ते त्याकाळात मोठे गणले जायचे. या विमानतळावर प्रवाशांची वर्दळ अधिक आहे. मात्र, जास्त प्रवासी उपलब्ध असूनही विमानतळाची उड्डाण क्षमता तोकडी पडते. त्यामुळे मुंबई विमानतळावर मोठा ताण पडत असल्याचे निदर्शनास येते. विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढणे हे प्रगतीचे द्योतक असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब नक्कीच हितावह नाही. म्हणूनच नवी मुंबई विमानतळ लवकर सुरू होणे अतिशय महत्त्वाचे आहे. हवाई वाहतूक देशामध्ये झपाट्याने वाढत असून विमान प्राधिकरणांनी अंदाज व्यक्त केला आहे की, २०४० मध्ये देशातील कमीत कमी ३१ शहरांमध्ये दुसऱ्या विमानतळाची गरज भासेल आणि देशातील मुंबई व दिल्ली या मोठ्या शहरांकरिता तिसऱ्या विमानतळाची देखील आवश्यकता भासू शकते. कारण, देशात २०४० मध्ये ११० कोटी हवाई प्रवासी असतील, अशाही शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत. सुट्ट्यांच्या काळात मुंबईहून ३० पेक्षा अधिक नवीन हवाईसेवा सुरू होतात. विमान प्रवासाला चालना देण्यासाठी 'एअर इंडिया'ने १५ किलोऐवजी २५ किलो सामानास परवानगी दिली. छोट्या मुलांसोबत आता १० किलोपर्यंत सामान विमानात नेता येणे शक्य होईल. 'एअर इंडिया'ने 'बोईंग ७७७' अत्याधुनिक सेवा मुंबई-दुबई दरम्यान सुरु केल्यानंतर आठवड्याला साडेतीन हजारांहून अधिक प्रवासी हवाई प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.
२०१८-१९ या वर्षात मुंबईच्या विमानतळाने १३.४ दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लाभ देऊन उच्चांक गाठला. हे विमानतळ महाराष्ट्रातील तीन केंद्रांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्यादृष्टीने प्रथम क्रमांकावर, तर स्थानिक प्रवाशांच्या दृष्टीने तृतीय क्रमांकावर आहे. या विमानतळाची एकूण प्रवासी क्षमता ४८ दशलक्ष गृहीत असली, तरी ४८.८ दशलक्ष प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात. दैनंदिन प्रवासी संख्या २०१८-१९च्या नोंदणीनुसार, १.३३ लाख असून रोज सरासरी ९५० विमान उड्डाणे होतात. 'जीव्हीके इंडस्ट्रीज लिमिटेड' व 'साऊथ आफ्रिका एअरपोर्ट कंपनी' अशा दोघांची जोडकंपनी (७४ टक्के हिस्सा) आणि 'मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड' (२६ टक्के हिस्सा) यांच्या संयुक्त कंपनीने (चखअङ) या मुंबई विमानतळाची कामे २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आली. टर्मिनल १ अ, १ ब व १ क तसेच २ अ, २ ब व २ क टर्मिनल आणि शिवाय एक अतिरिक्त टर्मिनल कलिनाला बांधले आहे. ते खाजगी व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सांभाळते.
विमानतळावरील धावपट्टीचे काम
मुंबई विमानतळावर सध्या एकमेकांना छेदणाऱ्या दोन धावपट्ट्या आहेत. मुख्य (०९/२७) ३,४९० मी. (घाटकोपर-सांताक्रूझ) व पर्यायी (१४/३२) २,९९० मी. (कुर्ला-अंधेरी) व वेगाने विमानांना बाहेर पडण्याकरिता टॅक्सीवेज तिथे बांधली. पर्यायी धावपट्टी नियंत्रण कक्षाजवळ असल्याने वैमानिकांना अतिरिक्त दक्षता ठेवावी लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही विमाने एकाच धावपट्टीवरून उडतात. पर्यायी धावपट्टी वापरल्यास विमाने उतरण्याच्या मार्गावर अणुशक्तीनगर परिसरातील १८० फूट उंच टेकडीच्या अडथळ्याने ती जोखमीची ठरते. याकरिता आता तिसरी धावपट्टी प्रस्तावित केली आहे. युकेच्या कंपनीकडे विमानतळावरील धावपट्टीवरून अधिकाधिक विमानांची उड्डाणे करता येण्याबाबतचा सल्लाही मागितला होता. 'टॅक्सीवेज'चा कोन ९० अंशांऐवजी १३५ अंशांचा केल्यावर उड्डाणांच्या वेळात कपात करता येईल, असे आढळले.
नियंत्रण कक्ष मनोरा
हा मनोरा ८५ मीटर उंचीचा बांधलेला आहे. (दिल्लीचा मनोरा १०१.९ मीटर उंच आहे). या मनोऱ्याचे त्रिकोणी त्रीदिशायुक्त २२ माळ्यांइतक्या उंचीच्या बांधकामाने 'हाँगकाँग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग'कडून २००९ वर्षाकरिता असणारे बक्षीस पटकावले होते. या नवीन वाहतूक नियंत्रण कक्षाचे कार्य १ जानेवारी, २०१४ पासून सुरू आहे व धावपट्टीवरून विमान सुटल्यावर आठ किमी अंतरापर्यंत नियंत्रण करू शकते. या कक्षाने २,८८४ चौमी जागा व्यापली आहे व याचा खर्च अंदाजे ४०० कोटी रुपये झाला आहे.
विमानतळांचा वक्तशीरपणा
एका ब्रिटिश कंपनीने विविध देशांतील ५१३ विमानतळांच्या वक्तशीरपणाचे सर्वेक्षण केले. त्यात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये जपानचे नागोया कोमाकी (१), अमेरिकेचे हिलो हवाई (२), जपानचे सापोरो ओकादामा (३) अली, तर हैदराबाद (२४६ वे), चेन्नई (२५५ वे), बंगळुरू (२६२ वे), कोलकाता (२७० वे), दिल्ली (४५१ वे), मुंबई (५०० वे), पाकिस्तानचे इस्लामाबाद (५१२ वे), ट्युनिशियाचे ट्युनीस (५१३वे) असे क्रमांक मिळाले आहेत.
नदीजवळच्या विमानतळांना कसे संकट येते?
नदीजवळ विमानतळ असल्यास खासकरुन पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यास हवाई वाहतूक ठप्प होण्याची शक्यता अधिक बळावते. मुंबईच्या 'मिठी' नदीच्या पुरामुळे २००५ मध्ये, विशाखापट्टणमच्या 'हुदूद' चक्रीवादळामुळे २०१४ मध्ये, चेन्नईच्या 'अड्यार' नदीच्या पुरामुळे २०१५ मध्ये, कोची विमानतळ पेरियार नदीच्या पुरामुळे २०१८ मध्ये बंद करावे लागले होते. हा प्रकार नवी मुंबई विमानतळाच्या बाबतीत होऊ नये म्हणून उपाययोजना आखल्या जात आहेत. नवी मुंबईच्या प्रस्तावित धावपट्ट्यांजवळच्या उलवे व गढी नद्यांमुळे अशीच परिस्थिती उद्भवू शकते, हे लक्षात घेता, या नद्यांचा विमानतळानजीकचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळवण्याचे काम सुरू आहे. मुख्यत: मुंबई महानगर क्षेत्राकरिता दुसरे विमानतळ तयार होत आहे. त्याच्या पहिल्या पर्वाचे अंशत: काम पूर्ण होण्यास चार महिने विलंब लागणार आहे व पहिले उड्डाण मार्च २०२० मध्ये होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पहिले पर्व २०२१ मध्ये पूर्ण झाल्यानंतर आणखी १० दशलक्ष प्रवाशांना या विमानतळाहून हवाईसेवेचा लाभ घेता येईल.
नवी मुंबई विमानतळाच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे
१९९७ : नवी मुंबईत दुसरे विमानतळ बांधणे आवश्यक आहे, असा मंत्रिमंडळ समितीने निर्णय घेतला.
२००८ : विमानतळ उभारणीसाठी निधीची समस्या सोडवण्याकरिता महाराष्ट्र सरकारने 'पीपीपी' तत्त्वावर विमानतळ बांधण्यासाठी मान्यता दिली व सिडकोला हिस्सेदार बनवून 'नोडल एजंट्स' नेमले.
२०१० : सिडकोने यावर उलवे येथील जागा निश्चित केली. त्याला पर्यावरण मंत्र्यांनी काही अटींवर मंजुरी दिली, तर संरक्षण मंत्रालयाचीही आवश्यक ती मान्यता मिळाली.
२०१४ : सिडकोने विमानतळाच्या प्रस्तावाकरिता इच्छुक वैश्विक कंत्राटदारांची यादी बनविण्यासाठी बोलणी केली.
२०१५ : नऊ कंपन्यांनी सिडकोला प्रतिसाद दिला व त्यातील चार कंपन्या प्रस्तावित कामाच्या पुढील बांधणीकरिता अंतीम झाल्या.
२०१७ : 'जीव्हीके' मुख्य कंपनी असलेल्या संयुक्त कंपनीला निविदेमध्ये जास्ती किंमत दर्शविली असली, तरी त्यांच्या कामाच्या अनुभवामुळे त्यांना विमानतळाच्या कंत्राटाचे काम देण्याचे ठरविले.
नवी मुंबई विमानतळाची थोडक्यात माहिती
या प्रकल्पाची अंदाजे किंमत १६ हजार कोटी रुपये इतकी आहे. विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता- 'प्रथम पर्व' १० दशलक्ष, 'दुसरे पर्व' - २५ दशलक्ष, तिसरे पर्व - ४५ दशलक्ष व २०३० व्या सुमारास अंतिम पर्व पूर्ण झाल्यावर ६० दशलक्ष इतकी होईल. विमानांची वर्दळ तासाला ८० विमाने, विमानतळ क्षेत्र १,१६० हेक्टर, एकूण क्षेत्रफळ २,२०० हेक्टर. प्रत्येकी ३.७ किमी लांब अशा दोन धावपट्ट्या बांधणार असून वाहनतळाची क्षमता १०४ विमाने एवढी आहे. नवी मुंबईचे विमानतळ महत्त्वाच्या ठिकाणी विविध मार्ग़ांनी जोडले जाणार आहे. यामध्ये मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बस स्थानके, महामार्ग व जलमार्ग यांचा समावेश आहे.
विमानतळाच्या बांधकामातील आव्हानात्मक कामे
नवी मुंबई विमानतळ क्षेत्राच्या अंतर्गत येणारी ९२ मीटर उंच टेकडी आठ मीटर उंचीपर्यंत तोडावी लागणार आहे. तसेच, उलवे व गढी नद्यांचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळवावा लागेल. खारफुटी व पाणथळ क्षेत्राचा अडथळा येऊ नये म्हणूनही योग्य त्या उपाययोजना कराव्या लागतील. त्याचबरोबर स्थलांतराचा प्रश्नही मार्गी लावायला हवा. या प्रस्तावित विमानतळाजवळ आठ शहरांचे नियोजन आहे. या सगळ्या शहरांचे क्षेत्रफळ २,०३५ एकर आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, नैनानगर, लोढा समुदाय ७७९.७४ एकर, हिरानंदानी समुदाय ४१७.६ एकर, दोन नगरे व्हॅल्युएबल प्रॉपर्टीज, अहमदाबाद समुदाय ४३६ एकर, रनवे समुदाय १२८.४ एकर, नवी मुंबई डेव्हल्पर १३०.९ एकर आणि वाध्वा समुदाय १४१.९ एकर.
विमानतळबाधित १० गावांचे स्थलांतर
सुमारे तीन हजार कुटुंबांचे वडघर, करंजाडे व वरचा ओवळा येथे स्थलांतर केले जाणार आहे. प्रस्तावित विमानतळाजवळ पंचतारांकित हॉटेल बांधण्यास प्राधान्य देण्यात येईल. २०२० पर्यंत मेरीटाईम बोर्डाकडून 'मरिना'ही तयार असेल. विमानतळाकरिता वास्तुविशारद म्हणून झहा हादीद यांना सिडकोने निवडले आहे. त्यांनी आधी बीजिंग विमानतळाचे वास्तुविशारद म्हणून काम पाहिले आहे. या प्रस्तावित विमानतळाचे काम देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे ते लवकर पूर्ण झाले पाहिजे. म्हणजे मुंबई ४० दशलक्ष + नवी मुंबई ६० दशलक्ष, असे एकत्रित एकूण १० कोटी हवाई प्रवाशांची क्षमता होईल, अशी आशा करूया.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat