मुंबई (अक्षय मांडवकर) : महाराष्ट्रातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी पालीच्या तीन नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून एक आणि तामिळनाडूमधून दोन पालींचा नव्याने शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. या पालींचे नामकरण 'हेमिडॅक्टिलस कोलीइन्सिस', 'हेमिडॅक्टिलस संकरीइन्सिस ' आणि 'हेमिडॅक्टिलस चिखलदराइन्सिस' असे करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे 'हेमिडॅक्टिलस' या पालीच्या पोटजातीमधील प्रजातींच्या गुणसूत्रांची मांडणी प्रथमच संशोधकांकडून करण्यात आली आहे.
भारतातील पालींच्या प्रजातींमध्ये तीन नव्या प्रजातींची भर पडली आहे. देशातील सरीसृपांचा विचार केल्यास आजही या वर्गाबाबत संशोधनाचे काम सुरू आहे. गेल्या दशकभरात या जीवांविषयी संशोधनाचे काम करणाऱ्या संशोधकांची फळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. आजही केवळ बाहेरील निरीक्षणाच्या आधारावर सरीसृपवर्गातील प्रजाती नव्याने दिसत असल्याचे संशोधक सांगतात. याच कामाअंतर्गत महाराष्ट्रातील 'चिखलदरा' आणि तामिळनाडूमधील 'कोली हिल' व 'संकरी' या भागातून पालीच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. बंगळूरु येथील 'नॅशनल सेन्टर फाॅर बायोलाॅजिकल सायन्स इन्सिट्यूट' या संस्थेत कार्यरत असणारे अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल, अमेरिकेचे शास्त्रज्ञ अॅऱन बाॅवर आणि ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डाॅ. वरद गिरी यांनी या पालींचा उलगडा केला आहे. गुरुवारी प्रकाशित झालेल्या 'झूटॅक्सा' या संशोधन पत्रिकेत या संशोधनाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या तीनही प्रजाती 'हेमिडॅक्टिलस' या पोटजातीमधील आहेत. या पोटजातीमध्ये भारतात सुमारे ३५ प्रजातीच्या पाली सापडतात.
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...
facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat