मुंबई : मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सूरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती नष्ट करण्यासाठी महानगरपालिका, मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदारांकडून नियमित तपासणी व उपाययोजना केल्या जात आहेत. या तपासणीदरम्यान शासकीय प्रकल्प किंवा खासगी प्रकल्पाच्या ठिकाणी रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती आढळल्यास संबंधितांविरूध्द कारवाई करणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
मुंबईतील मेट्रो प्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी गढूळ पाण्यामुळे आजार पसरविणाऱ्या डासांच्या उत्पत्तीबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सागर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एजन्सीने डास प्रतिबंधाच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएनेही स्वतंत्र यंत्रणा नेमली आहे. त्यांच्यामार्फत मलेरिया व डेंगी आजाराच्या रूग्णांचे दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत असून महापालिकेच्या इतर विभागांशी समन्वयाने वस्तीपातळीवर साथीच्या आजाराच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. या चर्चेमध्ये शरद रणपिसे, भाई गिरकर, हेंमत टकले, रामहरी रुपनवर आणि विद्या चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat