सध्या कंपनीचे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत वितरणाचे मजबूत जाळे आहे. टेलिकॉम तसेच एखाद्या कार्यालयासाठी लागणारी ‘इलेक्ट्रॉनिक सिस्टिम’ अर्थात ‘ऑफिस ऑटोमेशन’ ही आधुनिक प्रणाली ‘लेझर सिस्टिम्स’ पुरविते. अंदाजे ८५ कर्मचारी या समूहामध्ये कार्यरत असून समूहाची उलाढाल ४० कोटी रुपये एवढी आहे. या सर्व उद्योजकीय प्रवासात जनकल्याण सहकारी बँकेने वेळोवेळी दिलेले आर्थिक पाठबळ महत्त्वाचे ठरले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सन २०२० साली टेलिकॉम क्षेत्रातील उत्पादन तयार करून ते उत्पादन अमेरिका, युरोपमध्ये निर्यात करण्याचा अतुल अत्रेंचा मानस आहे.
आपल्याकडे उद्योजक म्हटला की, तो उत्पादन करणारा उत्पादक वा कारखानदार असतो, असा काही अंशी समज आहे. ‘उद्योगधंदा उभा कर,’ असे कोणत्याही मराठी तरुणाला सांगितले की, ‘कोणतं उत्पादन तयार करू?’ असंच त्याच्या डोक्यात चालू होतं. मग त्या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याला नानाविध अडचणी दिसतात आणि मग तो उद्योजक होण्याचे टाळतो. खरंतर उद्योजक बनण्यासाठी तुम्ही एखादं उत्पादन तयार करावं, असा काही नियम नाही. तुम्ही एखादी सेवा देऊ शकता, एखादी वस्तू विकू शकता किंवा एखाद्या उत्पादनाचं वितरणसुद्धा करू शकता. या बाबीदेखील ‘उद्योजक’ या गटातच मोडतात. किंबहुना, उत्पादन तयार करून ते विकणे फारच खर्चिक, वेळखाऊ आणि काही अंशी जोखमीची बाब आहे. एखाद्या उत्पादनाचे वितरण करून तुम्ही काही कोटी रुपयांचं साम्राज्य उभारू शकता. हे दिवास्वप्न नसून प्रत्यक्षात उतरवलंय एका मराठी उद्योजकाने. टेलिकॉम क्षेत्रातील वितरणाचं मोठ्ठं जाळं विणून ‘लेझर टेलिसिस्टिम्स प्रा. लि.’ या कंपनीच्या माध्यमातून हा उद्योजक आज ४० कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. टेलिकॉम वितरण क्षेत्रातील हे दिग्गज उद्योजक व्यक्तिमत्त्व म्हणजे अतुल मधुकर अत्रे.
सरकारी खात्यात कार्यरत असणारे मधुकर अत्रे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेलं व्यक्तिमत्त्व. घाटकोपर प्रांताचे ते बौद्धिक प्रमुख होते. याच वातावरणात अतुल अत्रेंची जडणघडण झाली. आई पुष्पा अत्रेंचे संस्कार अतुलमध्ये नकळत उतरले. शालेय शिक्षण घाटकोपरच्याच शिवाजी टेक्निकल हायस्कूलमधून पूर्ण झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक विषयातून अभियांत्रिकी पदवी मिळवली. पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर शिरस्त्याप्रमाणे काही काळ टेलिकॉम क्षेत्रात ‘टेलिकॉम इंजिनिअर’ म्हणून नोकरी केली. सुरुवातीचा पगार होता फक्त १२०० रुपये आणि जेव्हा नोकरी सोडली तेव्हा पगार होता ४००० रुपये. स्वत:चा काहीतरी व्यवसाय करायचा, या उद्देशाने त्यांनी नोकरी सोडली. १९९३ साली ‘स्टॅबिलायझर’ तयार करण्याचा कारखाना सुरू केला. सोबत होते फक्त २ सहकारी. अवघ्या २५ हजार रुपयांच्या भांडवलावर ही कंपनी उभी राहिली. व्यवसाय करत असताना आपल्या कक्षा रुंदावत असतात, नवनवीन क्षितीजे खुणावत असतात. असंच एक क्षितीज अत्रेंना गवसलं. ‘पॅनासॉनिक’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीचे ते आधी विक्रेते झाले, मग वितरक बनले आणि काही वर्षांतच गुणवत्तेमुळे ते आयातदारसुद्धा झाले. २०११ साली ‘पॅनासॉनिक इंडिया’ कंपनी सुरू झाली आणि त्या कंपनीच्या वितरणाचे अधिकार अत्रेंच्या लेझर टेक्नॉलॉजीला मिळाले. व्यवसायवृद्धीमुळे कालांतराने लेझर टेक्नॉलॉजीचे ‘लेझर टेलिसिस्टिम्स प्रा. लि.’ मध्ये रूपांतर झाले. उत्पादन विक्रीनंतरची सेवा हे ‘लेझर टेलिसिस्टिम्स’चे वैशिष्ट्य होय. ४० इंजिनिअर्स त्याकरिता नेहमीच सेवेस तत्पर असतात. कंपनीमध्ये ग्राहकांना सेवा देण्यात कुठेही कुचराई करायची नाही आणि जर कोणी कुचराई केली, तर त्याची गय केली जात नाही. यामुळेच टेलिकॉम क्षेत्रात वितरणाच्या बाबतीत ही कंपनी आज अग्रेसर आहे.
सध्या कंपनीचे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांत वितरणाचे मजबूत जाळे आहे. टेलिकॉम तसेच एखाद्या कार्यालयासाठी लागणारी ‘इलेक्ट्रॉनिक सिस्टिम’ अर्थात ‘ऑफिस ऑटोमेशन’ ही आधुनिक प्रणाली ‘लेझर सिस्टिम्स’ पुरविते. अंदाजे ८५ कर्मचारी या समूहामध्ये कार्यरत असून समूहाची उलाढाल ४० कोटी रुपये एवढी आहे. या सर्व उद्योजकीय प्रवासात जनकल्याण सहकारी बँकेने वेळोवेळी दिलेले आर्थिक पाठबळ महत्त्वाचे ठरले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सन २०२० साली टेलिकॉम क्षेत्रातील उत्पादन तयार करून ते उत्पादन अमेरिका, युरोपमध्ये निर्यात करण्याचा अतुल अत्रेंचा मानस आहे. आतापर्यंत आपण ‘मेड इन अमेरिका’, ‘मेड इन युरोप’ अशी उत्पादने विकत घ्यायचो. पण, आता ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून परदेशात आपल्या ‘मेक इन इंडिया’ ची सत्ता वाढवायची, असा प्रखर राष्ट्रवादी विचार ते व्यक्त करतात. अत्रेंचा हा विचार पुढे नेण्यास त्यांचे चिरंजीव अथर्व अत्रे सज्ज झाले आहेत. अथर्व संगणक अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
सद्यकाळात सरकारच्या धोरणांमुळे उद्योगास पोषक वातावरण तयार झाल्याने अनेक उद्योग उभे राहत आहेत. मात्र, या उद्योगांसाठी आवश्यक असलेले कौशल्य जाणणारा कामगारवर्गच मिळत नाही, अशी अवस्था आहे. जर हे कामगार मिळाले नाही, तर येथील उद्योगधंदे बंद होतील. काळाची हीच पावले ओळखून अतुल अत्रेंनी एक धाडसी चळवळ सुरू केली. असे कुशल कामगार तयार करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी अत्रेंनी ‘अॅकॅडमी फॉर बिझनेस कोचिंग अॅण्ड डेव्हलपमेंट’ नावाची संस्था सुरू केली आहे. मराठी उद्योजकांना एकत्र आणणाऱ्या ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या संस्थेच्या एलिट विभागाचे अतुल अत्रे समन्वयक आहेत. याच ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’चे सेक्रेटरी जनरल नरेंद्र बगाडे आणि इलेक्ट्रॉनिक्स डिझायनिंग क्षेत्रातील तज्ज्ञ इंजिनिअर मिलिंद कळसुलकर यांच्या सहकार्याने ही संस्था कार्यरत आहे. तरुणांना विविध प्रकारच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारे प्रात्यक्षिक ज्ञान देण्यासाठी संस्था प्रशिक्षण अभ्यासक्रम, कार्यशाळा, शिबीर यांचे आयोजन करते. जगाला कुशल मनुष्यबळ पुरविणे, हाच अतुल अत्रे यांचा यामागील उद्देश आहे. कोणतीही संस्था वा कंपनी आर्थिक पाठबळाने, कुशल मनुष्यबळामुळे भरभराटीस येते. परंतु जर तिला प्रखर राष्ट्रवादाचे अधिष्ठान असेल तर ती संस्था गगनभरारी घेते. अतुल अत्रेंची लेझर टेलिसिस्टिम प्रा. लि. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat