नवी दिल्ली : विश्वचषक २०१९च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात अक्षरशः गटांगळ्या खाल्या. वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीनंतर ख्रिस गेलच्या झंझावाताने पाकिस्तानची चांगलीच दैना केली. सलामीवीर ख्रिस गेलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडिजने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. विंडिजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. विंडिजकडून ओश्ने थॉमसने ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ आणि शेल्डन कोट्रेलने १ बळी घेतला. विंडिजच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत पाक फलंदाजांना नाकीनऊ आणले. फखर झमान आणि बाबर आझमने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.
पाकिस्तानच्या १०६ धावांचा सामना करण्यासाठी आलेल्या विंडीजने आक्रमक सुरुवात केली. ख्रिस गेलच्या वादळापुढे पाकच्या एकही गोलंदाजना टिकाव धरता आला नाही. ख्रिस गेलने पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ फलंदाजांना माघारी धाडले. मात्र, कमी धावसंख्येमुळे विंडिजच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचे काम तो करु शकला नाही.
ख्रिस गेल ठरला 'सिक्सर किंग'
ख्रिस गेलच्या वादळी खेळीने त्याच्या नावावर अजून एक नवा विक्रम केला आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्यामध्ये त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता ख्रिस गेलच्या नावे जमा झाला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सचा ३७ षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्या नावावर ३९ षटकार जमा आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat