जेहनाबादचे : लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात असतानाच लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात यादवी उफाळून आली आहे. ‘मीच बिहारचा दुसरा लालू’ अशी गर्जना लालूंचे ज्येष्ठ सुपुत्र तेजप्रताप यादव यांनी केली आहे. तेजप्रताप यांची ही भूमिका लालूंचे राजकीय वारसदार समजल्या जाणाऱ्या तेजस्वी यादव यांना आव्हान असल्याचे मानले जात आहे.
तेजप्रताप यांचे समर्थक आणि झारखंडमधील जेहनाबादचे बंडखोर उमेदवार चंद्र प्रकाश यांच्या प्रचारसभेत तेजप्रताप बोलत होते. लालूप्रसाद यादव हे अत्यंत उत्साही नेते आहेत. ते एका दिवसात दहा-बारा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असत. हल्लीचे नेते दोन-तीन कार्यक्रम घेतले की आजारी पडतात, असा टोला तेजप्रताप यांनी हाणला. किरकोळ आजारपणामुळे तेजस्वी यादव यांनी आपल्या अनेक प्रचारसभा रद्द केल्या होत्या. तोच धागा पकडून तेजप्रताप यांनी हा टोला हाणल्याची चर्चा आहे.
माझ्या अंगात लालूप्रसाद यादव यांचेच रक्त आहे. तेच आमचे आदर्श आणि गुरु आहेत, असे तेजप्रताप म्हणाले. राष्ट्रीय जनता दलात सध्या तळवे चाटणार्यांना तिकिटे दिली जात आहेत. माझा उमेदवार राजदच्या उमेदवाराचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करील, असा विश्वास तेजप्रताप यांनी व्यक्त केला. तेज प्रताप यादव हे लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. मात्र लालू प्रसाद यांनी आपल्या राजकीय वारशाची धुरा धाकटे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्याकडे दिली आहे. मध्यंतरी तेजप्रताप यादव घर सोडून गेले होते. लग्नाच्या कारणावरून ते नाराज होते. मी तेजस्वी यादव यांच्या पाठीशी उभा राहीन, अशी भूमिका तेजप्रताप यांनी मांडली होती. मात्र त्यांनी आता घेतलेला यु टर्न बिहार-झारखंडमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat